News Flash

१३६. रामस्वरूप

मनोबोधाच्या २८ ते ३३ या सहा श्लोकांत सद्गुरूंच्या स्वरूपाचं आणि त्यांच्या कार्याचं सूचन आहे

मनोबोधाच्या २८ ते ३३ या सहा श्लोकांत सद्गुरूंच्या स्वरूपाचं आणि त्यांच्या कार्याचं सूचन आहे तर ३४ ते ३७ या चार श्लोकांत सद्गुरूंवर प्रेम करण्याच्या आड काय येतं आणि तरीही सद्गुरू कसं प्रेम करीत राहातो, ते सांगितलं आहे, असं गेल्या भागात नमूद केलं. हे २८ ते ३३ श्लोक प्रथम वाचू. हे श्लोक असे आहेत:

दिनानाथ हा राम कोदंडधारी।

पुढें देखतां काळ पोटीं थरारी।

जना वाक्य नेमस्त हें सत्य मानीं।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी।। २८।।

पदीं राघवाचे सदा ब्रीद गाजे।

बळें भक्तरीपूशिरीं कांबि वाजे।

पुरी वाहिली सर्व जेणें विमानीं।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी।। २९।।

समर्थाचिया सेवका वक्र पाहे।

असा सर्व भूमंडळीं कोण आहे?।

जयाची लिळा वर्णिती लोक तीन्ही।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी।। ३०।।

महासंकटीं सोडिलें देव जेणें।

प्रतापें बळें आगळा सर्वगूणें।

जयातें स्मरे शैलजा शूळपाणी।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी।। ३१।।

अहल्या शिळा राघवें मुक्त केली।

पदीं लागतां दिव्य होऊनि गेली।

जया वर्णितां सीणली वेदवाणी।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी।। ३२।।

वसे मेरु मांदार हे सृष्टिलीळा।

शशी सूर्य तारांगणें मेघमाळा।

चिरंजीव केले जनीं दास दोन्ही।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी।। ३३।।

आता या श्लोकात प्रभु रामचंद्रांचंच तर वर्णन आहे. मग इथे सद्गुरू स्वरूपाचं वर्णन कुठून आलं, असा प्रश्न काहींना पडेल. प्रचलित अर्थ प्रभु रामचंद्रांच्याच लीलाचरित्राला धरून आहे आणि मननार्थ हा आधीच सांगितल्याप्रमाणे सद्गुरू स्वरूपाचं आणि त्यांच्या कार्याचं सूचन करणारा आहे. तो नंतर पाहूच. प्रथम प्रचलित अर्थ पाहू. प्रचलित अर्थ असा आहे : हा राम दीनांचा नाथ आहे. त्याची धनुर्धारी मूर्ती पाहाताच साक्षात यमाचाही थरकाप उडतो. माझं हे सांगणं निर्विवाद सत्य समज. राम आपल्या दासाची उपेक्षा कदापि करीत नाही (२८). रामाच्या पायातला तोडर भक्तरक्षण करण्याचे रामाचे ब्रीद त्रिभुवनाला गर्जून सांगत आहे. भक्तांचे जे शत्रू असतील त्यांच्या मस्तकावर रामाच्या हातातला धनुष्यदंड ताडकन् बसतो आणि त्या शत्रूंचा चुराडा होतो. रामाचा दरारा असा आहे की काळाची सत्ता असूनही अयोध्यापुरीतील सर्व लोकांना रामाने विमानातून आपल्या साकेत धामी कायमचे नेले (२९). माझा हा राम परमसमर्थ आहे. त्याच्या सेवकाकडे वाकडय़ा नजरेने पाहाण्याचे सामथ्र्य या त्रिभुवनात कुणाकडे आहे? रामाची लीला तिन्ही लोक गातात. हा राम आपल्या दासाची कदापि उपेक्षा करीत नाही (३०). ज्या रामाने घोर संकटातून देवांना बंधमुक्त केले असा हा राम प्रताप, बळ या गुणांत आगळा आहे. पर्वतकन्या पार्वती आणि शूलधारी शंकर ज्याच्या परमध्यानात मग्न असतो असा हा राम कदापि आपल्या दासाची उपेक्षा करीत नाही (३१). गौतमपत्नी अहल्या ही पतिशापाने शिळा होऊन पडली होती. रामरायाच्या चरणस्पर्शाने ती उद्धरून गेली. ज्याचे गुण गाता गाता वेदवाणीही शिणली तो राम आपल्या दासाची कदापि उपेक्षा करीत नाही (३२). मेरूमांदार आदी पर्वत, चंद्र-सूर्य, तारांगणे आणि मेघमाला जोवर आहेत तोवर रामाने आपले दोन निजजन मारूती आणि बिभीषण यांना चिरंजीव केले आहे. असा हा राम दासाची कदापि उपेक्षा करीत नाही (३३) .

चैतन्य प्रेम

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2016 3:02 am

Web Title: samarth ramdas philosophy 38
Next Stories
1 १३५. धीर आणि धाक – २
2 १३४. धीर आणि धाक – १
3 १३३. भवसागर
Just Now!
X