News Flash

४५. षट्विकारदर्शन : काम-२

माणसाच्या मनात क्षणोक्षणी कामना उत्पन्न होत असतात. ‘मी म्हणजे देहच’

माणसाच्या मनात क्षणोक्षणी कामना उत्पन्न होत असतात. ‘मी म्हणजे देहच’ या धारणेतच जगत असल्यानं या देहाला जे जे सुखकारक ते ते मिळवण्याची आणि टिकवण्याची कामना सदोदित सतेज असते. अध्यात्माच्या मार्गावर आल्यावरही देहाचा प्रभाव तसूभरही ओसरला नसतो. उलट देहाला थोडे कष्ट होऊ द्यात, थोडा आजार येऊ द्यात, अशक्तपणा येऊ द्यात, मनात लगेच येतं, मी देवाचं एवढं करीत असताना माझ्या वाटय़ाला हा आजार का? तेव्हा अनंत कामना मनात उत्पन्न होतात आणि त्यांची पूर्ती देहाच्याच आधारे, देहाच्याच माध्यमातून होत असल्यानं देहाला जपण्याची जाणीव खोलवर जागी असते. आपण आधीच पाहिलं होतं, त्याप्रमाणे देहाच्या माध्यमातून विकार भोगले जात असले तरी देहाला विकारांची ओढ नसते. ती ओढ मनाला असते! जसं डोळ्यांना पाहाण्याची ओढ नसते, डोळ्यांद्वारे पाहाण्याची ओढ मनाला असते! कानांना ऐकण्याची ओढ नसते, कानांद्वारे ऐकण्याची ओढ मनाला असते! अगदी त्याचप्रमाणे इंद्रियांच्या बळावर विकारांचं ‘सुख’ भोगलं जात असलं तरी त्या ‘सुखा’ची ओढ देहाला नसते, मनालाच असते. म्हणूनच या मनालाच समर्थ सांगत आहेत.. नको रे मना काम नानाविकारी।। हे मना, अनंत विकारांना जन्म देणाऱ्या कामना विकाराचा सोस नको! आता गेल्या भागात आपण काही प्रश्न मांडले होते आणि त्याचा थोडा मागोवाही घेतला होता. ते प्रश्न म्हणजे, मुळातच कामनांमध्ये गैर काय? भौतिक आणि शारीरिक सुख भोगता येईल अशा क्षमतांनी जर देह युक्त आहे, तर त्याच्या आधारे ते सुख भोगण्यात गैर काय ? अशा शारीरिक सुखानं जर मानसिक आणि भावनिक आनंद लाभत असेल तर देहवासनेला हीन का मानावं? भले प्रत्येक कामनेची पूर्ती होईलच असं नाही, तरीही त्यांच्या पूर्तीसाठी प्रयत्न करण्यात वाईट काय? या प्रश्नांचा थोडा मागोवा घेताना आपण पाहिलं की नदी जशी प्रवाहित होत जाते तसे आपण अनुभवांतून पुढे जात राहिलो तर काही हरकत नाही. म्हणजे मनात कामना उत्पन्न होण्याचा अनुभव, तिच्या पूर्ती वा अपूर्तीचा अनुभव.. यातूनही आपण त्यापलीकडे जात राहिलो, तर कामना उत्पन्न होण्यात काही गैर नाही. अडचण तेव्हा होते, जेव्हा कामना पूर्तीच्या अनुभवाला आजन्म टिकवून ठेवण्याच्या इच्छेत मन अडकतं किंवा कामना अपूर्तीच्या अनुभवानं खचून जातं, क्रोधीष्ट होतं, पशुवत् वागतं! त्यामुळे कामना विकाराचा पाश संपूर्ण जीवनावर परिणाम घडवू शकतो. जीवन दिशाहीनही करू शकतो. त्यासाठी साधकानं तरी अत्यंत सावधपणे या विकाराच्या खोडय़ातून सुटलंच पाहिजे, असं समर्थ सांगत आहेत. दुसरी गोष्ट देहसुखाला संतांनी हीन ठरवलं आहे, याचं कारण नीट लक्षात घेतलं पाहिजे. भौतिक सुखासाठी, देहसुखासाठी प्रयत्न करण्याचा बोध माणसाला करावा लागत नाही. त्याचा जन्म वासनेतच होतो आणि जन्मभर तो वासना पूर्तीसाठीच धडपडत असतो. लहान मूल बालवत् इच्छांच्या पूर्तीसाठी धडपडत असतं. रडत असतं. हट्ट करत असतं. तारुण्यात वासनेची व्याप्ती वाढली असते. वासनापूर्तीचा हट्टाग्रह अधिक खोलवर रुजला असतो आणि वासनापूर्तीसाठीचे प्रयत्न अधिक क्षमतेनिशी होतात. तेव्हा माणसाला देहसुखासाठी प्रेरित करावंच लागत नाही. उलट देहसुखात अडकलेल्या माणसाला त्या देहापलीकडे विचार करण्यासाठी प्रेरित करावं लागतं. संतांनी देहसुखावर कोरडे ओढले म्हणूनच तर आत्मसुख नावाचंही काही सुख आहे, याकडे माणसाचं लक्ष तरी गेलं! समोर सरळ रस्ता असूनही गुरं आजूबाजूला भरकटतातच. त्यांना नुसत्या शब्दांनी सांगून कळत नाही. षट्विकारांबरोबर भरकटणाऱ्या माणसाला सरळ रस्त्यावर आणण्यासाठी म्हणूनच संतांनी त्या विकारांवरच कोरडे ओढले.

-चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2016 3:41 am

Web Title: ramdas swami philosophy 12
टॅग : Ramdas Swami
Next Stories
1 ४४. षट्विकारदर्शन : काम-१
2 ४३. षट्विकारदर्शन : ३
3 ४२. षट्विकारदर्शन : २
Just Now!
X