News Flash

४३५. वासना-लय : २

 श्रीगोंदवलेकर महाराजांचे एक अनन्य भक्त होते भाऊसाहेब केतकर.

 

एका भगवंताच्या चरणी आपल्या इच्छा वसवाव्यात, असं समर्थ रामदास ‘मनोबोधा’च्या १२८ व्या श्लोकात सांगत आहेत आणि या ‘वसो दे’चे मांडा, केंद्रित करा, सुपूर्द करा वगरे अर्थ गेल्या वेळी सांगितले. तसंच प्रापंचिक मागणं सोडाच, पण आध्यात्मिक साधना सिद्ध झाल्यावरही काय मागावं, हे कळत नसल्यानं कशी गफलत होते, हे वसुदेवांच्या उदाहरणावरून आपण पाहिलं.

इथं एक सूक्ष्म गोष्ट लक्षात घ्या बरं.. वसुदेवांनाही काय मागावं हे कळलं नाही, असं वरकरणी भासत असलं तरी ते सत्य नाही. साधना करणाऱ्यांनी काहीही मागणं म्हणजे आत्महानीच कशी असते, हे स्पष्ट व्हावं यासाठी भगवंताचीच ही लीला होती आणि त्यात वसुदेव हे सहभागी तेवढे झाले. जे ज्ञान त्यांनी नारदांना विचारलं आणि नारदांनी त्यांना सांगितलं त्यातही लोकांच्या ज्ञानलाभासाठी निमित्त ठरण्याचीच त्यांची भूमिका होती. असो. तर साधना सिद्ध झाल्यावरही काही मागायची इच्छा उरणं म्हणजे स्वतहून पुन्हा मोहाच्या जाळ्यात अडकवून घेणं.

तेव्हा मागणंच संपलं पाहिजे, हेच खरं. आता ते सोपं का आहे? ज्याला गरज असूनही काही मागावंसं वाटलं नाही त्या सुदाम्याचं जगणंच कृष्णानं सोन्याचं करून टाकलं.. आणि युद्धात मदत मागायला आलेल्या दुर्योधनाला याच कृष्णानं, ‘मी एकटा हवा की माझं लाखांचं सन्य हवं,’ असं विचारत आकडय़ांच्या चकव्यात फसवलं! एकापेक्षा लाखांचं सन्यच अधिक उपयोगी या भ्रमात फसून दुर्योधनानं सन्य मागितलं. राजाविरुद्ध त्याचंच सन्य कसं लढेल, हा विचारही त्याच्या मनाला शिवला नाही. तसं जो सर्वाधार आहे त्याला सोडून काहीही मागणं म्हणजे त्याच्यापेक्षा मोलाची अन्य वस्तू आहे, हा भ्रम होणं. जो सर्वाधार आहे त्याला सोडून सामान्य गोष्टीला आधारवत मानून ती मागणं. तर जिथं भल्याभल्यांचं मागणं सुटत नाही तिथं साधना पथावर वाटचाल सुरू केलेल्या साधकाच्या मनात मागण्याची इच्छा डोकावणं अगदी स्वाभाविक आहे. त्यामुळे मनात एकही वासना म्हणजे इच्छाच उद्भवता कामा नये, हे सांगणं त्याला झेपणारं नाही.

म्हणून वासनालयीतच आजवर अडकलेल्या साधकाच्या वासनेचा परमात्मचरणी विलय होण्यासाठी समर्थ सांगतात, ‘‘मना वासना वासुदेवीं वसों दे’’! हे मना, तुझ्या अंतकरणात ज्या काही इच्छा आहेत त्यांना परमात्म्यापाशीच वसव!

आपल्या इच्छांना दोन अंगं आहेत. पहिले अंग आहे ‘हवेपणा’चं आणि दुसरं अंग आहे ‘नकोपणा’चं. म्हणजेच काही गोष्टी हव्याशा वाटतात, व्हाव्याशा वाटतात तर काही गोष्टी नकोशा वाटतात, टळाव्याशा वाटतात. तर या दोन्ही इच्छा परमात्म्यापाशीच मांडाव्यात. म्हणावं की, ‘हे देवा अमुक एक व्हावं, असं वाटतं. पण ते जर माझ्या हिताचं असेल, तरच घडव आणि हिताचं नसेल तर घडू देऊ नकोस!’ एकदा ही प्रार्थना करण्याची सवय अंगी मुरू लागली की मागूनदेखील जी गोष्ट मिळाली नाही ती आपल्या हिताची नव्हतीच, हा भाव निर्माण होऊ लागेल आणि मग ते अनुभवानं सिद्ध होऊन पटूही लागेल.

श्रीगोंदवलेकर महाराजांचे एक अनन्य भक्त होते भाऊसाहेब केतकर. त्यांच्या पत्नीची प्रकृती अतिशय चिंताजनक झाली तेव्हा श्रीमहाराजांनी त्यांना मोठय़ा वात्सल्ययुक्त स्वरात विचारलं- ‘भाऊसाहेब, आता काय करावं?’ बघा हं श्रीमहाराज ठरवतील तर प्रकृती सुधारेल, असा भाऊसाहेबांचा पूर्ण भाव होता. तरी ते काय म्हणाले? की, ‘महाराज, जे त्यांच्या हिताचं आहे तेच करा!’ इच्छांचा लय कसा व्हावा याचं हे श्रेष्ठ उदाहरण आहे. ते आपल्या आवाक्यातलं नाहीच, पण निदान त्यामुळे सामान्य इच्छा तरी परमात्म्याच्या इच्छेवर सोडण्याची इच्छा मनात निर्माण होईल!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2017 3:00 am

Web Title: samarth ramdas philosophy 302
Next Stories
1 वंगणतेलाचा सहगुणक
2 ४३४. वासना-लय :१
3 ४३२. आत्मभान
Just Now!
X