News Flash

२३९. व्यसन-ध्यास

अध्यात्माच्या वाटेवर येण्याचा जो हेतू होता

अध्यात्माच्या वाटेवर येण्याचा जो हेतू होता, आत्मज्ञान, आत्मसाक्षात्कार किंवा भगवंताचं दर्शन व्हावं, यासारखी जी धूसर का होईना, पण प्रारंभिक इच्छा होती आणि सत्संगतितही जी गोडी वाटत होती ती थोडी वाटचाल झाल्यावर अचानक का धोक्यात आली? भौतिकाचं प्रेम आणि भौतिकाची काळजी एकदम अधिक प्रभावी का झाली? आपल्या अंतरंगाची दिशाही अशी चुकत असेल तर समर्थ मनोबोधाच्या ६३ ते ६६ या चार श्लोकांत सांगत आहेत. या सर्वच श्लोकांचा मननार्थ आपण एकत्रितपणे पाहाणार आहोत आणि म्हणून प्रथम हे सर्व श्लोक, त्यांचा प्रचलित अर्थ फक्त आज पाहू. हे श्लोक असे आहेत:

घरीं कामधेनू पुढें ताक मागे।

हरीबोध सांडूनि वीवाद लागे।

करीं सार चिंतामणी काचखंडें।

तया मागतां देत आहे उदंडें।। ६३।।

अती मूढ त्या दृढ बुद्धी असेना।

अती काम त्या राम चित्तीं वसेना।

अती लोभ त्या क्षोभ होईल जाणा।

अती वीषई सर्वदा दैन्यवाणा।। ६४।।

नको दैन्यवाणें जिणें भक्तिऊणें।

अती मूर्ख त्या सर्वदा दु:ख दूणें।

धरीं रे मना आदरें प्रीति रामी।

नको वासना हेमधामीं विरामीं।। ६५।।

नव्हे सार संसार हा घोर आहे।

मना सज्जना सत्य शोधूनि पाहें।

जनीं वीष खातां पुढें सूख कैंचें।

करीं रे मना ध्यान या राघवाचें।। ६६।।

प्रचलित अर्थ :  घरी कामधेनु असताना दुसऱ्याच्या दारोदारी ताकासाठी वणवण करणारा मनुष्य हा हरिबोध सोडून विवाद करणाऱ्या मनुष्यासारखा मूढ आहे. सर्व इच्छा पूर्ण करणारा चिंतामणी गवसूनही जो त्याच्याकडे काचेचे तुकडेच मागत बसला तर तेच त्याला उदंड मिळणार (६३). जो अत्यंत मूढ आहे त्याची आत्मबुद्धी दृढ राहात नाही. ज्याचं चित्त अतिकामनांनी भरून गेलं आहे त्याच्या चित्तात रामासाठी जागाच उरलेली नाही. ज्याचं मन अतिलोभानं व्याप्त आहे ते अखेरीस अत्यंत क्षोभानंच व्याप्त होणार आणि मग विषयांत अत्यंत बुडून त्या विषयांमागे लाचारासारखं फरपटत जाणाऱ्याचं जिणं हे अत्यंत दैन्यवाणंच होणार (६४). ज्याला असं दैन्यवाणं जिणं नको असेल त्यानं अशाश्वत जगाची भक्ती सोडून शाश्वताची भक्ती केली पाहिजे. त्या भक्तिशिवायचं जगणं हेच दैन्यवाणं आहे. प्रत्यक्षात जो जगात दु:ख भोगत असूनही अधिक जोमानं त्या जगाकडूनच दुप्पट सुख मिळवण्याच्या धडपडीत पडतो त्या मूर्खाचं दु:खंही दुप्पट होतं! त्यामुळे हे मना, विरामी अशा, रामरहित अशा सुवर्णप्रासादाची आस न बाळगता रामाविषयीच अत्यादरपूर्वक प्रीती धारण कर (६५). हा संसार साररूप म्हणजे शाश्वत नाही. म्हणून हे मना या संसारात साररूप तत्त्वाचाच शोध घे. विषयांचं विष खाऊन पुढे सुख कसलं? म्हणून हे मना सुखस्वरूप रामाचं ध्यान करून सुखी हो (६६).

व्यसनाधीन मणसाला त्याचे आप्त परोपरीनं समजावतात. सर्व सुखं पायाशी असताना क्षुद्र व्यसनाची गोडी का, आयुष्याची काय परवड केली आहेस, आत्ताही जागा हो आणि शहाण्यासारखं जग, या जगण्यात काही अर्थ आहे का, यात आनंद आहे, हा भ्रम आहे, पण पुढे किती शारीरिक, मानसिक त्रास होईल, माहीत आहे का? व्यसनी माणसावर या समजावण्याचा दोनपैकी एकच परिणाम होतो. एकतर तो खरंच जागा होतो आणि व्यसन सोडतो. नाहीतर अतिशय भयव्यथित होऊन दुप्पट वेगानं अधिकच व्यसनाधीन होतो! आपण काय करू?

चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2016 2:37 am

Web Title: samarth ramdas philosophy 140
Next Stories
1 २३८. ध्यास-हव्यास
2 २३७. संकल्पवृक्ष : ३             
3 २३६. संकल्पवृक्ष : २
Just Now!
X