News Flash

२५३. नित्यनेम: ४

जगात वावरताना अंतरंगात सुरू असलेलं नाम हे क्षणोक्षणी आपली प्रत्यक्ष परीक्षा घेत असतं!

नामाचं महत्त्व अधोरेखित करताना समर्थ रामदास ‘मनोबोधा’त म्हणतात-

समस्तांमध्यें नाम साचार आहे।

कळेना तरी सर्व शोधून पाहे।

जिवा संशयो वाउगा तो त्यजावा।

प्रभाते मनीं राम चिंतीत जावा।। ७५।।

नव्हे कर्म ना धर्म ना योग कांहीं।

नव्हे भोग ना त्याग ना सांग पाहीं।

म्हणे दास विश्वास नामीं धरावा।

प्रभातें मनीं राम चिंतीत जावा।। ७६।।

अरे साधका, समस्त साधनांमध्ये नाम हे साचार आहे, जर तुझा विश्वास नसेल आणि तुला कळत नसेल तर सर्व साधनांचा आटापिटा करून पाहा! पण त्यात वेळ घालवण्यापेक्षा संशय त्यागून नामस्मरणाला लाग! हा साचार शब्दही फार अर्थगर्भ आहे बरं का! म्हणजे काय? तर अन्य साधना करत असताना त्याचवेळी जगात वावरता येत नाही, पण नाम घेता घेता जगात वावरता येतं, जगातले व्यवहार करता येतात. जगात वावरताना अंतरंगात सुरू असलेलं नाम हे क्षणोक्षणी आपली प्रत्यक्ष परीक्षा घेत असतं! मी मुखानं नाम घेत आहे, मग मला खोटं बोलणं शोभतं का? मी मुखानं नाम घेत आहे, मग मला खोटं वागणं शोभतं का? साधनेचा वेळ वेगळा आणि जगण्याचा वेळ वेगळा, अशी पळवाट नाम दूर करतं. समर्थही म्हणतच ना? की येता-जाता, खाता-पिता, जगातले सर्व व्यवहार करताना नाम सोडू नका! कारण नामाची ही जाणीवच मनाचा संकुचितपणा हळूहळू तोडू लागते आणि मग व्यवहारही सांभाळला जातो आणि नामही सांभाळले जाते! मग तर समर्थ जे सांगतात ते फार बहारीचं आहे! ते म्हणतात एकदा नाम घ्यायला लागलं ना, की मग योग्य कर्म कोणतं, माझ्याकडून योग्य कर्म सुरू आहे ना, खरा धर्म कोणता, माझ्याकडून योग्य धर्माचरण सुरू आहे ना, याची चिंता करायला लागत नाही! हे नामस्मरण खरं मात्र पाहिजे हं! तोंडानं आपलं नुसतं नाम घेतल्याचं दाखवलं जात आहे, पण मन संकुचित ओढीआसक्तीतच रूतलं आहे, असं चालणार नाही. तर नामाचा आधार प्रामाणिकपणे घट्ट धरला असेल तर कर्माचरण, धर्माचरण तेच योग्यपणे पार पाडून घेईल आणि दुसरा कोणता योग शिल्लक राहाणार नाही! मग समर्थ भोग आणि त्याग या दोन टोकांचा मनोज्ञ उल्लेख करतात. कारण आपण त्यागही असा आणि अशा पद्धतीने करीत असतो की ज्यातून प्रसिद्धीचा आणि सन्मानाचा भोग भोगता यावा! तेव्हा आपला त्याग हादेखील सकाम असतो. नव्या प्रारब्धभोगांना वाव देणारा असतो. तर समर्थ म्हणतात की नामाचा आधार घेतलास ना, की वेगळा म्हणून काही त्याग करायला नको की कोणत्याही भोगाचं चिंतन करायला नको. कारण जे घडेल ते ‘मी’पणातून नाही तर ‘तू’पणातूनच घडेल. दुसऱ्यासाठी काही मी करीत आहे, असा भाव उरणार नाही. तर त्याच्या इच्छेनं गोष्टी घडत आहेत, हा भाव राहील. स्वामी विवेकानंद म्हणत त्याप्रमाणे जो अति झोपतो किंवा बिलकुल झोपत नाही, जो अतिशय खातो किंवा खातच नाही तो योगी होऊ शकत नाही! योगी हा प्रत्येक गोष्ट प्रमाणात करतो. आवश्यक तेवढीच करतो. अतिशय खाण्यात हव्यास असतो तर सर्व अनुकूलता असूनही काहीच न खाऊन राहाण्यात देहकष्टाचं प्रेम असतं! माझा देह भगवंतासाठी किती कष्ट सोसत आहे, हे लोकांना दाखवण्याची ओढ त्यात असते. श्रीगोंदवलेकर महाराजही म्हणत की, ‘‘भगवंतासाठी कष्ट करायला नकोत. तो सहजप्राप्य आहे. देहाला कष्ट देण्यात कष्टाचंच प्रेम अधिक असते!’’ तर मनाला ही समत्वदृष्टी लाभावी, यासाठी समर्थ एका नामाकडेच लक्ष वळवतात. हे नाम म्हणजे काय आणि हा जो नित्यनेम आहे तो नेमका काय, हे आता नववर्षांच्या प्रारंभी पाहू!

चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2016 3:38 am

Web Title: samarth ramdas philosophy 154
Next Stories
1 २५२. नित्यनेम: ३
2 २५१. नित्यनेम: २
3 २५०. नित्यनेम: १
Just Now!
X