News Flash

४८. षट्विकारदर्शन : क्रोध-३

शीघ्रकोपी, दीर्घकोपी, बलहीनकोपी आणि सुप्तकोपी; या चारपैकी कोणत्या तरी एका गटात आपणही मोडतो.

शीघ्रकोपी, दीर्घकोपी, बलहीनकोपी आणि सुप्तकोपी; या चारपैकी कोणत्या तरी एका गटात आपणही मोडतो. क्रोधाचा प्रकार कोणताही असो, तो वाईटच. कारण तो अंत:करणावर नकारात्मक ठसा उमटवतोच आणि शरीरावरही विपरीत परिणाम करतो. आता एक साधनामार्गी म्हणाला की, अमुक एक सत्पुरुषही तर तापटच होते! आता त्यांच्या क्रोधामागचं रहस्य आणि त्या क्रोधानं साधत असलेलं दुसऱ्याचं हित कसं कळणार? पण त्याला म्हणालो की, त्यांच्यासारखं तुम्ही नि:शंक, निर्भय आणि नि:स्संग वृत्तीचे व्हा, मग तुम्हीही चिडलात तरी हरकत नाही! बघा हं, सत्ता आणि संपत्तीच्या बळावर स्वत:च्या ताकदीबद्दल, आवाक्याबद्दल नि:शंक किंवा निर्भय झाल्याचा माणसाचा समज होऊ शकतो, पण त्याची वृत्ती फकिरासारखी नि:स्संग होणं मात्र सोपं नसतंच. काय आहे, सत्पुरुषातलाही आपल्या सोयीचा स्वभावविशेष आपण ढालीसारखा जवळ करतो, पण त्यांच्या वृत्तीनुसार आपली वृत्ती घडविण्याच्या अभ्यासात तेवढा रस दाखवत नाही. असो. तर साधन मार्गावर चालू लागताच आपल्यातल्या विकारांची आपल्याला जाणीव होते. त्यांच्यावर स्वबळावर ताबा मात्र काही केल्या साधत नाही. त्यातही काम, मद, मत्सर, दंभ आणि लोभाला काही प्रमाणात दुसऱ्यापासून लपवता येतं. कारण ते विकार अत्यंत सुप्त असतात ना! त्यामुळे दुसऱ्याला ते जाणवतीलच असं नाही, पण क्रोधाचं मात्र तसं नाही! क्रोध उत्पन्न होताच आपल्या वागणुकीत तात्काळ काही ना काही नकारात्मक बदल घडतोच. दुसऱ्यावर किमान मानसिक आघात केल्याशिवाय तरी हा क्रोध शांत होत नाही. त्यामुळे साधनेचा मार्ग, साधनेचा विचार, त्यातून साध्य करायची असलेली मन:शांती याच्या विपरीत आपल्याकडून कृत्य घडल्याची जाणीव तात्काळ होते आणि मनात खेद निर्माण होतो. ज्या कारणासाठी जीवन जगायचं ध्येय ठरलं आहे त्या मार्गात क्रोधाचा हा अडसर नकोसा वाटतो, पण त्या क्रोधापासून सुटकाही होत नाही! समर्थानी ‘षड्रिपुनिरूपण’ या लघुप्रकरणात क्रोध निरूपणाचा समारोप करताना सांगितलं आहे की, ‘‘भल्यानें कोप सांडावा शांतीनें असतां बरें। क्षुल्लकें कोप पाळावा भल्याचें काम तों नव्हे।।’’ भल्याने कोप सांडावा! म्हणजे आपण भले आहोत, असा गैरसमज नको.. पण ज्याला भल्या मार्गावर, अध्यात्माच्या या व्यापक मार्गावर चालायचं आहे आणि खरं भलेपण प्राप्त करायचं आहे त्यानं तरी कोप सांडला पाहिजे. त्यानं शांतीनं राहण्याचा प्रयत्न करावा. श्रीमहाराज सांगत ना, त्याप्रमाणे असलेली शांती निदान बिघडवू तरी नये! आणि पुन्हा याचं मूळ कामना विकारातच आहे बरं का.. आपल्या मनासारखं होत नाही म्हणून आपल्याला राग येतो. अगदी लहानसहान गोष्टींतही आपल्याच मनासारखं व्हावं, असा आपला हट्टाग्रह असतो. तेव्हा आधी दररोजच्या जगण्यात निदान लहानसहान गोष्टींतलं आपलं गुंतणं, त्यात आपल्याच मनासारखं व्हावं, हा हट्टाग्रह आटोक्यात आला पाहिजे. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणत त्याप्रमाणे, आपल्या घरात पाहुण्यासारखं राहाता आलं पाहिजे! आपण पाहुणे म्हणून दुसऱ्याकडे जातो तेव्हा त्या घरात इकडचं कपाट तिकडे हलवलं म्हणून रागावतो का? आपल्या घरात मात्र आपल्याला न विचारता एखादी गोष्ट केली की आपण उसळतो! दुसऱ्याच्या घरी सरबराईत एखादी गोष्ट कमी झाली तर आपण त्यांनाच समजुतीच्या स्वरात सांगतो, ‘‘अहो जाऊदे, त्यात काय एवढं?’’ पण आपल्या घरी? बरं आपण आपल्या मनाची काळजी घेतो, पण दुसऱ्याच्या मनाची आणि मताची मात्र फिकीरही बाळगत नाही. उलट दुसऱ्याचं मन आणि मत आपल्याविरुद्ध असेल, तर आपल्याला रागच येतो!
– चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2016 3:20 am

Web Title: ramdas swami philosophy 14
Next Stories
1 ४७. षट्विकारदर्शन : क्रोध-२
2 ४६. षट्विकारदर्शन : क्रोध-१
3 ४५. षट्विकारदर्शन : काम-२
Just Now!
X