20 November 2017

News Flash

४२०.  ध्येय-साधना : २

जीवनात खरी तृप्ती हवी असेल तर ती रामाच्याच योगानं शक्य आहे.

चैतन्य प्रेम | Updated: August 29, 2017 3:01 AM

जीवनात खरी तृप्ती हवी असेल तर ती रामाच्याच योगानं शक्य आहे. जेव्हा मन त्या रामाच्याच लीलांच्या रसपानात तल्लीन होईल तेव्हाच खरी धन्यता लाभेल. त्या रामाचा बोध जसजसा अंतकरणात व्याप्त होईल तसतसा देहभाव ओसरू लागेल. मनाच्या समस्त इच्छा रामरूपातच लय पावतील. जेव्हा अशी स्थिती येत जाईल तेव्हाच जन्माचं सार्थक होईल, असं समर्थ सांगतात. पण हे रामसुख म्हणजे काय, रामबोध म्हणजे काय, रामकथा म्हणजे काय आणि रामरूप म्हणजे काय, हे उमजलं पाहिजे. ते जोवर उकलत नाही तोवर खरी वाटचाल सुरू होणार नाही. त्याकडे आता वळू. एक तर निश्चित आहे की, माणूस हा सुखासाठीच जगत असतो, पण दुखाचा अभाव म्हणजे सुख अशी त्याची सुखाची व्याख्या असते. बादृष्टय़ा परिस्थिती दुखाची भासत असूनही माणूस त्यात सुखी होऊ शकतो, हे आपल्याला पटू शकत नाही. म्हणूनच सुख मिळाल्यावरही ते कायमचं टिकेल, अशी निश्चिन्ती मनाला नसते. सुखापाठोपाठ सुखच मिळत राहील, दुख येणारच नाही, अशीही शाश्वती नसते. त्यामुळे सुख लाभूनही माणूस पूर्ण तृप्त कधी होत नाही. ‘रामसुखा’चा लाभ झाला तर मात्र काय होतं? समर्थ फार चपखल शब्दयोजना करीत सांगतात की, ‘‘जगीं धन्य तो रामसुखें निवाला!’’ त्या ‘रामा’चं सुख एकदा लाभलं ना की त्या सुखानं माणूस निवतो!

हे निवणं म्हणजे ‘हवेपणा’च्या हावेनं मनाचं सततचं पोळलं जाणं थांबणं. ‘नकोपणा’च्या आवेगांनी मनात भडकत पसरलेला दाह शमणं. पण हे ‘रामा’चं सुख म्हणजे नेमकं काय हो? हा राम म्हणजे परमात्मा राम आहे का? तर हा राम व्यक्तिवाचक शब्द नाही, तर धारणासूचक शब्द आहे. ‘राम’ हा उल्लेख इथं व्यक्तीचा नाही, तर सदगुरू बोधाद्वारे प्राप्त होणाऱ्या शाश्वत तत्त्वाचा हा उल्लेख आहे. प्रभू राम हेच समर्थाचे सद्गुरू होते आणि म्हणून सद्गुरूच्याच आधारावर ज्यानं खरं सुख प्राप्त करून घेतलं तोच या जगात धन्य झाला, असाही अर्थ आहेच. आता सद्गुरूंच्या आधारावर सुख प्राप्त होतं म्हणजे काय? तर सुखाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन पालटतो. मनासारखं होणं म्हणजेच सुख, असं आपण आधी मानत होतो. मात्र सद्गुरू बोधानं जसजसे आपण अंतर्मुख होत जातो तसतसं सुखाबाबतचं आकलन शुद्ध होऊ लागतं. मग बरेचदा आपल्या मनासारख्या गोष्टी घडत नाहीत किंवा घडल्या नाहीत, ही परमात्म्याची कृपाच आहे, ही जाणीव होते. कारण मनाच्या प्रार्थना, आग्रह, हट्ट हे अनेकदा अवास्तव, भ्रामक, निर्बुद्ध आणि आत्मघातकच होते वा असतात हे उमजू लागतं. जीवन आपण कसं जगतो, याचं अवधान जसं वाढू लागतं तसं अनवधानानं आपण स्वतहूनच किती दुख ओढवून घेतो, याची जाण येऊ लागते. सुख मिळविण्याच्या नादात आपण किती तऱ्हेच्या दुखाची बीजं रोवतो, याची जाण वाढू लागते. अपूर्ण आधार पूर्ण सुख देऊ शकत नाहीत, अशाश्वत आधारावर शाश्वत सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. शाश्वत आणि पूर्ण सुख हवं असेल, तर त्यासाठीचा आधारही शाश्वत आणि पूर्णच असला पाहिजे, हे समजू लागतं.

पण नेमकं शाश्वत काय आणि अशाश्वत काय, पूर्ण काय अन् अपूर्ण काय हे नेमकेपणानं उकललं तर पाहिजे! आणि ते सद्गुरूशिवाय समजू शकत नाही. जीवनात नेमकं शाश्वत काय आहे, त्याच्या प्राप्तीचा मार्ग कोणता आणि त्या मार्गावरून कसं चालायचं हे तोच शिकवतो आणि त्या मार्गावरून चालवतोही! त्या सद्गुरूच्या आधारावर जे सुख प्राप्त होतं तेच पूर्ण तृप्ती देणारं असतं.

 

 

First Published on August 29, 2017 3:01 am

Web Title: samarth ramdas philosophy 291