News Flash

१६६. अल्पकृती.. परमलाभ

जगाचं खरं स्वरूप अशाश्वत असूनही ते शाश्वत भासतं आणि त्या जगालाच शाश्वत आधार मानून मी जगत राहातो.

जगाचं खरं स्वरूप अशाश्वत असूनही ते शाश्वत भासतं आणि त्या जगालाच शाश्वत आधार मानून मी जगत राहातो. त्या जगाचं खरं स्वरूप साधनेनंच उकलू लागतं. त्यामुळे साधना ही खरी शाश्वताची प्रचीती देणारी असूनही मला तिचं महत्त्व उमगत नाही आणि ती नेटानं होत नाही. त्यामुळे जगाचा प्रभाव थोपवून साधना नेटानं करीत राहाणं हे आंतरिक युद्धच आहे! त्या साधनेतली चिकाटी टिकवण्यासाठी अल्प धारिष्टय़ लागतंच! साधकाच्या मनात जगाचा प्रभाव अर्थात जगाचा मोह जसा खोलवर असतो तसाच आप्तमोह अर्जुनाच्या अंतरंगात जागा झाला आणि त्यांच्याविरुद्ध युद्ध करण्यात त्याचं मन कच खाऊ लागलं. तेव्हा भगवंतांनी सांगितलं की, ‘‘सुखदु:खे समेकृत्वा लाभालाभौ जयाजयौ। ततो युद्धाय युज्वस्व नैवं पावमवाप्स्यसि।।’’ (अध्याय २, श्लोक ३८). सुख आणि दु:ख समान मानून अर्थात सुख वाटय़ाला येईल की दु:ख वाटय़ाला येईल, याची पर्वा न करता.. लाभ होईल की हानी होईल, जय होईल की पराजय होईल, याची पर्वा न करता युद्धकर्तव्याला सामोरं जा. त्यानं तुला पाप लागणार नाही! साधकानंही द्वैताच्या भीतीनं दडपून न जाता या आंतरिक युद्धाला सामोरं जायलाच हवं. त्यामुळे भगवंताच्या विस्मरणातून जे पापकर्मातलं गुंतणं ओढवतं ते ओढवणार नाही. तेव्हा सद्गुरूप्रदत्त साधना, सद्गुरू बोधानुरूपचं आचरण यातलं सातत्य हेच धर्माचरण आहे. भगवंत सांगतात की, ‘‘..स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्।।’’ (अ. २, ४०व्या श्लोकाचा अंतिम चरण). म्हणजे या धर्माचं अल्प आचरणदेखील मोठय़ा भयापासून सुटका करवतं! समर्थ जे सांगतात त्या अल्प धारिष्टय़ाचा सांधा इथं असा जुळतो. सद्गुरूबोधानुरूप आचरण सुरू केल्यावर अल्पावधीतच त्याचा लाभ जाणवू लागतो! कारण त्याआधीचं आपलं सर्व आचरण हे स्वत:च्या मनाच्या आवडीनुसार होतं. मोह आणि भ्रमानं माखलेल्या मनातल्या आवडी या त्या मोहभ्रमानुरूपच असतात. अर्थात अनेकदा त्या अंतिमत: हानीकारकच असतात. त्यामुळे मन ज्याच्या पूर्ण आधीन आहे अशा सद्गुरूंच्या बोधात हा भ्रम आणि मोहाचा लवलेशही नसतो. त्यामुळे त्यांच्या बोधानुरूप होणारं आचरण हे माझ्या अंतरंगातला भ्रम आणि मोहच कमी करणारं असतं. या अल्प आचरणानंदेखील मोठं भय अर्थात भवभय कसं ओसरू लागलं आहे, हे जाणवू लागतं. मनाच्या आवडीनुसारचं आचरण हे अत्यंत संकुचित ‘मी’केंद्रितच असल्यानं भवभय वाढवणारंच होतं. सद्गुरू बोधानुरूपचं आचरण हे मला व्यापक करीत असल्यानं त्या भवपाशापासून मन हळूहळू अलिप्त होऊ लागतं. भवाचा प्रभाव ओसरू लागतो आणि सद्गुरूभाव विकसित होऊ लागतो. एकदा सद्गुरूंबाबत शुद्ध भाव जागा झाला की मग मन त्यांचा बोध खऱ्या अर्थानं ग्रहण करू लागतं. त्या बोधाचं महत्त्व उमगू लागतं. आपलं आचरण त्या बोधानुरूप आहे की नाही, याची सदोदित आंतरिक छाननी सुरू होते. त्या बोधानुरूप आचरण होत नाही तेव्हा तेव्हा वाईट वाटतं आणि त्या बोधानुरूप जगण्याचा प्रयत्न अधिक चिकाटीनं केला जातो. एकदा अशी स्थिती होऊ लागली की सद्गुरूंच्या आधाराचं मोल उमगू लागतं. त्या आधारामुळे जीवनात होत असलेला पालट जाणवू लागतो. या सद्गुरूंचं खरं व्यापक दातृत्वही जाणवू लागतं. कोणतं दान सद्गुरू शिष्याच्या पदरात टाकतात हो? मनोबोधाच्या ३६व्या श्लोकाच्या तिसऱ्या चरणांत हे व्यापक शाश्वत दान समर्थानी नमूद केलं आहे. हा सद्गुरू कशाचं दान देतो, हे स्पष्ट करताना समर्थ म्हणतात, ‘‘सुखानंदआनंदकैवल्यदानी!’’ हा सद्गुरू सुखानंद, आनंद आणि कैवल्य अर्थात मोक्ष यांचा दाता आहे! नीट वाचा बरं.. फार साध्या वाटणाऱ्या या चरणात मोठी गूढ गोष्ट लपली आहे.

चैतन्य प्रेम

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2016 2:51 am

Web Title: samarth ramdas philosophy 65
Next Stories
1 १६५. साधना-धीर
2 १६४. जवळीक : २
3 १६३. जवळीक : १
Just Now!
X