News Flash

२२४. तहान प्रेमाची..

जिवाला जन्मजात प्रेमाचीच तहान आहे. व्यक्तींशी माणूस जोडला जातो

जिवाला जन्मजात प्रेमाचीच तहान आहे. व्यक्तींशी माणूस जोडला जातो ते अखंड प्रेमाचा आधार लाभावा याच इच्छेनं. निर्जीव वस्तूंवरही माणूस ‘प्रेम’ करतो, ते त्या वस्तू आधारवत वाटतात म्हणून. मात्र काही अपवाद वगळले तर, जगातलं प्रेम बहुतांश निरपेक्ष नसतं. आपणही दुसऱ्यावर प्रेम करतो ते काही इच्छा, काही अपेक्षा मनात ठेवूनच. या इच्छांची, अपेक्षांची जाणीव स्पष्टपणे असतेच असं नाही. त्यामुळे जगही आपल्यावर प्रेम करतं त्यामागे अपेक्षा चिकटल्या असतात यात काय नवल? तेव्हा जगाकडून सुख मिळावं, प्रेम मिळावं या हेतूंशीच जखडलेल्या आशा-दुराशा आपलं अंत:करण व्यापून असतात. श्रीसद्गुरूंची स्थिती कशी असते? ‘‘नसे मानसीं नष्ट आशा दुराशा!’’ त्यांच्या अंत:करणात नष्ट आशा, दुराशा नसतेच, मात्र लगेच समर्थ सांगतात, ‘‘वसे अंतरीं प्रेमपाशा पिपाशा!’’ त्यांच्या अंत:करणात प्रेमाची तहान असते! हे कुठलं प्रेम आहे? पू. बाबा बेलसरे यांनी म्हटलं आहे, ‘‘प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगामाजी। हाचि सुबोध गुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची।।’’ जो शुद्ध प्रेमभाव आहे, त्यातच राम आहे! या शुद्ध प्रेमभावाइतकं अमूल्य असं या जगात काही नाही. पण या प्रेमाचं मोल मात्र जगात कुणालाच सहसा उमगत नाही. हा प्रेमभाव साधकाच्या अंत:करणात उमलावा, हीच सद्गुरूंची इच्छा आहे. त्यांना याच प्रेमभावाची तहान आहे. साधकाच्या अंत:करणात हा शुद्ध प्रेमभाव जागा झाला की सद्गुरूंना आनंद होतो. आपल्या अंत:करणात नश्वर, अशाश्वत जगाविषयीच प्रेम भरून असतं. ते प्रेमही नि:स्वार्थी, निरपेक्ष नसतं. ज्यांच्यावर आपलं प्रेम आहे त्यांना वैचारिक, भावनिक आणि मानसिकदृष्टय़ा आपल्या कह्यत ठेवण्याचा सूक्ष्म हट्टाग्रह त्या ‘प्रेमा’त असतो. अध्यात्म मार्गावर आल्यावर अशा या अंत:करणात थोडा पालट होऊ  लागतो. इथेच धोक्याचं एक वळण मात्र येतं. भाऊबिजेला भाऊ  बहिणीला ओवाळणी टाकतो. ते काही त्यानं कमावलेले नसतात. वडिलांनी त्याला दिलेले असतात. अगदी त्याचप्रमाणे भगवंतावर प्रेम करण्याइतका प्रेमभाव आपल्यात नसतोच. त्या प्रेमाचं बीज सद्गुरूच आपल्या अंत:करणात रुजवतात. होतं मात्र उलटच! ते प्रेम भगवंताकडे न वळवता आपण ते जगाकडे वळवतो. साधनेनं अंत:करण आधीच हळवं झालं असतं आणि त्यात या शुद्ध प्रेमाची खैरात जगावर सुरू होते. बरं हे प्रेमही निरपेक्ष नसतंच. त्यामुळे जगानं त्या प्रेमाची बूज न राखता आपल्या अपेक्षांनुसार वर्तन केलं नाही, तर साधकाच्या अंत:करणावर आघात होतो. त्यामुळे आधीच हळवं झालेलं साधकाचं मन आणखीनच खचतं. साधनेसाठी तोवर मोठाच बाह्य त्याग आणि आंतरिक त्याग साधलेला साधक आपल्याच प्रेमभावनेच्या या लहानशा दोरीनं स्वत:हून जखडला जातो. श्रीनिसर्ग दत्त महाराज जे म्हणतात की, ‘‘जे मनोनिर्मित आहे त्याचा नाश मनानेच केला पाहिजे,’ त्याचा अर्थ इथे उमगतो. जगावर मी शुद्ध प्रेम करतो. जगानंही माझ्यावर शुद्ध प्रेम करावं, ही अपेक्षाच मनोनिर्मित आहे!  श्रीसद्गुरू एकदा म्हणाले, ‘‘जगानं तुम्हाला साखळदंडानं बांधलं, तरी मी तुम्हाला सोडवीन, पण तुम्ही स्वत:ला लहानशा दोऱ्यानं बांधून घेतलंत तर मी सोडवणार नाही! तुम्ही स्वत:हून ती दोरी टाकून द्यावीत हे पाहीन.’’ भावनेतून निर्माण झालेल्या मनोनिर्मित इच्छांपुढे बुद्धीही हतबलच असते! जोवर कमकुवतपणामुळे आपणच आपल्यावर करून घेत असलेले आघात उमगत नाहीत तोवर हे चित्र पालटत नाही. जगात शुद्ध प्रेम शोधत खस्ता खाणाऱ्या साधकाच्या मनाकडे त्या वेळीही सद्गुरूंचंच निर्हेतुक, नि:स्वार्थ प्रेमभावानं लक्ष असतं.

– चैतन्य प्रेम

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2016 2:32 am

Web Title: samarth ramdas philosophy 125
Next Stories
1 २२३. रेघ.. लहान, मोठी!
2 २२२. आशा-दुराशा
3 २२१. ऋण
Just Now!
X