संतसज्जनांची संगत लाभली, देहबुद्धीच्या तालानुसार जगण्यातला फोलपणाही जाणवू लागला आणि पावलं अध्यात्माच्या मार्गावर वळली.. पण एवढय़ानं देहबुद्धी हार थोडीच मानते! जगावेगळं आणि जगाकडून मोठेपणा मिळू शकेल, असं जे काही माणूस करतो त्याचा गवगवा करण्याची त्याला सवय असते. मग एखादा कसा कडक उपवास करतो, एखादा कसा तासन् तास पूजा करतो, एखादा कसा तीर्थयात्रा करतो.. याचं कौतुक जेव्हा जग करतं, तेव्हा ‘मी’च सुखावतो. आपल्या भौतिक जीवनाला जराही धक्का लागू न देता आणि उलट भौतिक जीवनात जगाच्याच सर्व क्लृप्त्या वापरून ‘यश’ मिळवणारा माणूस जर असं काही करीत असेल, तर त्याचा गवगवा अधिकच होतो. तर माणूस या स्वकौतुकाची गोडी चाखत या मार्गावर येतो. सगळेच काही असे नसतात. काहीजण खरंच प्रामाणिकपणे या मार्गावर आले असतात. स्वार्थ आणि संकुचितपणामुळे जग कसं फसवं आणि आत्मघातकी बनत आहे, ही जाणीव त्यांना होत असते. या जगात राहूनच, पण जगाच्या आधारावर न विसंबता खरा आनंद प्राप्त करून घेता येऊ शकेल. त्यासाठी सत्पुरुषांनी सांगितलेल्या मार्गानं चाललं मात्र पाहिजे, याची जाणीवही त्यांना असते. हा मार्ग आहे तो संकुचितपणाच्या त्यागाचा. भय, मत्सर, द्वेष, लालसा, असूया या सर्व गोष्टींचा उगम एका ‘मी’पणातूनच झाला असतो. या ‘मी’पणाचा, या संकुचित परीघाचा त्याग करायचा.. विलय करायचा, हेच या मार्गानं चालणं आहे, ही जाणीवही होऊ लागते. त्यामुळे जगाच्या आधाराचं बोट सोडून परमात्म्याचा आधार प्राप्त करण्यासाठी या मार्गावर पावलं तर पडतात.. पण मग एक अशी वेळ येते की, जगाचा संग तर सुटला आहे, पण परमात्म्याचा थेट संग काही लाभलेला नाही! जग निदान दिसत होतं, परमात्मा दिसतही नाही.. मग त्याचा आधार खरंच मिळेल का, हा प्रश्न मन पोखरू लागतो. ज्या परमात्म्याच्या प्राप्तीच्या शुद्ध हेतूनं संकुचित जगण्याचं बोट सोडलं तो परमात्मा खरंच भेटेल का, हा प्रश्न अंत:करण चिरून जातो! या अवस्थेचं वर्णन समर्थ ‘मनोबोधा’च्या पुढील म्हणजे १३९व्या श्लोकात करतात. प्रथम हा श्लोक व त्याचा प्रचलित अर्थ पाहू. मग मननार्थाकडे वळू. तर हा श्लोक असा आहे:

पुढें पाहतां सर्वही कोंदलेंसे।

अभाग्यास हें दृश्य पाषाण भासे।

अभावें कदा पुण्य गांठीं पडेना।

जुनें ठेवणें मीपणें आकळेना।। १३९।।

प्रचलित अर्थ : हे गुप्तधन कुठे एके जागी पुरून ठेवले आहे असे नव्हे. ते सर्वत्र कोंदाटलेले आहे. रामभजनाने त्याचा लाभ होतो, पण अभागी मनुष्याला सर्वव्यापी राम न दिसता पाषाणमूर्तीच दिसते. त्याच्या अभावाने या रामदर्शनाचे पुण्य काही प्राप्त होत नाही आणि जुनी ठेव मीपणामुळे आकळत नाही.

आता मननार्थाकडे वळू. मार्गावर वाटचाल सुरू आहे.. जगाचा संग मनातून तर सुटला आहे, पण परमात्म्याचा संग काही लाभलेला नाही, अशी ही अवस्था. तुकाराम महाराजांनी ‘कन्या सासुरासि जाये’ या अभंगात याच अवस्थेचं वर्णन केलंय. माहेर म्हणजे जग तर सुटलं, त्या जगाकडे परत परत माघारी वळून पाहात सासरच्या दिशेनं पाऊल तर टाकलं, पण ते ज्याच्यासाठी टाकलं तो पती मनासारखा असेल ना? तो ‘केशव’ तो परमात्मा खरंच भेटेल ना? जग दुरावलं आणि परमात्मा जवळ जाणवत नाही, हे जे दृश्य आहे ते अभागी माणसाला पाषाणवत भासतं. तो अभागी का आहे? तर त्याच्यात अभाव आहे.. शुद्ध भाव असल्याशिवाय या मार्गावर वाटचाल साधत नाही.. आणि हा शुद्ध भाव सदगुरूंच्या बोधानुरूप आचरण केल्याशिवाय निर्माण होऊ शकत नाही.. जपला जाऊ शकत नाही आणि जोपासला जाऊ शकत नाही.