News Flash

३८. संकल्प आणि कल्पना : ४

एकदा उपेक्षा सुरू झाली की मनातले ते कल्पनातरंग स्थिरावतील आणि मग मन दृढ संकल्पासाठी सिद्ध होईल!

एक माणूस एका खोल, पण कोरडय़ा विहिरीत पडला. विहिरीजवळच्या झाडाची फळं पडत होती त्यामुळे भूक कशीबशी भागत होती. तरी त्या भयाण भासणाऱ्या विहिरीत ना धड झोप होती, ना मनाला शांतता. दोन-तीन दिवसांतच त्याचे कपडे मळले, डोईवरचे केस वाढले, दाढी वाढली, शरीर अस्वच्छच होत गेलं. कोणीतरी वाचवावं म्हणून तो देवाचा धावा करीत राहीला. हाका मारून तो दमलाही होता. आता आवाजातही त्राण नव्हतं. तरीही तो प्राण कंठाशी आणून अधेमधे हाका मारत होता. एकदा त्याची हाक एका सज्जनाच्या कानी पडली. त्यानं विहिरीत डोकावून पाहिलं. त्या माणसाची अवस्था पाहून त्याचं अंत:करण कळवळलं. त्यानं एक दोरखंड खाली टाकला आणि म्हणाला, ‘‘बाबा रे, या दोराला घट्ट धर. मी तुला वर खेचतो.’’ त्या सज्जन माणसाचं तेजस्वी रूप आणि तो दोरखंड पाहून माणूस मात्र धास्तावला. तो म्हणाला, ‘‘मी असा अस्वच्छ आहे. या दोरखंडाला हात कसा लावू? तो खराब होईल.. मी आधी स्वच्छ होतो. दाढी करतो, केस कापतो, आंघोळ करतो. मग तुम्ही मला वर खेचा..’’ त्या विहिरीत का हे सारं साधणार आहे? सज्जनानं परोपरीनं समजावलं की, ‘‘ आधी दोर घट्ट धर. वर ये, मग मीच तुला आंघोळ घालीन, नवे कपडे देईन.’’ त्या माणसाला मात्र पटेना. त्याला वाटलं, आधी स्वच्छ झालं पाहिजे, मग वर जाता येईल! तशीच साधनमार्गाकडे वळल्याक्षणापासूनची आपली गत आहे. आपल्याला वाटतं, आधी विकार ताब्यात आणावेत, पाप  नष्ट व्हावं, ‘चांगलं’ बनावं मगच साधना खरी करता येईल! सद्गुरू मात्र सांगत आहेत, तुझ्या बळानं तू विकार नष्ट करू शकत नाहीस. त्यासाठी मी सांगतो तसाच वागत जा, मगच आपोआप भगवंतापासून दुरावा उत्पन्न करणाऱ्या साऱ्या कृती घडणंही कमी होत जाईल. तेव्हा मी पापीच आहे, विकारग्रस्तच आहे, वासनेच्या पकडीतच आहे. मी माझ्या बळानं त्यातून सुटू शकत नाही. आधी मी सद्गुरूंचा बोध आत्मसात करीत, आचरणात आणत जगू लागलं पाहिजे. मग मला निर्वासन कसं करायचं, हे तेच पाहतील. बरं, अशीही धारणा झाली, तरी साधनमार्गावर पहिला अडथळा येतो तो मनाचाच! सद्गुरूंच्या बोधानुरूप वागण्याचा प्रयत्न तर करू लागलो, पण मनातून विकार, पाप, दुष्ट भावना काही जात नाही! मग साधक पुन्हा खिन्न होतो. निराश होतो. अशा साधकालाच दिलासा देण्यासाठी पू. अंबुराव महाराज म्हणतात की, ‘‘मनानं झालं ते पाप नव्हे, देहानं झालं तेच पाप!’’ मनात आलेल्या विचारांशी अडकून पडलं की मन विचारांचा भोवरा निर्माण करून त्यातच भरकटवू लागतं. त्यामुळेच मनात पापाचे विचार येवोत की पुण्याचे येवोत, त्याकडे लक्षच देऊ नका. ‘‘रस्त्यावरून जाताना माणसांच्या गर्दीतूनच वाट काढत  आपण पुढे जातो. तसं विचारांच्या गर्दीतून आपण वाट काढत पुढे गेलं पाहिजे, चालणं सुरूच ठेवलं पाहिजे,’’ या आशयाचा बोध पू. बाबा बेलसरे यांनीही केला आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, ‘मनात येतं ते पाप नव्हे,’ हा दिलासा कायमस्वरूपी नाही! कारण अखेर ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’ या म्हणीप्रमाणे जी गोष्ट वारंवार मन घोळवत राहतं तिचीच स्वप्नं पडतात आणि मग जे मनात वारंवार येतंय ते कृतीत आणण्याची ऊर्मी मनच निर्माण करू लागतं. तेव्हा मनात येणाऱ्या पापविचारांकडे दुर्लक्ष करून पुढे जायचं आहे, प्रत्यक्ष कृतीकडे लक्ष ठेवायचं आहे. भगवंतापासून, शाश्वतापासून दूर नेणारे कल्पना तरंग मन कितीही उत्पन्न करीत राहो, त्या तरंगांच्या अक्राळविक्राळ लाटा बनू द्यायच्या नाहीत की त्या तरंगांत मोहानं विहरतही राहायचं नाही. एकदा उपेक्षा सुरू झाली की मनातले ते कल्पनातरंग स्थिरावतील आणि मग मन दृढ संकल्पासाठी सिद्ध होईल!

चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2016 5:23 am

Web Title: concepts and ideas
Next Stories
1 ३७. संकल्प आणि कल्पना : ३
2 ३६. संकल्प आणि कल्पना : २
3 ३५. संकल्प आणि कल्पना : १
Just Now!
X