समर्थ सांगत आहेत की, हे मना तू सज्जनाची भेट घे.. हा सज्जनच राघवाची भेट घालून देईल! आता या सज्जनाची आणि त्यायोगे सद्गुरूंची भेट कशी होईल? तर मनोबोधाच्या श्लोकांची सुरुवात जिथून झाली त्या श्लोकाकडेच पुन्हा वळावं लागेल.. त्या श्लोकात समर्थानी सांगितलं होतं, ‘‘मना सज्जना भक्तिपंथेचि जावें। तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें।।’’ हे मना,सज्जनांचा जो भक्तीपंथ आहे त्या वाटेनंच जा म्हणजे मग तो श्रीहरी, सर्व भवदु:खांचं हरण करणारा सद्गुरू स्वभावत:च तुला पावेल! समर्थानी दासबोधात म्हटलं आहे की, ‘‘जे अंकित ईश्वराचे। तयांस सोहळे निजसुखाचे। धन्य तेचि दैवाचे। भाविक जन।।’’ (दशक ३, समास १०). भक्तीपंथावर ज्या सज्जनांच्या मागोमाग चालायचं आहे ते भगवंताचे निजजन कसे आहेत? तर ‘अंकित ईश्वराचे’! ते ईश्वराला अंकित आहेतच, पण ईश्वरही त्यांना अंकित आहे, त्यांच्या आधीन आहे! आणि मग त्यांच्या जीवनातला प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण म्हणजे जणू निजसुखाचा, आत्मसुखाचा सोहळाच!! अहो, आज वैज्ञानिक प्रगतीचा वेग विलक्षण आहे. अनेक यंत्रं, उपकरणं आहेत. म्हणून जगण्याचा वेगही विलक्षण आहे, पण तेवढंच असमाधान, अतृप्ती, अस्थिरताही जगण्यात आहे. बरं, ही स्थिती काही आजची नाही. प्रत्येक काळात हीच स्थिती होती आणि म्हणूनच बाह्य़ परिस्थिती कशीही असली तरी त्यातही समाधानी, तृप्त आणि स्थिर असलेल्या सज्जनांचा प्रभाव समाजावर पडलाच. त्यांच्या सहवासात जे क्षणभरही आले त्यांच्यावर त्या संगाचा प्रभाव पडल्याशिवाय राहिला नाही. बाहेरच्या कोलाहलातून या संगाच्या प्रभावात शिरताच मनातली अशांतता, अस्थिरता काही काळ का होईना मावळते, या अनुभवाची जाण आली की प्रत्येक काळातला माणूस जागा होत गेला. मग अशी आंतरिक धारणा मला का लाभत नाही, या विचारानं आजही जर आपल्या मनात तळमळ निर्माण होत असेल तर नुसता सज्जनांचा संग लाभून उपयोग नाही. ज्या धारणेनं ते जगतात तशी धारणा व्हावी, यासाठी अभ्यास अपरिहार्य आहे. सज्जनांच्या भक्तीपंथावर त्यांच्या बोधानुरूप वाटचाल करीत राहणे, हाच तो अभ्यास आहे! सज्जनांच्या जगण्याची रीत मोठी विलक्षण असते. समर्थ म्हणतात, ‘‘आयुष्य हेचि रत्नपेटी। माजीं भजनरत्नें गोमटीं। ईश्वरीं अर्पूनियां लुटी। आनंदाची करावी।।’’ (दशक २, समास १०, ओवी २७). आयुष्य म्हणजे रत्नांनी भरलेली पेटी आहे! आणि ही रत्नं कसली? तर भजनरत्नं आहेत! ती ईश्वराला अर्पून ते आनंद लुटत आहेत.. भजनांची रत्नं.. भजन म्हणजे गायलं जातं ते भजन का हो? एकनाथी भागवतात भजनाचा मोठा गूढ अर्थ सांगितला आहे. समस्त जीवन भगवंताला अर्पून हा देह आणि या देहाचा सारा प्रपंच हा त्या भगवंताचा आहे, हे मानून कर्तव्यकर्म करीत त्याच्या अनुसंधानात जगणं हेच खरं मुख्य भजन आहे, असं एकनाथ महाराज म्हणतात. तर सज्जनांचं भजन हे असं आहे. त्यांच्या जगण्यातला प्रत्येक क्षण हा त्या भगवंताशी जोडलेला आहे. त्या भगवंतापासून ते क्षणभरही विभक्त नाहीत आणि म्हणून त्यांचं जगणं हीच खरी भक्ती आहे. तोच खरा भक्तीपंथ आहे! आता ‘‘श्रवणं कीर्तनं विष्णो: स्मरणं पादसेवनम्। अर्चनं वन्दनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम्।।’’ हा नवविधा भक्तीचं वर्णन करणारा श्लोकही विख्यात आहेच. श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य व आत्मनिवेदन या भक्तीच्या नऊ पायऱ्या आहेत. या पायऱ्यांनी सज्जन, भगवंताचे निजजन भगवंताशी जोडले गेले आहेत. या वाटेनं जायचा प्रयत्न करूनच आपल्याला सज्जनांची आणि राघवाची भेट होणार आहे.
-चैतन्य प्रेम
संग्रहित लेख, दिनांक 9th Jun 2016 रोजी प्रकाशित
१११. भेटीचा मार्ग..
समर्थ सांगत आहेत की, हे मना तू सज्जनाची भेट घे.. हा सज्जनच राघवाची भेट घालून देईल
Written by लोकसत्ता टीम
First published on: 09-06-2016 at 03:19 IST
मराठीतील सर्व मनोयोग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samarth ramdas philosophy