ब्रह्मदेवालाही आपण कोण, कुठून आलो, असा प्रश्न पडला. त्या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात हजार र्वष गेली तरी हाती काही आलं नाही, असं नाथांनी म्हटलंय. मग निराश होऊन सृष्टी रचनेचं कार्य तरी कसं करावं, हा नवा पेचही त्याला पडला. साधनमार्गाकडे वळताना आपलीही साधारण अशीच गत असते, नाही का? आपण कोण, कुठून आलो, याच घरात-याच माणसांत-याच समाजात का जन्मलो, आपल्याला याच आर्थिक-सामाजिक चौकटीत का जगावं लागतं, आपण कधी जाणार, कुठे जाणार.. असे अनंत प्रश्न आपल्यालाही पडतात. त्या प्रश्नांच्या उत्तरांचा शोधही आपण आपल्या परीनं घेत जातो. तो घेतानाच व्यवहारात नेमकं कसं जगावं, हा प्रश्नही आपल्या मनात येतोच. या प्रश्नांची उत्तरं मग अनेकानेक सद्ग्रंथांतून शोधण्याचा प्रयत्न आपण करतो. त्यातून समजतं की सद्गुरूशिवाय आणि साधनेशिवाय आत्मज्ञान अशक्य आहे. आता खरा सद्गुरू आणि खरी साधना प्राप्त होणं काही सोपं नसतं. त्यामुळे मग आपण आपल्या परीनं ‘साधना’ सुरू करतो. तिची सुरुवात मनाच्याच सल्ल्यानं होते. मग तीर्थयात्रा होतात, व्रतवैकल्यं, उपास-तापास, पारायणं होतात. हे सारं मनाच्या कलानंच होतं म्हणून अशा थोडय़ाफार साधनेनं मनाला तेवढय़ापुरतं समाधानही वाटतं. पण ते कायमचं टिकणारं मात्र नसतं. एखादं संकटनाशक स्तोत्र वाचून मनाची उभारी वाढते, पण ती टिकत नाही! शेवटी ‘संकट’ आणि ‘संकटा’ची भीती मनात अधिक खोलवर रूजत जाते. अनेक पुस्तकं वाचून ‘ज्ञान’ झाल्यासारखं वाटतं, पण प्रत्यक्ष जगण्यात त्यातलं काहीच उतरत नाही. ‘ज्ञाना’चा पवित्रा टिकत नाही आणि अज्ञानयुक्त मनोधारणाच उफाळून येतात. म्हणजेच आपल्या मनाजोगत्या साधनेनं ना खरं ज्ञान गवसतं, ना खरी निर्भयता साधते, ना कायमचं समाधान लाभतं. तरी ती साधना वाया मात्र जात नाही. कारण तीच खऱ्या वाटचालीची अपरिहार्यता बिंबवत असते. मग खरी वाटचाल करायची तर खरी साधना हवी, ती सांगणारा खरा सद्गुरू हवा, या प्रामाणिक भावनेतून आपली पावलं बाहेरच्या जगात या शोधासाठी पडू लागतात. धर्म आणि अध्यात्माच्या विराट बाजारात फसण्याचा धोकाही तेवढाच असतो. कुठे कुंडलिनी जागृतीचे ‘शॉर्ट कोर्सेस’ झडत असतात, कुठे सत्संगांचा रतीब सुरू असतो, कुठे भजनानंदात माना डोलत असतात; पण खरा अनुभव? तो काही हाती लागत नाही. याही पायरीवर साधकाची उमेद टिकली तर परमेश्वराचा शोध घेण्याची चिकाटी संपत नाही. परमेश्वर कसा आहे, त्याचं दर्शन घडेल का, ते कसं घडेल, हे प्रश्न अधिकच अस्वस्थ करीत असतात. त्यातून तळमळ वाढते. मग सद्ग्रंथांचं वाचन अधिक सखोल सुरू होतं. समर्थासह सगळेच संत सांगतात की, ‘‘जयास वाटे देव पाहावा। तेणें सत्संग धरावा। सत्संगेविण देवाधिदेवा। पाविजेत नाहीं।।’’ (दासबोध, द. ५, स. १). प्रत्यक्ष सत्संग पाहिजे. बाजारू नव्हे! समर्थाच्या शिष्यांना जसा प्रत्यक्ष सत्संग लाभला, शिर्डीत साईबाबांचा, गोंदवल्यात श्रीमहाराजांचा, शेगावात गजानन महाराजांचा जसा प्रत्यक्ष संग लाभला.. तसा खरा प्रत्यक्ष संग पाहिजे.. समर्थाच्या शब्दांत सांगायचं तर, ‘‘सत्संगे नि:स्संग होता। धन्य संसार होतसे।।’’ मोह-भ्रमयुक्त बंधनांतून नि:संग करणारा आणि जगणं धन्य करणारा खरा सत्संग पाहिजे. तो लाभावा यासाठी मग सद्ग्रंथाला सद्गुरूस्वरूप मानून ‘साधना’ सुरू होते. तुकोबांची गाथा, समर्थाचा दासबोध, नाथांचं भागवत, माउलींची ज्ञानेश्वरी असा एखादा सद्ग्रंथ निवडला जातो. तो वाचताना त्या संताची सगुण प्रतिमा सद्गुरू म्हणून मनात असते आणि त्या आधारावर शोध निर्गुण परमेश्वराचा सुरू असतो!

 

-चैतन्य प्रेम