बॉलिवूड अभिनेत्री जोया मोरानीला करोना विषाणूचा संसर्ग झाला होता. मात्र चार दिवसांच्या उपचारानंतर कोकिलाबेन रुग्णालयातून आता तिला घरी सोडण्यात आलं आहे. ती करोनाच्या संसर्गातून पुर्णत: बरी झाली आहे. जोयाने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करुन तिला रुग्णालयातून सुटी मिळाली असल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली.

काय म्हणाली जोया?

जोयाने एक फोटो इन्स्टा स्टोरी म्हणून ठेवला आहे. या फोटोमध्ये ती डॉक्टरांसोबत दिसत आहे. “रुग्णालयातील सर्व करोना योद्ध्यांना आता अलविदा करण्याची वेळ आली आहे. गुडबाय, होम स्वीट होम” असं म्हणत तिने रुग्णालयातील डॉक्टरांना निरोप दिला आहे. जोयाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

देशभरातील लोक सध्या करोना विषाणूमुळे त्रस्त आहेत. करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. काही लोक या विषाणूमुळे मृत्यूमुखी देखील पडले आहेत. मात्र जोयाच्या या पोस्टमुळे तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण करोना विषाणूशी लढता येते हा आत्मविश्वास या पोस्टमुळे त्यांना मिळत आहे.