मुळात सद्गुरूंवर प्रेम करणं म्हणजे तरी काय? केवळ सद्गुरूंवर प्रेम करायचं म्हटलं तरी एखाद्या बाबाबुवाच्या नादी लागून घरादाराची वाताहत करणाऱ्या कुणाकुणाची उदाहरणं ऐकवली जातील. इथं अभिप्रेत आहे तो खरा सद्गुरू, भोंदू नव्हे, हे जरी खरं तरी मुळात हे प्रेम आहे तरी काय? खरं प्रेम म्हणजे काय, याची शाब्दिक व्याख्यादेखील माहीत नसलेल्या कल्याणांचं रामदासस्वामींवर खरं प्रेम होतं! नव्हे याला प्रेम म्हणतात एवढीदेखील जाणीव त्यांना नव्हती कारण त्यांची सर्व जाणीवच समर्थानी व्यापून टाकली होती.. तसं प्रेम ब्रह्मानंदबुवांचं, भाऊसाहेब केतकरांचं गोंदवलेकर महाराजांवर होतं.. रामकृष्ण परमहंस, साईबाबा, गजानन महाराज.. प्रत्येक लीलाचरित्रांत त्यांच्यावर निस्सीम प्रेम असलेल्या भक्तांचीही चरित्रं सापडतात.. तसं खरं विशुद्ध प्रेम ज्यायोगे साधतं ती वृत्ती फार दुर्लभ आहे.. म्हणून आपल्यासारख्या सर्वसामान्य साधकानं सद्गुरूंवर प्रेम करायचं म्हणजे काय करायचं हे जाणण्याचा आपण प्रयत्न करू. पहिली गोष्ट ही की प्रेम केलं जात नाही, ते होतं. पण आपल्याला ते करावं लागणार आहे, याचाच अर्थ सुरुवात कृतीनं आहे.. भावबळानं नाही! लहान मुलं जसं भातुकली खेळतात तसं आपलं हे ‘प्रेम’ आहे! तरीही लहान मुलाच्या बोळक्यातला खोटा शिरा, खोटं श्रीखंड आई ज्या खऱ्या प्रेमानं स्वीकारते त्याच प्रेमानं आपल्या खोटय़ा प्रेमाचाही सद्गुरू स्वीकार करतात! लहान भाऊ बहिणीला ओवाळणीत दहा रुपये टाकतो. ते काही त्यानं कमावले नसतात. ते वडिलांनीच त्याला दिले असतात. तसं जे काही तोडकंमोडकं ‘प्रेम’ आपण सद्गुरूंवर करतो ते त्यांनीच आपल्या अंतरंगात आधी उत्पन्न केलं असतं! त्यांनीच अंतरंगात उत्पन्न केलेलं शुद्ध प्रेम आपण जगाकडे वळवत राहातो आणि जगावर प्रेम करीत राहातो. खऱ्या निस्वार्थ प्रेमाला स्वार्थी जग पात्र नसताना आपण आपल्याच स्वार्थपूर्तीच्या सुप्त हेतूनं ते प्रेम जगात वाया घालवत राहातो. त्यामुळेच सद्गुरू ते प्रेम प्रथम भगवंताकडे वळवायला सांगतात! भगवंतावरील आपल्या ‘प्रेमा’ची सुरुवात इतकी कच्च्या पायवाटेनं आहे!! पण ते प्रेमही आपल्याला साधत नाही.. कारण जग खरं वाटतं, जगावर प्रेम करणं खरं वाटतं, जगाचं प्रेम खरं वाटतं.. ज्यानं प्रेमाचं बीज आपल्या अंतरंगात रुजवलं त्या भगवंतावर आणि अधिक अचूक सांगायचं तर त्या सद्गुरूंवर आपण खरं प्रेम करू शकत नाही कारण आपलं आपल्यावरही खरं प्रेम नाही! आपण स्वत:ला देह मानतो पण त्या देहावर तरी आपलं खरं प्रेम आहे का? देहाला घातक ठरणाऱ्या आवडी आपण सोडू शकतो का? मानवी शरीराइतकं अमूल्य उपकरण आपल्याला लाभलं असताना आणि या देहातल्या प्रत्येक अवयवाला कृत्रिम पर्याय द्यायचा तर लाखो रुपये खर्चावे लागतील, असं असताना फुकटात मिळालेल्या या देहाच्या उपकरणाची आपण खरी किती काळजी घेतो? त्यामुळे ‘मी म्हणजे देह’ ही आपली धारणा असली तरी त्या देहाची खरी काळजी घेणारं खरं प्रेम त्या देहावरदेखील आपण करीत नाही.. ‘मी म्हणजे मन’ असं आपण मानतो खरं, पण त्या मनावरही आपलं खरं प्रेम नाही! जिथं दु:खंच वाटय़ाला येईल तिकडेच धावणाऱ्या आपल्या मनाला आपण कधी समजावत नाही.. नव्हे त्या मनाचाच बागुलबुवा उभा करून मनाच्या खऱ्या सुखात मनाचाच अडथळा आपण उभा करतो! मानवी आयुष्याची फार मोठी संधी लाभूनही आयुष्यातला प्रत्येक क्षण आपण निर्थक गमावतो, मग या आयुष्यावर तरी आपलं खरं प्रेम आहे का? हा देह, हे मन, हे आयुष्य पुन्हा लाभेल याची हमी नसताना आपण त्यांचा वापर किती बेपर्वाईनं करतो.. मग आपण आपल्यावरही खरं प्रेम करीत नसताना सद्गुरूंवर प्रेम करण्याचा विचार तरी साधेल का?

– चैतन्य प्रेम