समर्थ रामदास यांच्या ‘मनोबोधा’चा ४८वा श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ प्रथम पाहू. मग मननार्थाकडे वळू. हा श्लोक असा आहे:
सदा देवकाजीं झिजे देह ज्याचा।
सदा रामनामें वदे नित्य वाचा।
स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा।। ४८।।
प्रचलित अर्थ : त्याचा देह सर्वकाळ देवकार्यात झिजत असतो. वाणी रामनामाच्या उच्चारात नित्य रममाण असते. तो नित्य स्वधर्माप्रमाणे वागत असतो. सर्वोत्तमाचा हा दास जगात धन्य असतो.
आता मननार्थाकडे वळू. ‘देवकाज’ या शब्दाचा अर्थ देवाचं कार्य, असा प्रचलित आहे. पण खरंच देवाचं असं काही कार्य आहे का हो? भगवंताचं कार्य पार पाडण्यासाठी म्हणून मोठमोठे आश्रम, मंदिरं, धार्मिक संस्था उभ्या राहातात आणि अखेरीस सर्वसामान्य प्रपंचातल्यापेक्षा संकुचित वृत्तीचंच पोषण करू लागतात. राग, द्वेष, मत्सर, लोभ यांनीच बरबटतात. समर्थानीही मठ स्थापन केले आणि देशोद्धाराच्या कार्याला ईश्वराचं अधिष्ठान मिळवून दिलं. पण महंत कसा असावा, याबाबत त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्या व्याख्येत बसतील असे महंत आज किती आहेत? मग हे ‘देवकार्य’ नेमकं काय आहे?
यातला ‘देव’ हा शब्द फार सूचक आहे. या जगातला सर्व व्यवहार कसा आहे? तो म्हणजे नुसती देव-घेव आहे! आणि जगातल्या प्रत्येकाला कमीत कमी देऊन जास्तीत जास्त घेण्याची हाव आहे!
अशा या जगात दुसऱ्याला जास्तीत जास्त देणारे संतच असतात आणि सद्गुरूंचं अवघं लीलाचरित्र म्हणजे तर त्याग, दान आणि करूणेचंच अवतरण असतं. सद्गुरूंच्या चरित्राचा हेतू जनसामान्यांना खरा परमानंद मिळवून देणं, हाच असतो. ‘समर्थलीला’ या प्रवचन संग्रहात श्रीधर स्वामी म्हणतात, ‘‘या भारतीय पुण्यभूमीत सर्वच जन्मास येतात. अवतारी आणि सामान्य जन हे सर्व या पवित्र भूमीत जन्मले तरी दोघांच्या जीवनात फरक असतोच. सामान्यांच्या आचरणात पूर्वकर्म दृग्गोचर होत असते. मागील जन्मी देहसुखासाठी केलेल्या कर्माचे फळ म्हणूनच ते जन्मास येतात. महात्म्यांचा जन्म देहसुखासाठी नसतोच. विषयवासनेमुळे सामान्यांना प्राप्त होणारी दु:खे पाहून ती नाहीशी करून त्यांचा उद्धार करण्यासाठीच अवतारी पुरुषांचा जन्म असतो.. सामान्य जन संसार सुखासाठीच जन्मास येत असतात. अवतारी या सामान्य जनांस परमानंद वैभव साम्राज्य मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करीत असतात..’’(पृ. ५१). तेव्हा ज्ञानाची देव आणि अज्ञानाची घेव, तृप्तीची देव आणि अतृप्तीची घेव, आनंदाची देव आणि दु:खांची घेव हाच सद्गुरूंचा व्यवहार असतो!
शिष्यातलं अज्ञान, दु:ख, चिंता, अतृप्तीचं ते हरण करतात आणि त्याला पूर्णज्ञान, पूर्णसुख, पूर्णतृप्ती देण्याचीच विराट प्रक्रिया पार पाडत राहातात. या प्रक्रियेत ते देहकष्टांची पर्वा करीत नाहीत. एके ठिकाणी समर्थ म्हणतात, ‘‘देहदेवालयामध्यें। पाहाणें देव तो बरा।’’ आपल्या देहात वसत असलेल्या देवाचं दर्शन हे खरं दर्शन आहे, हा याचा अर्थ आहेच. पण दुसऱ्याच्या देहातही देवाचंच दर्शन घडलं पाहिजे, हाही अर्थ आहे! मग देवालयाची दुर्दशा भक्ताला जशी पाहावत नाही आणि मग तो ते मंदिर नेटकं करू लागतो त्याचप्रमाणे दुसऱ्याचं दु:खं, कष्ट, यातना सर्वोत्तमाच्या या दासालाही पाहावत नाहीत. त्या भवदु:खातून त्याला सोडविण्यासाठी देहबुद्धीत रूतलेल्या त्या जिवाची आत्मबुद्धी जागी करण्याचं, त्याचे पापसंकल्प थांबवित त्याला सत्यसंकल्पाकडे वळविण्याचं ‘देवकार्य’ तो अहर्निश करीत राहातो!
–चैतन्य प्रेम
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 14, 2016 4:24 am