News Flash

४४. षट्विकारदर्शन : काम-१

षट्विकारातला पहिला आणि अन्य सर्व विकारच ज्यातून उत्पन्न होतात, असा विकार म्हणजे काम अर्थात कामना.

षट्विकारातला पहिला आणि अन्य सर्व विकारच ज्यातून उत्पन्न होतात, असा विकार म्हणजे काम अर्थात कामना. सर्व तऱ्हेच्या शारीरिक, मानसिक, भावनिक कामना, इच्छा, वासना. या वासनांमध्ये सर्वात प्रभावी आहे ती कामवासना. कारण तिचा देहाशी अधिक थेट संबंध आहे आणि देहसुखाचा प्रत्यक्ष अनुभव देण्याची क्षमता तिच्यात आहे, असा सर्वसामान्य आणि म्हणूनच सर्वमान्य असा अनुभव आहे. ‘देहच मी’ या जाणिवेतच अहोरात्र जगत असल्यानं या देहाला जे-जे सुखकारक वाटतं तेच मनाला सुखकारक वाटतं. म्हणूनच या देहाला धरून असलेल्या कामवासनेचा आवाका, जीवनावरचा तिचा प्रभाव अत्यंत व्यापक आहे. ‘भावदिंडी’त तसेच अनेकानेक सदरांमध्ये याचा मागोवा आपण घेतला आहेच. ओशो रजनीश यांच्यापासून वात्सायन ऋषींच्या कामसूत्रांपर्यंतचा विस्तृत आधार त्यासाठी घेतला गेला होता. त्याची पुनरूक्ती इथं करीत नाही. फक्त एका गोष्टीच्या अनुषंगानं कामवासनेचा आणि नंतर एकूणच वासनांचा, इच्छांचा विचार करू. ही गोष्ट म्हणजे वासनांची खरी पूर्ती ती नेमकी काय आणि ती साधणं माणसाला शक्य आहे का?

आता आपल्याला वाटेल की मुळातच कामनांमध्ये गैर काय? भौतिक आणि शारीरिक सुख भोगता येईल अशा क्षमतांनी जर हा देह युक्त आहे, तर मग या देहाच्या आधारे ते सुख भोगण्यात गैर काय आहे? अशा शारीरिक सुखानं जर मानसिक आणि भावनिक आनंद लाभत असेल तर त्या देहवासनेला हीन ठरविण्यात काय अर्थ आहे? भले प्रत्येक कामनेची पूर्ती होईलच असं नाही, तरीही कामनांच्या पूर्तीसाठी प्रयत्न करण्यात वाईट काय आहे? तसं पाहिलं तर नदीचा प्रवाह वाहात जातो त्याप्रमाणे जीवनातील अनुभवांतून प्रवाहीपणे वाहात गेलो, तर कुठलीच गोष्ट आडकाठी ठरत नाही. कारण जीवनातले प्रसंग, घटना या प्रारब्धनियोजितच असतात. अडचण ही होते की आपण प्रवाहीपणे अनुभवांतून पुढे जात नाही. अनुभवांचा आपल्यावर फार मोठा परिणाम होतो आणि काही अनुभवांशी  तर आपण अडकून पडतो! सुखकारक अनुभवांची अखंडता हेच सुख आणि दु:खकारक अनुभवांची अखंडता हेच दु:ख, अशी आपली सुख आणि दु:खाची कल्पना होऊन जाते. मग या घडीला या देहाला जे सुखकारक वाटतं ते आजन्म तसंच टिकून राहावं, यासाठी माणूस धडपडत राहातो. ‘भावदिंडी’तही आपण पाहिलं होतं की, संभोगाच्या अत्युच्च क्षणी ‘मी’पणाचं संपूर्ण भान, ओझं गळून पडतं. त्या क्षणात देहभान हरपल्यानं अर्थात देहभावाचं ओझं दूर झाल्यानं मन:शांती लाभते त्या मन:शांतीची माणसाला खरी भूक असते. कामवासनेशिवाय अन्य कोणत्याही मार्गानं हा अनुभव सामान्य माणसाच्या आवाक्यात नसल्यानं आणि हा अनुभव सहजप्राप्य असल्यानं माणूस कामवासनेत अधिकाधिक गुंतत जातो. आता साधी गोष्ट पाहा, कामवासनेचं बीज मनात असतं आणि तिची पूर्ती देहाच्याच आधारावर होत असल्यानं मन देहाला त्यासाठी झोकून देतं. देह हा काळाच्या आधीन असल्यानं त्या देहात पालट होत जातो. देहासक्तीनं बरबटलेल्या मनाच्या क्षमता मात्र त्या वेगानं आटत नसतात. त्यामुळे देहक्षमता ओसरू लागल्या तरी वासनापूर्तीची इच्छा मनातून ओसरतेच, असं नाही.  उलट वासनापूर्तीच्या मार्गातील सामाजिक व नैतिक  बंधनांचा उंबरठाही ओलांडला जाण्याचा धोका असतो.  त्यामुळेही मनुष्यजन्माचा खरा हेतू लोपतो. देहासक्ती आणि वासनापूर्तीची ओढ ही माणसाला याप्रमाणे अधिकच बद्ध करणारी असल्यानं अनेकानेक संतांनी कामना विकारावर कोरडे ओढले आहेत.

-चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2016 5:43 am

Web Title: shlok by philosopher
Next Stories
1 ४३. षट्विकारदर्शन : ३
2 ४२. षट्विकारदर्शन : २
3 ४१. षट्विकारदर्शन : १
Just Now!
X