‘मनोबोधा’च्या ३८ ते ४२ या श्लोकांत ‘मना सज्जना राघवीं वस्ति कीजे’ अर्थात, हे मना श्रीसद्गुरूंच्या जाणिवेत चिंतन, मनन आणि निदिध्यासपूर्वक वती कर, हे सूत्र समर्थ बिंबवित आहेत. त्यातल्या ४१व्या श्लोकापर्यंत आपण येऊन ठेपलो आहोत. खरं शाश्वत सत्य काय, याचं उत्तर हवं असेल तर खऱ्या श्रीसद्गुरूंपाशीच पोहोचावं लागेल. त्यासाठी एकाच शुद्ध विचाराचं बोट पकडावं लागेल.. ‘मना सज्जना भक्तिपंथेचि जावे’! इथवर आपण आलो आहोत. आता कुणाला वाटेल की ३८व्या श्लोकात ज्याअर्थी श्रीसद्गुरूंच्या आज्ञेचं उल्लंघन नको, असं सांगितलं आहे, त्याअर्थी श्रीसद्गुरू प्राप्त झाले आहेतच. मग पुन्हा त्यांच्यापाशी पोहोचावं लागेल, असं का सांगताहेत? तर इथं पुन्हा श्रीनिसर्गदत्त महाराज यांच्या संवादांची आठवण होते. प्रदीर्घ चर्चेअंती एक साधक आपल्या मनातल्या गोंधळाची कबुली देत त्यांना म्हणाला, ‘‘म्हणून तर मी इथं आलो आहे.’’ श्रीनिसर्गदत्त महाराज ताडकन् उद्गारले, ‘‘अजून तुम्ही इथे नाही. मी तर इथेच आहे. मी तुमच्यासारखे जगावे, विचार करावा, तुमची भाषा बोलावी, असं तुम्हाला वाटतं. तसं मी करू शकत नाही. तुम्हालाही त्याचा उपयोग होणार नाही. तुम्ही माझ्याकडे आलं पाहिजे. शब्द मनाचे असतात आणि मन अस्पष्ट, विकृत बनवते. म्हणून शब्द ओलांडून माझ्या बाजूला येणं आवश्यक आहे.’’ त्यावर साधक म्हणतो, ‘‘आपणच मला आपल्या बाजूला घ्या.’’ त्यावर महाराज म्हणतात, ‘‘मी ते करीत आहे, पण तुम्ही प्रतिकार करता..’’ म्हणजे आपण श्रीसद्गुरूंपर्यंत पोहोचलो खरं, पण ते पोहोचणं देहानंच आणि देहबुद्धीनंच झालं आहे. त्यामुळे त्यांच्या सांगण्याप्रमाणे आपण वागावं, ही भावनाच नाही. तर त्यांनीच आपल्या सांगण्यानुसार वागावं, हीच इच्छा आहे. त्यांनी आपल्या देहबुद्धीच्या जाणिवेत येऊन आपली देहबुद्धी जपावी आणि पोसावी, अशीच अपेक्षा आहे. ते ज्या शुद्ध जाणिवेत आहेत तिची तर आपल्याला जाणीवच नाही! त्यांच्याविषयीचं आपलं सारं ज्ञान हे शाब्दिकच आहे. म्हणून त्या शाब्दिक ज्ञानाला ओलांडून सद्गुरूंपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यांच्या बाजूनं तर ती प्रक्रिया अखंड सुरू आहे. त्या प्रक्रियेत मीच मोडता घालत आहे. त्यांच्या बोधाच्या विपरीत जगून जीवन सुरळीत होण्याची अपेक्षा धरीत आहे. शुद्ध विचाराच्या अभावानंच ही परिस्थिती ओढवली आहे. हा शुद्ध विचार गवसेल जेव्हा ‘मना सज्जना भक्तिपंथेचि जावे’ या सूत्रानुसार मन सज्जनांच्या भक्तीपंथावर जाईल तेव्हाच! सज्जनांच्या भक्तीपंथावर पाऊल ठेवीन तेव्हाच अंतरंगातली जगाची भक्ती लोपू लागेल. सज्जनांनी जी खरी भक्ती सांगितली आहे तिचाच आधार घेतला तरच जगण्यातला संकुचितपणा ओसरू शकतो. जगणं व्यापक होऊ लागतं. जगाच्या आसक्तीजन्य मोहापासून विभक्त होता येतं आणि जगातली सर्व प्रापंचिक कर्तव्यं पार पाडत असतानाही श्रीसद्गुरूंची खरी भक्ती साधू लागते. त्यांच्यापासून कदापि विभक्त नसणं, हीच भक्ती. त्यांची इच्छा तीच माझी इच्छा, त्यांचा विचार तोच माझा विचार, त्यांचा निर्णय तोच माझा निर्णय, त्यांची भावना तीच माझी भावना, त्यांची धारणा तीच माझी धारणा; अशी स्थिती त्या भक्तीनंच विलसू लागेल. ती भक्ती साधायची तर उलट सुलट विचारांच्या झंझावातात स्वत:च उडी घेत मन विकल्पांनी ग्रासून टाकत श्रीसद्गुरूंपासून दूर वाहावत जाणं थांबवावं लागेल. त्यासाठी ‘विचारें बरें अंतरा बोधवीजे’ म्हणजे अंतरंगात शुद्ध विचाराचाच संस्कार करावा लागेल. त्यासाठी जगामागे धावण्याची सवय थोपवून एका श्रीसद्गुरूंनाच आपलं मानावं लागेल! मनोबोधाचा पुढचा ४२वा श्लोक हीच धारणा राखायला सांगतो. जगाला नव्हे, श्रीसद्गुरूंना आपलं मानायला सांगतो!

चैतन्य प्रेम

Chaturgrahi Yog in meen rashi
Chaturgrahi Yog : १०० वर्षानंतर चतुर्ग्रही योग; ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा, होऊ शकतो मोठा धनलाभ
narendra modi
प्रचार संपल्यानंतर मोदींचे रालोआ उमेदवारांना पत्र
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
Gudi Padwa 2024
गुढीपाडव्यापासून ‘या’ ३ राशी होतील श्रीमंत? नववर्षात शनिदेवाच्या कृपेने उत्पन्नात होऊ शकते प्रचंड वाढ