News Flash

२३१. गळ

मनोबोधाच्या ५८व्या श्लोकाचा पू. काणे महाराज आणि पू. बाबा बेलसरे यांनी मार्मिक अर्थ मांडला आहे.

मनोबोधाच्या ५८व्या श्लोकाचा पू. काणे महाराज आणि पू. बाबा बेलसरे यांनी मार्मिक अर्थ मांडला आहे. ‘सार्थ मनाचे श्लोक’ (प्रकाशक – श्रीसमर्थ सेवामंडळ, सज्जनगड) या पुस्तकात पू. बाबा यांनी या श्लोकातील शब्दा-शब्दाचा अर्थ उलगडून दाखवला असून तो मुळातच वाचण्यासारखा आहे. पू. बाबा यांचा हा अर्थ पाहू. श्लोक आपण गेल्या भागात वाचलाच आहे.. नको वासना वीषईं वृत्तिरूपें। पदार्थी जडे कामना पूर्वपापें। सदा राम नि:काम चिंतीत जावा। मना कल्पनालेश तोही नसावा ।। पू. बाबा लिहितात, ‘‘वस् पासून वासना शब्द होतो. वस् म्हणजे राहणे, स्थिर होणे. जी जिवाला इंद्रियांच्या क्षेत्रांत किंवा दृश्यात नेऊन वसवते ती वासना. वासना म्हणजे दृश्यच खरे, ही भावना व दृश्यामध्ये सुख सापडेलच, ही कल्पना. ‘सि’पासून विषय शब्द होतो. वि+सि म्हणजे विशेष प्रकाराने बांधणे, गुंतवणे. पाच इंद्रिये पाच प्रकारे- शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध या पाच रूपांनी दृश्य (जगत) आत घेतात. त्यापासून जिवाला तात्पुरते सुख मिळते. म्हणून जीव पाच प्रकारच्या दृश्यांमागे सतत धावतो. त्या दृश्यास विषय म्हणतात. ‘वृत्’पासून वृत्ति शब्द होतो. वृत् म्हणजे असणे, घडणे, होणे, फिरणे. वृत्ति म्हणजे क्रिया, चलन, चक्राकार फिरणे, वर्तनक्रम किंवा मन:स्थिती. मन ही एक शक्ती आहे, ती कधीही स्वस्थ नसते. तिच्यात सारखी हालचाल चालू असते. पाण्यावर जसे चक्राकार तरंग उठतात तसे मनावर तरंग उठतात. इंद्रियांचा दृश्य वस्तूंशी संबंध आल्यावर मनामध्ये हवेनकोपणाचे जे तरंग उठतात त्यांना वृत्ती म्हणतात. वासना अतिशय सूक्ष्म असते. ती जेव्हा वृत्तीच्या रूपाने आकार धरते तेव्हा तिचे अस्तित्व उघडकीस येते. अध्यात्मविद्येमध्ये वासना असणे हेच पाप मानतात. वासना वृत्तीरूपाने शब्दस्पर्शादिकांच्या मागे धावते, सुखाच्या आशेने जिवाला दृश्यामध्ये गुंतवते. हृदयातील भगवंताला विसरल्यावाचून जीव अशा रीतीने बाहेर धावत नाही. म्हणून जिवाच्या बहिर्मुखपणास पाप म्हणतात. जिवाची बाहेर धावण्याची सवय काही नवीन नाही. ती पूर्वीच्या जन्मांपासून चालत आली आहे. ही सवय मोडून जिवास स्वस्थता मिळण्यास भगवंताचे चिंतन हा एकमेव उपाय आहे. ते चिंतनदेखील अगदी निष्काम असावे. ‘मला भगवंतच हवा,’ अशी वृत्ती ठेवून त्याचे चिंतन करावे. भगवंताच्या हवेपणात वासनेचे नाहीपण अनुभवास येते. वृत्तीमध्ये बुद्धी आणि कल्पना यांचे अंश असतात. अमुक विषय मिळाला तर सुख मिळेल, ही कल्पना आणि तो प्राप्त करून घेण्यास अमुक मार्गाने जावे, असे ठरविणे हे बुद्धीचे काम होय. बुद्धीला भगवंताच्या चिंतनात गुंतवून ठेवायचे आणि कल्पनेची गती थांबवायची. म्हणजे मग मन भगवंताच्या ठिकाणी आपोआप स्थिरावते.’’ (पृ. ५३,५४). थोडक्यात ज्या जगात आपण जन्मापासून आहोत त्या जगाची, जगाच्या आधाराची आपल्याला सवय जडली आहे. मासळी गळाला अडकते ती प्रत्यक्षात गळाच्या ओढीनं नव्हे, तर त्या गळाला लागलेल्या आमिषाच्या गोडीने! तसं या जगातूनच सुख मिळतं, या अनुभवातून आपण जगाच्या गळाला अडकलो आहोत. हे सुख वस्तू, व्यक्ती आणि परिस्थितीच्या माध्यमातून मिळत असल्यानं या तिन्ही गोष्टी सदोदित आपल्या मनानुकूल राखण्याच्या वृत्तीनं आपल्या विषयवासनांना धुमारे फुटले आहेत. त्यामुळे भगवंताच्या चिंतनातही हीच वृत्ती आड येते. केवळ भगवंतच हवा, हा भाव नसतोच. जगातल्या सुखामध्ये खंड पडू नये, यासाठीच भगवंत हवा असतो. त्यामुळे आधी, ‘जग सुख देईल,’ या एका कल्पनेतून ज्या अनंत कल्पना प्रसवत असतात आणि मोहभ्रमात गुंतवत असतात त्यात आता ‘भगवंताच्या आधारावर अडचणीरहित होत या जगात सुखी होता येईल,’ या नव्या कल्पनेची भर पडते!

चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2016 3:25 am

Web Title: samarth ramdas philosophy 132
Next Stories
1 २३०. मोकळी वृत्ती
2 २२९. उपासना नित्य नेम!
3 २२८. सत्क्रिया
Just Now!
X