News Flash

२८८. थोर हानी!

ज्याचं आंतरिक जीवन रामचिंतनानं अर्थात सद्गुरू जाणिवेनं व्याप्त नाही

ज्याचं आंतरिक जीवन रामचिंतनानं अर्थात सद्गुरू जाणिवेनं व्याप्त नाही, त्याची थोर हानी होते, असं समर्थ सांगतात. मग आपल्या मनात प्रश्न उद्भवू शकतो की, आंतरिक जीवन हे असं सद्गुरू जाणिवेनं व्याप्त असू शकतं का? मुळात आंतरिक जीवन म्हणजे काय हो? तर ते विचार आणि कल्पनेनं भरलेलं आहे. माणसाच्या समस्त विचारप्रक्रियेवर त्याच्या वासनात्मक घडणीचा सूक्ष्म प्रभाव आहे. जशा वासना तशा ऊर्मी माणसाच्या मनात उत्पन्न होत असतात आणि त्यानुसार त्याच्याकडून कृती घडत असतात. बाह्य़ जगात वावरत असताना माणूस जी कृती करीत असतो, त्याचं जे वागणं-बोलणं असतं, त्याचा जो व्यवहार सुरू असतो  या समस्त कृतीचा पाया असलेली अंतरंगातली जी वासनोद्भव प्रक्रिया आहे ती फार व्यापक असते. माणसाच्या कृतीवर, व्यक्त होण्यावर, प्रतिक्रियात्मक प्रतिसादावर मर्यादा असते. त्याच्या व्यक्त होण्यावर समाज, परिस्थिती, काळाची अनुकूलता यांचा अंकुश असतो. त्याच्या अंतरिक जगात मात्र त्याचं वासनारूप त्याला ठळकपणे दिसत असतं. अनंत तऱ्हेच्या सूक्ष्मतम अशा भयजाणिवेनं माणूस स्वत:ला बाहेर वेगळं भासवत जगत असतो, पण आत तो जसा आहे तसा त्याला दिसत असतोच! आत एक, बाहेर एक या द्वंद्वात तो जगत असतो. हा आत-बाहेरचा भेद संपवायचा असेल, अंतर्बाहय़ समत्व आणायचं असेल तर जाणिवेचं केंद्र बदलावं लागतं. एकदा जाणिवेचं केंद्र बदललं की चिंतन, मनन, स्मरण यांनाही वळण लागतं. पण हे सोपं नसतंच. एक पाश्चात्त्य साधक एकदा श्रीनिसर्गदत्त महाराजांना म्हणाला की, ‘‘तुमचं बोलणं ऐकायला चांगलं वाटतं, पण तुमच्या कल्पनांना मी भावनेनं प्रतिसाद देऊ  शकत नाही! थोडक्यात, जाणिवेचं केंद्र बदलता येतं, सद्गुरूंनी जाणीव व्यापू शकते, हीसुद्धा कल्पनाच वाटू शकते. पण निदान आज जे जग माझ्या जाणिवेचं केंद्र आहे ते जग खरंच माझं आहे का, माझ्यासाठी अखंड आनंदाचा आधार ठरणारं आहे का, याचा तरी विचार केला पाहिजे. मग त्या जगासाठी मी का तळमळतो, का ताटकळतो? या जगाकडून सुखाची अपेक्षा मी ठेवतो म्हणूनच तर अपेक्षाभंगाचं दु:खही वाटय़ाला येतं ना? मग जे शाश्वत तत्त्व आहे त्याच्या प्राप्तीसाठी मी का तळमळू नये? ते शाश्वत तत्त्व शाश्वताशी एकरूप अशा सद्गुरूंच्या आधाराशिवाय जाणता येणार नाही. साधं माझ्या भौतिक जीवनात शाश्वत काय आणि अशाश्वत काय, हे मला उमगत नाही. भौतिकाच्या प्रभावाला सामोरं कसं जावं, त्या प्रभावातही आपल्या आंतरिक स्थितीत समतोल कसा साधावा, हे उमगत नाही. त्यामुळे सद्गुरूंच्या आधारानं भौतिक जीवनाकडे बघण्याची दृष्टीही सुधारते आणि आध्यात्मिक जीवनात वेगानं पावलं पडू लागतात. आंतरिक जाणिवेचं केंद्र संकुचित ‘मी’ आणि ‘माझं’ जग उरत नाही, तर व्यापक सद्गुरूस्वरूप होऊ  लागतं. साधन पथावर असूनही ज्याची समस्त जाणीव सद्गुरूमय होत नाही त्याच्या जीवनात मोठी हानीच ओढवणार. कारण तो अध्यात्म पथावर असूनही त्याच्या मनातलं जाणिवेचं, धारणेचं केंद्र जग हेच असणार. मग तोंडात नाम रामाचे आणि बगलेत सुरी द्वैताची, अशी त्याची आंतरिक स्थिती असणार. मग उपासना सुरू आहे, पण त्या साधनेनं समाधान नाही, हाच अनुभव मन पोखरू लागणार. उलट ‘मी इतकी साधना करीत असूनही माझ्या वाटय़ाला हा भोग का,’ हा प्रश्न मनात येणार. ‘मी साधना करतो,’ हा सूक्ष्म सात्त्विक अहंकारच आहे! इथं ‘न ये राम वाणी तया थोर हाणी,’ या चरणात ‘थोर’ शब्दाची दुसरी अर्थछटा प्रकट होते. अहंकार, मग तो राजस असो की तामस असो की सात्त्विक असो, तो घातकच असतो. उलट सात्त्विक अहंकारही सर्वात ‘थोर’ म्हणजे मोठा असतो.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2017 2:46 am

Web Title: samarth ramdas philosophy 187
Next Stories
1 २८७. नामानिराळा
2 २८६. तळमळ
3 २८५. जनी-भोजनी
Just Now!
X