नाम जसजसं सतत होत राहील आणि ते खोलवर पोहोचू लागेल तसतसा आंतरिक पालट घडू लागेल.  आता हे कसं साधत असेल, याचा थोडा विचार करू. आपल्या मनात सदोदित जगाचे विचार घोळत असतात. जगात वावरताना आपलं मन अनंत विचार आणि अनंत कल्पनांनी भरून आणि भारून गेलं असतं. हे सारे विचार आणि साऱ्या कल्पना या शाब्दिकच असतात. शब्दमय भासणारं नामच या शाब्दिक विचार आणि कल्पनांचा प्रभाव कमी करू लागतं. सदोदित अशाश्वत आणि संकुचित विचारांनी आणि कल्पनांनी जे मन भरून असतं तेच मन नामानं शाश्वताच्या विचारात तल्लीन होऊन व्यापक होऊ लागतं. मग जगातल्या चढउतारांच्या प्रभावाचा जोर कमी होऊ लागतो. मन अधिक शांत आणि स्थिर होऊ लागतं. पण यासाठी नाम सदोदित मनात चालावं लागतं. आता नाम मनात सदोदित चालणं म्हणजे काय? नामाचं सततच आवर्तन मनात सुरू असणं हेदेखील मनात नाम सतत सुरू असणं आहेच, पण नामस्वरूप सद्गुरूंच्या जाणिवेत सहजतेनं सतत राहाता येणं, हेच सदोदित नामाचं स्फुरण आहे. सद्गुरूंच्या जाणिवेत असं सहजतेनं आणि सतत राहाता येणं हे केवळ प्रेमानंच साधतं. आणि जिथं प्रेम असतं तिथं स्मरण आपोआपच असतं. ही स्थिती केवळ नामाभ्यासानंच किंवा सद्गुरूप्रदत्त साधनेनंच साध्य होते आणि मग अंत:करण रामाशी अर्थात सद्गुरूंशी सदोदित जोडलं जातं. त्यामुळे नामाचा कंटाळा केला, साधनेचा कंटाळा केला तर राम कसा जोडला जाईल, मना वीट मानूं नको बोलण्याचा। पुढें मागुता राम जोडेल कैंचा?।  असं समर्थ विचारतात आणि यातील पुढें मागुता राम जोडेल कैंचा?। या चरणाचा सरळ अर्थ ‘पुढे राम कसा जोडला जाईल?’ हा जितका योग्य आहे तितकाच त्याचा गूढार्थही मार्मिक आहे. ‘‘पुढे आणि मागे राम कसा जोडला जाईल?’’ हा या चरणाचा गूढार्थ आहे. आता आपण एखादं स्तोत्र म्हणतो तेव्हा त्यातील प्रत्येक श्लोकाच्या आधी आणि नंतर एखादा मंत्र किंवा एखादा जप जोडला जातो, त्याला कवच म्हणतात. जे पारायण आपण करतो आहोत त्यातील श्लोकांचं पावित्र्य हे कवचमंत्र जपत असतात किंवा आपल्याकडून ते पारायण सदोष झालं तरी कवचमंत्रामुळे तो दोष लागत नाही. अगदी त्याचप्रमाणे जगात वावरताना हे रामस्मरण, हे सद्गुरूस्मरणच आपल्या प्रत्येक व्यवहाराच्या आगे-मागे कवचाप्रमाणे काम करीत असते. सद्गुरूस्मरण हे व्यवहारासाठी, व्यावहारिक सोयीसाठी, व्यवहार सुरळीत व्हावा यासाठी किंवा व्यावहारिक यशासाठी नाहीच, पण जगातल्या व्यवहारांचा प्रभाव मनावर पडून मनाच्या उध्र्वगतीत अडथळा येण्याचाही धोका असतो. त्यामुळे व्यवहार करतानाही त्या व्यवहाराचा प्रभाव मनावर न पडणं आणि त्या व्यवहारात मनानं न गुंतणं हे सद्गुरूस्मरणरूपी कवचानंच साधत असतं. जीवनातल्या प्रत्येक व्यवहाराचं खरं मोल उमगल्यानं त्या व्यवहारात मनाचं अडकणं कमी होऊ लागतं. मग हळूहळू हे सद्गुरूस्मरणच व्यापक बनत जातं आणि प्रपंचातलं वावरणं बिनचूक आणि कर्तव्यापुरतं होऊ लागतं. हे सारं साधतं त्याची सुरुवात शाब्दिक भासणारं नामच असतं! त्यामुळेच समर्थ सांगतात की, मना वीट मानूं नको बोलण्याचा। हे मना, नाम म्हणजे भले नुसता शब्दोच्चार भासत असला तरी त्याचा वीट मानू नकोस. तेच नाम नेटानं घेत गेल्यावर सद्गुरू स्मरण साधू लागतं. मनाला वेगळ्याच तृप्तीचा अनुभव येऊ लागतो. नुसतं साधन शांतता देत नाही, त्यातलं स्मरण शांतता देतं, असं श्रीगोंदवलेकर महाराजही म्हणतात ना? मग त्या नामाची आणि त्यातील सद्गुरूंच्या स्मरणाची गोडी वाढू लागली की सदोदित त्यांच्या आंतरिक सहवासाचा लाभ होतो. राम अर्थात सद्गुरू अंत:करणाशी अखंड जोडला जातो!

 -चैतन्य प्रेम

temperature drop in mumbai
तापमानात घट; मात्र आर्द्रतेमुळे उष्मा कायम
loksatta ulta chashma raj thackeray
उलटा चष्मा : असेही सेवा पुरवठादार..
alu in garden
निसर्गलिपी : येता बागेला बहर…
vada pav recipe
वडापाव नव्हे! इडली वडापाव; कधी खाल्ला का? जाणून घ्या ही सोपी रेसिपी