साधनपथावर येईपर्यंत जगात आपण ‘मी’ ‘मी’ करीत जगत होतो. विकारांचे गुलाम असूनही राजाच्या तोऱ्यानं वागू पाहत होतो, आपल्याच ‘मी’पणावर विजय मिळाला नसताना जग जिंकू पाहत होतो. आता जर जीवनाची सूत्रं सद्गुरूंकडे दिली आणि त्यांच्या बोधानुरूप जगण्याचा प्रयत्न करू लागलो तरच हे चित्र पालटेल, यासाठी समर्थ सांगतात, ‘‘म्हणोनी म्हणा रे म्हणा देवराणा!’’ कर्तेपण देवाला, सद्गुरूंना द्यायचं आहे. अंत:करणात आजवर मनाचं राज्य सुरू होतं.. मनमानी सुरू होती. भ्रम-मोहजन्य कल्पनांची माती टाकून आपण सद्बुद्धीला दडपून टाकलं होतं. मीराबाई एका भजनात म्हणतात, ‘‘मूरख को तुम राज दियत हो, पंडित फिरत भिखारी’’! मूर्ख अशा मनाला तुम्ही राज्य दिलंत आणि सद्बुद्धीला भिकारी करून टाकलंत! म्हणजे मन राजा बनलं आणि त्या मनाच्या इच्छापूर्तीसाठी भीक मागण्याचं तंत्र तेवढं बुद्धीच्या जोरावर आत्मसात केलं जात होतं! ती सद्बुद्धी ज्यांच्याकडून येते त्या सद्गुरूंनाच मग जीवनाची सूत्रं का देऊ  नयेत? आता ही जी सूत्रं देण्याची प्रक्रिया आहे ना तिची सुरुवात होते ते साधं-सोपं नाम प्रथम तोंडानं घेण्यानंच. आता हे जे ‘नाम’ म्हणत आहे ना त्याचा अर्थ सद्गुरूंनी सांगितलेली साधना, असा घ्यायचा आहे. कारण काही जण म्हणतील की, आम्हाला सद्गुरूंनी नामसाधना दिलेली नाही. तर मग आम्हालाही मुक्ती नाही, असं का समर्थाना म्हणायचं आहे? तर अर्थातच नव्हे. आता समर्थानी नामाचाच उल्लेख का केला? याची काही कारणं आहेत. पहिली गोष्ट नामसाधना वरकरणी सर्वात सोपी, पण सर्वात व्यापक आहे. दुसरी गोष्ट त्यांचा नामाचा मार्ग होताच. तिसरी गोष्ट ही साधना सर्व धर्म आणि वर्गभेदांपलीकडची आहे. सर्वात सूक्ष्म गोष्ट अशी की, काहींचा मार्ग नामसाधनेचा नसेलही, पण सद्गुरूंवर जसजसं प्रेम वाढत जातं तसतसं साधना करीत असताना आपल्या सद्गुरूंच्या नामाचं सहज स्मरण होतंच! असो.

तर सांगायचा मुद्दा असा की, समर्थ जेव्हा ‘‘मुखीं नाम नाही तया मुक्ती कैची?’’ असं विचारतात तेव्हा त्याचा अर्थ जो सद्गुरूंनी दिलेली साधना करीत नाही, जो सद्गुरू बोधानुरूप जीवन जगत नाही, त्याला मुक्ती नाही, असाच आहे! आणि जगत असताना जगाच्या गुंत्यात न अडकता मनानं स्वतंत्र होणं हेच मुक्त होणं आहे, याचा उल्लेख आधी झालाच आहे. ही स्थिती जर हवी असेल तर त्यासाठी देव अर्थात सद्गुरू हा जीवनाचा सूत्रधार झाला पाहिजे. पण सद्गुरू आणि तो भगवंत अभिन्न आहेत, हे जाणवलं तरच त्यांच्या हाती सूत्रं देता येतील ना? पण ना ती अभिन्नता जाणवते, ना देवाचं अस्तित्व ठामपणानं जाणवतं!  श्रीहरिकाका गोसावी म्हणून एक थोर सत्पुरुष कर्नाटकात हत्तरगी येथे होऊन गेले. डॉ. दीनानाथ सोनार हे त्यांचे पट्टशिष्य. १९६०च्या सुमारास त्यांना हरिकाकांचं प्रथम दर्शन झालं. त्या वेळी त्यांनी काकांना विचारलं की, जगात देव आहे का आणि असला तर तो दिसत का नाही? पू. काका त्यावर म्हणाले, ‘‘आकाशात चांदण्या दिसतात ना? तसा तो दिसला पाहिजे!’’ डॉक्टरही म्हणाले की, आमचंही तर हेच म्हणणं आहे! पू. काकांनी परत विचारलं, ‘‘आकाशातल्या चांदण्या दिवसा दिसतात का?’’ डॉक्टर म्हणाले, ‘‘नाही, पण त्यात काय आहे? ही तर सामान्य बाब आहे.’’ हसून काका म्हणाले, ‘‘चांदण्या जिथल्या तिथे असूनही प्रखर सूर्यप्रकाश आणि उन्हामुळे त्या दिसत नाहीत. तसाच त्रिगुणांचा झगमगाट आणि अहंकाराची उष्णता यामुळे देवही जिथल्या तिथे असूनही दिसत नाही!’’ हा अहंकार मावळू लागण्याची आणि त्रिगुणांचा गुंता उकलण्याची सुरुवातही हरिनामापासूनच आहे!

चैतन्य प्रेम