News Flash

१७५. चांचल्य

जे स्थिर नाही त्याला चंचल म्हणतात. ‘चल’ म्हणजे सरकणारं, हलणारं, बदलणारं जे क्षणात सरकणारं आहे

जे स्थिर नाही त्याला चंचल म्हणतात. ‘चल’  म्हणजे सरकणारं, हलणारं, बदलणारं जे क्षणात सरकणारं आहे, क्षण-चल आहे ते चंचल! दृश्य, स्थूल, भौतिकाचा तो गुण आहे. प्रात:काळी तो श्लोक म्हणतात ना? ‘कराग्रे वसते लक्ष्मी:’ लक्ष्मी म्हणजे भौतिक संपदा आणि ती हाताच्या अग्रभागी असते अर्थात निसटणारी असते. माणूस पैसा मुठीत धरून ठेवायची धडपड करतो, पण तरी तो निसटूनच जात असतो. ‘करमध्ये सरस्वति’ जी विद्या आहे ती हाताच्या मध्यभागी असते. अर्थात हात हे कर्तृत्वाचं प्रतीक मानलं तर याचा अर्थ असा की माणसाच्या कृतीतूनच त्याच्या ज्ञानाची पातळी प्रकट होत असते. माणसाच्या कृतीमध्ये त्याच्या ज्ञानाचं दर्शन झालं पाहिजे. ‘लक्ष्मी’ ही भौतिक पातळी मानली आणि ‘सरस्वति’ ही जाणिवेची पातळी मानली तर या स्थूल भौतिक आणि सूक्ष्म आंतरिक पातळीतील सुधारणा ही परमात्म जाणिवेनंच साधते. म्हणून ‘करमूले तू गोविन्दम्’.. या सर्व दृश्य-अदृश्याचं मूळ तो परमात्माच आहे, हे सदोदित ध्यानात ठेवलं तरच ही अंतर्बाह्य़ सुधारणा साधते. जोवर आंतरिक स्पष्टता येत नाही तोवर भौतिकातलं गुंतणं थांबत नाही. जोवर भौतिकातलं आसक्तीयुक्त गुंतणं थांबत नाही तोवर अस्थिरता ओसरत नाही. तोवर खरं समाधान प्राप्त होऊच शकत नाही. तेव्हा ‘जयाचेनि योगे समाधान बाणे’ म्हणजे ज्या परम जाणिवेच्या योगानं समाधान बाणतं त्या परम जाणिवेसाठी ‘सर्व चांचल्य दीजे’.. समस्त भौतिक देऊन टाकावं! आता हे चांचल्य कशाचं आहे? स्थूल भौतिक तर वस्तूमात्र आहे, निर्जीव आहे. आपण कुणावर प्रेम करतो तेव्हा त्या प्रेमाचा प्रतिसाद अपेक्षित असतो. भौतिक वस्तूमात्रावर मात्र आपण प्रेम करतो ते एकतर्फीच असतं. माझी सूक्ष्म वृत्ती ही स्थूल भौतिकात चिकटते आणि मग भौतिकातल्या लाभ-हानीनं, चढउतारानं माझ्या वृत्तीत जे अस्थैर्य येतं तेच चांचल्य. तसंच एखादी गोष्ट मिळावी, अशी आस मला लागते. ती गोष्ट मिळाली की त्या वस्तूबाबतचं प्रेम ओसरू लागतं आणि दुसरीच वस्तू मिळावी, याची आस लागते. याचाच अर्थ भौतिकातली काहीही कितीही मिळालं तरी माझी वृत्ती स्थिर राहात नाही, मला स्वस्थ बसू देत नाही, हेच चांचल्य. वृत्ती ही सूक्ष्म असते. ही वृत्ती परमतत्त्वानं व्याप्त असली तर माझं जगणं उन्नत करते आणि हीच वृत्ती संकुचितात अडकली तर माझं जगणं अवनत करते. समर्थानी ‘दासबोधा’त ११व्या दशकातील सातव्या समासात मूळमायेसाठी चंचळनदीचं रूपक वापरलं आहे. ही मूळमाया परमात्म्याच्या आधारानंच राहाते. त्यामुळे शाश्वत परमात्मस्वरूपाशी जोडलेल्या साधकात ती आत्मशक्तीरूपानं प्रवाहित होते तर अशाश्वताशी जोडलेल्या माणसात ती मायाशक्तीरूपानं प्रवाहित होत त्याला भवसागरात गटांगळ्या खायला लावते. समर्थ म्हणतात, ‘‘चंचळनदी गुप्त गंगा। स्मरणे पावन करीं जगा।..’’ मागेच समर्थानी केलेली व्याख्या आपण पाहिली होती की स्मरणानं माणसातला देव जागा होतो तर विस्मरणानं पशू जागा होतो! तेव्हा वृत्तीरूपी जी नदी आत वाहाते आहे ती परमात्म स्मरणानं गंगेसारखी होते अर्थात आत्मशक्ती ठरते. जर त्या परमात्म तत्त्वाचं विस्मरण झालं तर ‘अहं’ने ग्रस्त होऊन जीव मोह, भ्रम, आसक्तीच्या गाळात रूतत जातो. समर्थ म्हणतात, ‘‘..अधोमुखें बळें चालिली। अखंड वाहे परी देखिली। नाहींच कोणी।।’’ वृत्ती संकुचित होते आणि अवनत होत सारं जगणं अवनत करते. ‘‘त्या जळाऐसें नाहीं निर्मळ। त्या जळाऐसें नाहीं चंचळ।..’’ थोडक्यात वृत्तीच निर्मळ होऊ शकते, ती सद्वृत्तीच जगणं निर्मळ करू शकते आणि वृत्तीच चंचलही होऊ शकते, ती असद््वृत्तीच जगणं चांचल्यानं व्यापू शकते. तेव्हा ‘‘जया वर्णिती वेद-शास्त्रें-पुराणें। जयाचेनि योगें समाधान बाणे। तयालागि हें सर्व चांचल्य दीजे।’’ ज्या सद्गुरूतत्त्वाचं गुणगान वेद-शास्त्रेही करतात आणि ज्याच्या योगानं समाधान बाणतं त्या सद्गुरूंसाठी वृत्तीचं चांचल्य द्यायला समर्थ सांगत आहेत. थोडक्यात माझ्या वृत्तीचा प्रवाह बहिर्मुखी प्रवाह आत वळवायचा आहे. भौतिकाकडे असलेला वृत्तीचा ओघ सद्गुरूकडे वळवायचा आहे.

चैतन्य प्रेम

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2016 3:23 am

Web Title: samarth ramdas philosophy 75
Next Stories
1 १७४. सद्गुरूमाहात्म्य
2 १७३. पायथा आणि शिखर
3 १७२. गुरू परमात्मा परेशु
Just Now!
X