देहबुद्धीनुरूप वासना मनात उत्पन्न होतात आणि माझ्या अंतरंगात त्या वासनांनुरूप कल्पनांचा प्रवाह वाहात असतो. देह आणि जगाला सुखाचा आधार मानणाऱ्या या वासनांमुळे कल्पनांचा प्रवाहही बहिर्मुखीच असतो. ‘अहं’ हाच या समस्त कल्पनांचा आधार असल्यानं या कल्पना संकुचित असतात. या कुडय़ा कल्पना सोडून द्यायला नव्हे, तर पालटायला समर्थ सांगत आहेत! आणि हे विशेष आहे. याचं प्रमुख कारण असं की माणूस कल्पनांशिवाय राहूच शकत नाही आणि जर कल्पनाच करायच्या असतील तर त्या व्यापकाशी जोडलेल्या का करू नये, असा समर्थाचा रोख आहे. ‘रामगीते’च्या ‘वासना-विवेचन’ या दुसऱ्या अध्यायात प्रभु रामचंद्र हनुमंतांना सांगतात की, माणसाच्या अंतरंगात दोन प्रकारच्या वासना असतात. पहिली शुभ वासना आणि दुसरी अशुभ वासना (द्विविधो वासनब्यूह: शुभश्चैवाशुभश्च तौ।). आणि देहबुद्धीत जखडलेल्या माणसाची सहज प्रवृत्ती ही अशुभ वासनांकडेच असते. या अशुभ मार्गानं जात असलेला वासनाप्रवाह शुभ वासनांकडे वळविण्याचा प्रयत्न करीत राहीलं पाहिजे. कारण माणसाच्या मनाचा हा स्वभावच आहे की अशुभ वासनांपासून हटविल्यावरच ते शुभ वासनांकडे वळतं (पौरूषेण प्रयत्नेन योजनीयाशुभे पथि। अशुभेषु समाविष्टं शुभेष्वेवाव तारयेत्।।) आणि शुभ वासनांपासून दुरावताच हे मन तात्काळ अशुभ वासनांकडेच घसरतं (अशुभाच्चालितं याति शुभं तस्मादपीतरत्।). म्हणजेच एकतर हे मन अशुभ वासनांत असतं किंवा शुभ वासनांत असतं. तेव्हा आज मनात कुडय़ा, अशुभ वासनांची, कल्पनांचीच गर्दी आहे. त्यांच्यात पालट केला पाहिजे. संकुचित कल्पनांत अडकलेल्या मनाला व्यापक कल्पनांनी हळुहळू भरलं पाहिजे. आता मला जर संकुचित कल्पनाच खऱ्या वाटत असतील, रमणीय वाटत असतील तर व्यापक कल्पना मला खऱ्या वाटतील का? रमणीय वाटतील का? अगदी साधं उदाहरण घेऊ. देहबुद्धीला सुखावणारं ते सारं सुखाचं असं मानून मी जगत आहे. त्या सुखासाठी धडपडत आहे. ते सुख ज्या आधारांवर मिळेल, असं मला वाटतं त्या वस्तू, व्यक्ती आणि परिस्थितीला सदैव माझ्या अनुकूल राखण्यासाठी मी धडपडत आहे. जीवनातल्या अनंत अडीअडचणी या केवळ माझ्याच वाटय़ाला आल्या आहेत, या भावनेनंही मी त्रासलो आहे. अशावेळी हे सारं देहबुद्धीपायी झालं आहे. ती देहबुद्धी विसर आणि आत्मबुद्धी जागी होण्यासाठी प्रयत्न कर, असा उपदेश मला सहन तरी होईल का? माझा ‘अहं’ हा माझ्या देहाशीच, ‘मी’ आणि ‘माझे’शीच जखडलेला असताना माझी ही ओळख पुसून टाकून ज्याची मला जाणही नाही अशा ‘अहं ब्रह्मास्मि’ या ब्रह्मभावात वावरण्याची कल्पना मला खरी तरी वाटेल का? उलट या देहाच्याच आधारावर सुख मिळेल, या माझ्या माणसांच्याच आधारावर मला सुख मिळेल, ‘सुखदायी’ वस्तूंच्या संग्रहानंच मला सुख मिळेल; या कल्पना मला जितक्या खऱ्या वाटतात तितक्या केवळ भगवंताच्या आधारावर मला सुख मिळेल, मी मुळात व्यापक परब्रह्माचाच अंश आहे त्यामुळे ब्रह्मभावात स्थिर होणं, आत्मस्वरूपात विलीन होणं हेच खरं शाश्वत सुख आहे; या संतांच्या सांगण्याप्रमाणे अतिशय खऱ्या असलेल्या, वास्तविक असलेल्या गोष्टी मला कल्पनेतदेखील खऱ्या वाटत नाहीत! शब्द समजतात, पण अर्थ अनुभवात येत नाही!! मग देहभावातच अखंड जगणाऱ्याला आत्मभावात वावरण्याची कल्पना कशी स्वीकारता येईल? श्रीनिसर्गदत्त महाराजांनी याचं फार मार्मिक उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, ‘‘आपण भिकारी आहोत, असंच ठामपणे वाटणाऱ्या राजाला एवढंच सांगता येईल की त्यानं राजासारखं वागून पहायला आधी सुरुवात करावी!’’ तेव्हा मला ज्या ज्या गोष्टी सुखाच्या वाटतात त्या सुखाच्या नाहीत, हे सद्गुरूंचं सांगणं मला पूर्णपणे पटत नसेल तर निदान त्यांचा आधार मनानं सोडून सुखात किती घट होते, हे तपासायला काय हरकत आहे? नाहीतरी त्यांचा आधार मनच घेतं आणि त्या आधारातून सुखच मिळेल, असं मनच मानतं ना?
-चैतन्य प्रेम