News Flash

५६. षट्विकारदर्शन : दंभ-१

मनोबोधाच्या सहाव्या श्लोकाच्या अखेरच्या चरणाच्या अखेरच्या शब्दापाशी आपण आलो आहोत.

मनोबोधाच्या सहाव्या श्लोकाच्या अखेरच्या चरणाच्या अखेरच्या शब्दापाशी आपण आलो आहोत. हा शब्द म्हणजे ‘दंभभारू’! नको रे मना मत्सरू दंभभारू।। खरं तर काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या विकारांतून हा दंभ पोसला जात असतो. ‘गीते’त आसुरी संपत्तीत याची गणना आहे. आता हा जो ‘दंभभार’ शब्द आहे, त्याच्या दोन अर्थछटा आहेत. समर्थ सांगतात, हे मना, दंभाच्या भाराचं ओझं शिरी बाळगू नकोस. तसंच दंभानं भारल्यागत जगू नकोस! समर्थ या दंभाला तस्काराची उपमा देतात. ‘षड्रिपुनिरूपण’ या लघुप्रकरणात ते म्हणतात, ‘‘स्वार्थ हा व्यर्थ जाणावा परंतु जन आंधळे। दंभाने आंधळें केलें ऐसा हा दंभ तस्करू।।’’ स्वार्थबुद्धीमुळे जगण्याची दृष्टीच जणू हरपली आहे. ज्या-त्या गोष्टीत माणूस स्वार्थच पाहात आहे. स्वार्थ जितका साधला जाईल तितपत, त्या प्रमाणात वस्तू आणि व्यक्तिंना महत्त्व दिलं जात आहे. स्वार्थाध होऊन जगत असल्यानं माणसाचं जगणं संकुचित झालं आहे. त्यात दंभाचा भार आहे! या दंभानं सद्सदविवेकबुद्धीचीच तस्करी केली आहे. म्हणजेच सद्बुद्धीच्या मोबदल्यात कुबुद्धी मिळवली आहे. खरं तर, ‘‘शरीर मुख्य जायाचें दंभाची कोण ते कथा। सद्यचि उमजेना कीं वैर साधी परोपरी।।’’ हा देह समस्त जगण्याच्या परीघाचा केंद्रबिंदू झाला आहे. ‘मी’ आणि ‘माझे’चा सर्व डोलारा या देहाच्या आधारावर फोफावला आहे. पण जिथे हा देहच नष्ट होणारा आहे तिथे त्या ‘मी’ आणि ‘माझे’चं अस्तित्व तरी कुठे उरणार आहे? मग त्या देहाच्या आधारावर तग धरलेल्या ‘मी’ आणि ‘माझे’च्या दंभाची तरी काय ती कथा? तो दंभ देहाबरोबरच राख होणारा आहे. हे वास्तव माणसाला उमजत नाही आणि म्हणून या दंभाच्या भरात तो पदोपदी दुसऱ्याशी वैर निर्माण करतो, वितुष्ट निर्माण करतो. तरीही या देहाच्या आधारावर जे जे काही मला ‘सुखावणारं’ आहे ते ते आणि हा देह याचा दंभ मला आहे. समर्थ म्हणतात, ‘‘देहाचा दंभ तो खोटा परंतु आवडे जना। विवेकें पाहतां नाहीं दु:खी होती म्हणोनियां।।’’ देहाचा दंभ खोटा आहे, मिथ्या आहे, न टिकणारा आहे, तरी तो लोकांना आवडतो. मनाला भावतो आणि अखेरीस भोवतोही! विवेकाची दृष्टी नसल्यानं माणूस या दंभापायी दु:खच भोगत असतो. समर्थ सांगतात, ‘‘दंभ तो चोर जायाचा लालची करिती मुढें। शेवटीं सर्वही जातें प्रेत होतें भुमंडळीं।।’’ हा जो दंभ नावाचा चोर आहे, तो जाणाराच आहे. तरी ज्या देहाचं अखेरीस मढं होणार आहे, त्या देहाला जगताना तो पदोपदी लालचावून किती नाचवत असतो! आधी प्रपंचात वावरत असताना ‘माझ्यासारखा कर्तबगार कुणी नाही,’ ‘माझ्यासारखा कष्टाळू कुणी नाही’, ‘माझ्यासारखा त्यागी कुणी नाही’, ‘माझ्यासारखा शिक्षित कुणी नाही’, ‘माझ्यासारखा दुसऱ्याचं करणारा कुणी नाही’, ‘माझ्यासारखा धनवान कुणी नाही’.. अशा दंभभारानं माणूस दबला असतो. अध्यात्माच्या मार्गावर आला की ‘माझ्यासारखा साधक कुणी नाही,’ ‘माझ्यासारखा भक्त कुणी नाही’, ‘माझ्यासारखा तपस्वी कुणी नाही’, ‘माझ्यासारखं देवाचं करणारा कुणी नाही’, ‘माझ्यासारखा ज्ञानी कुणी नाही’.. अशा अनंत तऱ्हेचा दंभ मनात शिरकाव करू लागतो. कोणत्याही तऱ्हेचा दंभ का असेना एकदा प्राण गेला की त्या मढय़ाला कुणी कर्तबगार, कष्टाळू, त्यागी, शिक्षित, धनवान म्हणत नाही. अगदी त्याचप्रमाणे त्या मढय़ाला ज्ञानी, तपस्वी, भक्त म्हणून कुणी पुकारत नाही. देहानं जगात वावरत असताना मी कुणीही असो, मृत्यूनंतर देहाचीच राख होते तिथं पोसलेल्या दंभाचा काय टिकाव लागणार? जगत असतानाच जर हे वास्तव मनात ठसलं तर दंभाबाबत माणूस जागरूक होऊ लागेल. दंभावर उतारा काय असावा, हे सांगताना समर्थच हा उपाय सांगतात.

-चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2016 5:42 am

Web Title: manobodh six story
Next Stories
1 ५५. षट्विकारदर्शन : प्रपंच
2 ५४. षट्विकारदर्शन : लोभ-मोह
3 ५३. षट्विकारदर्शन : मत्सर – २
Just Now!
X