News Flash

२०८. बिंब-प्रतिबिंब : १

आपणही जगावर आपल्याला जमेल तितपत म्हणजे आपल्या सोयीनुसारच ‘प्रेम’ करतो.

 

आपणही जगावर आपल्याला जमेल तितपत म्हणजे आपल्या सोयीनुसारच ‘प्रेम’ करतो. पण त्याच वेळी जगाकडूनही किंवा या जगात ज्यांच्या-ज्यांच्यावर ‘प्रेम’ करतो त्यांच्याकडून अखंड प्रेम लाभेल, ही अपेक्षाही करतो.

अपेक्षा हीच मुळात भ्रामक असते. निरपेक्षता साधली तरच भ्रममुक्त होणं साधतं.

श्रीसद्गुरू ही निरपेक्षताच शिकवतात. केवळ कर्तव्यभावनेनं कर्म कसं करावं आणि त्यात निरपेक्ष कसं व्हावं, हे श्रीसद्गुरूच शिकवतात. त्यामुळे सगुण अशा, तीन गुणांसहित अशा या दृश्य जगाची जी भक्ती आपण जन्मापासून करीत आहोत त्या ‘भक्ती’तला भ्रमही श्रीसद्गुरू नष्ट करू लागतात. त्यामुळेच खरी भक्ती कोणाची करायला हवी, ही जाणीव निर्माण होते! खरी भक्ती अर्थात खरं आंतरिक परिपूर्ण एकनिष्ठ प्रेम श्रीसद्गुरूंवरच साधायला हवं, हे उमगतं.

ईश्वर पाहणं सोपं का आहे? पण जो अखंड ईश्वराशी जोडला गेलेला आहे असा खरा सद्गुरू पाहणं शक्य आहे. तो प्रत्यक्ष म्हणजे डोळ्यांना दिसणारा आहे. तो साक्षात्कारी म्हणजे साक्षात आकाराला आलेला आहे. तेव्हा खरी भक्ती त्याच्यावरच करायला हवी. अर्थात तो जो बोध करतो त्या बोधावरच करायला हवी.

श्रीसद्गुरूंचा जो बोध आहे त्याचं आचरण हीच खरी भक्ती आहे. साध्या स्थूल जगातही बापाला मुलगा आपल्यासारखा व्हावा, असं वाटतंच ना? श्रीसद्गुरू तर जो खरा आपला झाला त्याला आपल्यासारखं केल्याशिवाय राहात नाहीत! आपल्या सत्शिष्यालाही त्या सर्वोत्तमाचा दास केल्याशिवाय राहात नाहीत. कोणती लक्षणं ते सत्शिष्यात उत्पन्न करतात, ती ‘मनोबोधा’च्या ५० आणि ५१ व्या श्लोकांत सांगितली आहेत.

प्रथम ५० वा श्लोक, त्याचा प्रचलित अर्थ पाहू. मग मननार्थाकडे वळू- हा श्लोक असा आहे :

नसे अंतरीं कामकारी विकारी।

उदासीन जो तापसी ब्रह्मचारी।

निवाला मनीं लेश नाहीं तमाचा।

जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा।। ५०।।

प्रचलित अर्थ : ज्याच्या चित्तात अनेक विकार उत्पन्न करणारा काम नसतो, तो उदासीन असतो, ब्रह्मचारी असतो व ज्याच्या अंत:करणात तमाचा लेशही नसतो, जो मनात पूर्ण निवाला असतो, समाधान पावला असतो असा सर्वोत्तमाचा दास जगात धन्य असतो!

आता मननार्थाकडे वळू. या श्लोकात सत्शिष्याच्या आंतरिक स्थितीचं दर्शन घडवलं आहे. त्याच्या अंत:करणात अनंत विकारांना कामना कधीच उत्पन्न होत नाहीत, तो उदासीन अर्थात जगाच्या ओढींविषयी अनासक्त असतो, त्याच्यात तमाचा अर्थात अज्ञानरूपी अंधकाराचा लवलेशही उरलेला नसतो, त्याचं मन पूर्ण तृप्त झालं असतं आणि हे सर्व साधण्याचं कारण तो तपनिष्ठ ब्रह्मचारी असतो हे आहे!

आता ब्रह्मचारी म्हणजे कोण? सर्वसाधारणपणे विवाह न झालेल्या व्यक्तीला आपण ब्रह्मचारी म्हणतो. प्रत्यक्षात ब्रह्मचारी म्हणजे जो सदोदित ब्रह्मभावातच विचरण करीत असतो तो! आणि ब्रह्म म्हणजे केवळ सद्गुरू, हे आपण ‘गुरुगीते’च्या आधारे यापूर्वीही जाणलं आहे.

गुरूशिवाय ब्रह्म अन्य नाहीच, असं शिवजींनी पार्वतीमातेला स्पष्टपणे सांगितलं आहे. जो सद्गुरूभावात पूर्ण निमग्न आहे आणि सद्गुरू बोधानुरूप जीवन व्यतीत करीत आहे त्याच्याच अंत:करणातून कामना ओसरू शकतात, तोच अनासक्त होऊ शकतो, त्याच्यातच अज्ञानाचा लेशही उरत नाही, त्याचंच मन खऱ्या अर्थानं निवतं!

चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2016 3:57 am

Web Title: samarth ramdas philosophy 109
Next Stories
1 २०७. अनेकांतील एक: २
2 २०६. अनेकांतील एक : १
3 २०५. बोले तैसा चाले..
Just Now!
X