02 March 2021

News Flash

४३६. इच्छार्पण

जन्मापासून मरेपर्यंत माणसाच्या मनातून इच्छा काही जाता जात नाही.

जन्मापासून मरेपर्यंत माणसाच्या मनातून इच्छा काही जाता जात नाही. माणसाचा देह मरतो, पण त्याची इच्छा मरत नाही! त्या अपूर्त इच्छा पूर्ण करण्यासाठी तो पुन्हा जन्म घेतो. त्या जन्मात आधीच्या अनंत जन्मांत अपूर्ण राहिलेल्या इच्छा तर असतातच, पण या जन्मीही क्षणोक्षणी नवनव्या इच्छा उत्पन्न होत असतात. तेव्हा इच्छेतच, वासनेतच जन्मलेल्या आणि क्षणोक्षणी नवनव्या इच्छा, वासना ज्याच्या मनात प्रसवत आहेत अशा माणसाला निरीच्छ करणं, निर्वासन करणं, ही किती कठीण गोष्ट असेल! ज्याचं मन अनंत कामनांनी सदोदित भरलेलं आणि भारलेलं आहे, त्याला निष्काम करणं, ही किती अवघड गोष्ट असेल! पण साधकासाठी ती स्थिती साधणं अनिवार्यच आहे. या प्रक्रियेचे सुरुवातीचे चार अत्यंत महत्त्वाचे टप्पे समर्थ रामदासांनी ‘मनोबोधा’च्या १२८ व्या श्लोकात मांडले आहेत. त्यातला, ‘‘मना वासना वासुदेवीं वसों दे।’’ हा पहिला टप्पा आपण गेल्या भागात जाणून घेतला. ‘मना कामना कामसंगीं नसों दे,’ हा या प्रक्रियेतला दुसरा तर ‘मना कल्पना वाउगी ते न कीजे,’ हा तिसरा टप्पा आहे. ‘मना सज्जना सज्जनीं वस्ति कीजे,’ हा चौथा टप्पा तर संपूर्ण साधनेचा पायाच आहे.

तर पहिला टप्पा सांगतो की, इच्छा मारून टाकण्याची धडपड करू नका. कारण त्यामुळे इच्छा मरणार तर नाहीतच, उलट अधिक उग्र होतील! त्यामुळे मनात उद्भवणाऱ्या ज्या काही इच्छा आहेत, वासना आहेत, कामना आहेत, त्या मारण्याच्या वा दडपण्याच्या फंदात न पडता त्या देवाच्या पायी वसवाव्यात. म्हणजे काय करावं? तर त्याच्या दोन पायऱ्या आहेत. आपली इच्छा देवापुढे मांडणं आणि जे होईल, मग ते इच्छेनुसार होवो की इच्छेविरुद्ध होवो, तेच माझ्या हिताचं आहे, या भावनेनं ते स्वीकारण्याचा अभ्यास करणं, ही झाली पहिली पायरी. अखेरीस सर्वार्थानं भगवंताचं होण्याच्या इच्छेवाचून अन्य इच्छाच न उरणं, ही झाली दुसरी पायरी. अर्थात या संपूर्ण प्रक्रियेचा जो अखेरचा टप्पा आहे.. ‘मना सज्जना सज्जनीं वस्ति कीजे,’ तो साधेपर्यंत या दुसऱ्या पायरीवर खऱ्या अर्थानं स्थिर होता येत नाही. तेव्हा पहिला टप्पा असा की, मनातल्या इच्छा एका परमात्म्यापुढेच मांडा. आपल्या इच्छा जगच पूर्ण करील आणि त्या जगातच पूर्ण होतील, या भावनेनं जगाचा आधार मिळवण्यासाठी आणि टिकविण्यासाठी आपण आजवर धडपडत होतो. त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जगाचेच भले-बुरे मार्ग अवलंबत होतो. आता त्या इच्छा भगवंतावर सोपवून त्यांच्या पूर्तीसाठी विधिवत आटोकाट प्रयत्न तेवढे करायचे आहेत. त्या इच्छा पूर्ण झाल्या तरी ती भगवंताची इच्छा आणि पूर्ण झाल्या नाहीत तरी ती भगवंताचीच इच्छा, असं मानण्याचा आणि स्वीकारण्याचा अभ्यास सुरू केला पाहिजे. जे घडतं ती भगवंताचीच इच्छा असं मानणं आणि ते तसं वाटणं, यात फरक आहे, असं श्रीगोंदवलेकर महाराज म्हणत. पण आपण निदान सुरुवातीला मानायला तर लागू! बरं आता आणखी एक गोष्ट. जगात राहत असल्याने जगाचे सर्वच मार्ग आपल्याला त्यागता येत नसतील किंवा ते त्यागून निश्चिंत राहण्याइतपत मनोधैर्य नसेल, तर त्या मार्गानंही प्रयत्न करून पाहावा. पण त्या प्रयत्नांनीही यश मिळत नसेल, तर ती गोष्ट न होणंच हिताचं आहे, हे लक्षात घ्यावं! बरं, यात जगाच्या ज्या मार्गानं प्रयत्न करायला सांगितलंय ते मार्ग दुसऱ्याची आर्थिक हानी करणारे, दुसऱ्याला शारीरिक वा मानसिक इजा  पोहोचविणारे मात्र नसावेत. तेव्हा सर्वसामान्य इच्छांपासून ते हळूहळू मोठय़ा इच्छांपर्यंत, सर्व इच्छा भगवद्इच्छेवर सोडून आपल्या बाजूनं यथायोग्य प्रयत्न तेवढे करण्याचा अभ्यास सुरू केला पाहिजे. या साधनापथावर ज्याला खरोखरच चालायचं आहे त्यानं तर हा अभ्यास अत्यंत प्रामाणिकपणे केलाच पाहिजे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2017 2:53 am

Web Title: samarth ramdas philosophy 303
Next Stories
1 ४३५. वासना-लय : २
2 वंगणतेलाचा सहगुणक
3 ४३४. वासना-लय :१
Just Now!
X