11 December 2017

News Flash

४५१. आत्मस्थ

जे जे निर्थक आहे त्याची गोडी साधकाच्या मनातून ओसरू लागली

चैतन्य प्रेम | Updated: October 12, 2017 4:12 AM

जे जे निर्थक आहे त्याची गोडी साधकाच्या मनातून ओसरू लागली की तो आपल्या जीवनाचं सार्थक करून घेण्याच्या उद्योगास लागतो. त्याच्या जीवनव्यवहाराचा लोकांवर प्रभाव पडल्याशिवाय राहत नाही. त्याच्या जगण्यातील मूळ परम शुद्ध हेतूकडे जर कुणी लक्ष देईल, तर पाहणाऱ्याच्या अंत:करणातील भावही उन्नत होईल. त्यासाठी साधकाला जानकीनायकाचा म्हणजे रामाचा विवेक करायला समर्थ सांगत आहेत. आता ‘रामाचा विवेक’ म्हणजे प्रत्येक गोष्टीत राम पाहणं, हा अर्थ आहे. तसंच राम ज्या विवेकानं वागत होता तो विवेक अंगी बाणव, असा एक अर्थ आहे. आता हा ‘जानकीनायकाचा विवेकु’ आहे कसा, त्याचं सूचन ‘मनोबोधा’च्या पुढील म्हणजे १३२व्या श्लोकात समर्थ करीत आहेत. हा श्लोक आणि त्याचा प्रचलित अर्थ प्रथम पाहू. मग मननार्थाकडे वळू. तर हा श्लोक असा आहे :

विचारूनि बोले विवंचूनि चाले।

तयाचेनि संतप्त तेही निवाले।

बरें शोधिल्यावीण बोलों नको हो।

जनीं चालणें शुद्ध नेमस्त राहो।। १३२।।

प्रचलित अर्थ : ज्याचे बोलणे-चालणे सर्व काही विचारपूर्वक होत असते त्याच्या संगतीने संसारग्रस्त जीवांनाही विश्रांतिसुख मिळते. म्हणून हे मना! पूर्ण विचार केल्याशिवाय तोंडातून कधी शब्द काढू नकोस. जनातले तुझे वागणे नेहमी शुद्ध व नेमस्त असू दे.

आता मननार्थाकडे वळू. प्रभू राम विचारपूर्वक बोलत असत आणि प्रत्येक कृती दक्षतेनं, सावधानतेनं, काळजीपूर्वक करीत असत. याचं कारण ‘मर्यादापुरुषोत्तम’ असा तो अवतार होता. त्यामुळे उच्चार आणि आचार यात मर्यादशील वर्तन त्यांच्याकडून घडलं. म्हणजे अवतार भूमिकेनुसार आपल्या शिरी आलेली जबाबदारी निभावताना त्यांनी कधी मर्यादेचा भंग केला नाही. त्यांच्या या वर्तनानं संसार तापानं पोळत असलेल्या जीवांनाही विश्रांती लाभली. त्यामुळे समर्थ सांगत आहेत की, हे साधका, रामभक्ती करू इछितोस तर रामाप्रमाणे आचार आणि उच्चार हा मर्यादशील ठेव. निर्थक काही बोलू नकोस आणि सवंग वर्तन करू नकोस. संतजनांच्या सहवासात आलास तर आचरण शुद्ध आणि अनाग्रही ठेव. आता तिसऱ्या चरणाची अजून एक अर्थछटा आहे. साधन करू लागलेल्या माणसाचं वागणं-बोलणं हे हळूहळू चित्ताकर्षक होत जातं. दुसऱ्याशी तो अधिकाधिक प्रेमानं वागण्याचा व बोलण्याचा प्रयत्न करतो. त्यानं संसारतापानं मन पोळलेल्या लोकांना थोडा आनंद चाखता येऊ  लागतो आणि इथेच मोठी परीक्षा सुरू होते. स्वत:ला ज्ञान झालेलं नसताना असा साधक लोकांशी शाब्दिक ज्ञानचर्चेत गुरफटण्याची शक्यता असते. स्वत:च्या हाती शाश्वत सत्याचं बोटही आलेलं नसताना जगात शाश्वत काय आहे, खरं शाश्वत सुख कशात आहे, यावर हा साधक तासन्तास गप्पा मारू लागतो. म्हणून समर्थ बजावतात की, ‘‘बरें शोधिल्यावीण बोलों नको हो!’’ तेव्हा अधिकाधिक वेळ हा आत्मशोध, आत्मचिंतन, आत्मपरीक्षण यातच गेला पाहिजे. जगाशी जो संपर्क आहे, व्यवहार आहे तो करताना आत्मभान बाळगण्याचा अभ्यास होत राहिला पाहिजे. खडतर रस्त्यावरून चालताना हातात जर विजेरी असली तर चालणं जसं सोपं होतं त्याप्रमाणे असा अभ्यास सुरू असेल तर ‘विचारूनि बोले विवंचूनि चाले,’ ही स्थिती साधते. मग जगातला वावर हा अधिक सहज होतो. उमदीकर महाराज म्हणत की, ‘मनात नामस्मरण सुरू आहे की नाही, याचं भान बाळगून जगात व्यवहार केला पाहिजे.’ असा अभ्यास करणाऱ्या साधकाच्या मनातली अशांती आपोआप ओसरत जाईल आणि त्याच्या सहवासात जे जे येतील त्यांच्या मनालाही विश्रांती जाणवेल.

First Published on October 12, 2017 4:12 am

Web Title: samarth ramdas philosophy 317