माणूस जसा विचार करतो तसं त्याचं जीवन घडतं, असं म्हणतात. थोडक्यात आपल्या जीवनावर विचाराचा मोठा प्रभाव असतो आणि इथंच खरी मेख आहे. कारण ज्या कोणत्या विचाराचा मनावर प्रभाव असतो त्यानुसारच जीवन घडत जातं आणि नीट लक्ष दिलं तर असं लक्षात येईल की आपल्या जीवनावर अविचाराचाच प्रभाव असतो! आपल्या हातातला मोबाइल दिवसभर व्हॉटसअ‍ॅपवरून असंख्य सकारात्मक संदेशांचा रतीब घालत असतो. माणूसही हे संदेश वाचतो आणि ते लगोलग  इतरांना पाठवतोही.. पण म्हणून त्याचं जीवन सकारात्मकतेनं भरून जातं का? माणूस चांगले विचार वाचतो, ऐकतो, बोलून दाखवतो, लिहितो पण तरी आतून त्याच्यावर वाईटाचाच पगडा अधिक असतो. आता कुणी म्हणेल, काय चांगलं आणि काय वाईट, हे कोण ठरवणार? साधकाला मात्र हे ठरवता येईल किंवा ठरवावंच लागेल. आपल्या साधनेला चालना देणारा प्रत्येक विचार हा चांगला आणि जो आपल्या साधनेला अडथळा उत्पन्न करतो, जो आपल्या मनाला अस्थिर किंवा मोहग्रस्त करतो, जो आपल्या मानसिक, शारीरिक, वैचारिक शक्तीचं हळुहळू खच्चीकरण करतो, तो विचार वाईट! साधकासाठी चांगल्या आणि वाईट विचाराची ही सोपी व्याख्या आहे. आता आपल्या जीवनातली विसंगती आपण पाहिलीच की आपल्याला सद्विचार आवडतो, पण सद्वर्तन साधत नाही! किंवा वरकरणी आपण सद्वर्तन करीत असल्याचं दाखवत असलो तरी आतून दुर्वर्तनाकडेच आपला खरा ओढा असतो. त्या दुर्वर्तनाकडे असलेली मनाची धाव थोपवून आपल्याला बलपूर्वक सद्वर्तनासाठी कष्ट घ्यावे लागतात! हे होण्याचं कारण खऱ्या सद्विचाराची आपल्याला खरी ओढ नाही. ती ओढ नसण्याची कारणं अनेक असतील, पण चांगलं बोलणारा माणूस चांगलं वागत नाही, धर्माचा उदोउदो करणारा धर्मानुसार वागत नाही, असं आपण पाहतो.. आणि त्यामुळेच आपणही शब्दांच्या पिंजऱ्यातून विचारांना मोकळं करून त्यांना व्यवहाराच्या, कृतीच्या अवकाशात वावरायला लावून जोखत नाही! संतांना मात्र माणसाचा आचार आणि उच्चार एकरूप असावा, असंच वाटतं. माणसाच्या बाह्य़ जीवनाकडे त्यांचं फारसं लक्ष नसतं. कारण भौतिक सुखासाठी प्रयत्न करायला माणसाला कुणी शिकवावं लागत नाही. जन्मजात वासनाबीजानुसार त्याचा तो प्रयत्न सुरूच असतो. पण काळाच्या पकडीत असल्याने अशाश्वत असलेल्या भौतिकापलीकडे जे काही शाश्वत तत्त्व आहे, त्याचा आधार लाभला तर माणसाला शाश्वत समाधानाची प्रचीती येईल, हे संतच जाणतात. ही जी शाश्वताची प्राप्ती आहे तीच श्रेयस आहे. खरं श्रेय त्यायोगेच प्राप्त होणार आहे. त्यामुळे अशाश्वत भौतिकाला प्रिय मानून त्यात अडकलेल्या जिवाला त्या प्रेयसच्या मोहातून अलगद सोडवत त्याचं परमश्रेय ज्यायोगे साधलं जाणार आहे, त्या श्रेयसकडे वळविण्याची प्रक्रिया संत-सत्पुरूष सुरू करतात. त्याच्या अंतरंगाची ही शस्त्रक्रियाच असते आणि त्यात सद्विचार हेच त्यांचं साधन किंवा शस्त्र असतं! शस्त्रानं माणसाला जखम होते हे खरं, पण वैद्याच्या कुशल हातातलं शस्त्र हे त्याचं शरीर छेदत असलं तरी ते त्याला जखमी करीत नसतं! उलट त्याच्या शरीरातला घातक भाग दूर करीत असतं. तसा बोधविचार आहे.  तो माणसाच्या आंतरिक घडणीला धक्का देतो, पण जे वाईट आहे ते नष्टही करतो.