20 November 2017

News Flash

४२४. श्रवण आणि ग्रहण

बरं वाचून त्यात लीन व्हायचं आहे म्हणजेच त्यातून प्रेरणा घेत जीवन घडवायचं आहे.

चैतन्य प्रेम | Updated: September 4, 2017 7:30 AM

शाश्वत परम तत्त्वाच्या आधारावर शाश्वत असं सुख प्राप्त करून जर जीवनातील समस्त द्वंद्वाचा दाह शमून निवायचं असेल तर पहिली स्थिती अनिवार्य आहे ती म्हणजे, ‘‘कथा ऐकतां सर्व तल्लीन जाला!’’ या चरणातील ‘सर्व’ शब्दाच्या दोन अर्थछटा आपण जाणल्या. पहिला अर्थ म्हणजे, एक तर तो साधक कथा ऐकतो ती ‘सर्व’ म्हणजे पूर्ण ऐकतो आणि दुसरा अर्थ म्हणजे जो ‘सर्व’ आहे त्याची कथा ऐकताना तो तल्लीन होतो. यातील पहिल्या अर्थाचा विचार आपण केला आणि हे पाहिलं की, कथा पूर्ण वाचणं म्हणजे तिच्या निष्कर्षांपर्यंत पोहोचून, तो निष्कर्ष ग्रहण करून आपल्या जीवनात त्याप्रमाणे सुधारणा करण्याचा प्रयत्न करणं, म्हणजे कथा सर्व ऐकणं आहे. आता पुराणंसुद्धा पाहा. त्यातल्या अनेक घटना आजच्या तर्कबुद्धीला पटत नाहीत, पण त्याचबरोबर आजही न सुटलेल्या काही तात्त्विक प्रश्नांवर त्यात असलेला संवाद वा चिंतन आजच्या काळातही अतिशय उपयुक्त आहे. आता दशावतारातल्या अगदी पहिल्या मत्स्य अवताराची कथा मांडणारं ‘मत्स्यपुराण‘च पाहा. त्यातल्या एका अध्यायात आजही दीर्घ चर्चेला वाव देणाऱ्या मुद्दय़ाचा ऊहापोह आहे. प्रयत्न म्हणजे कर्म श्रेष्ठ की दैव म्हणजे प्रारब्ध श्रेष्ठ, हा तो मुद्दा आहे आणि त्याची चर्चा मत्स्य देवाशी राजानं केली आहे.

मत्स्यदेव त्यावर सांगतात की, ‘‘आधीच्या अनंत जन्मांत केलेलं कर्मच या जन्मी दैव बनून, प्रारब्ध बनून वाटय़ाला आलं असतं. त्यामुळे कर्मालाच अधिक महत्त्व आहे. त्यामुळे या जन्मी दैवाची साथ नसली तरी माणसानं निराश न होता सत्कर्मेच केली पाहिजेत आणि कर्तव्यकर्मेही योग्यरीत्या पार पाडली पाहिजेत. कारण सदा सत्कर्मरत आणि अभ्युदयशील माणसाचं प्रतिकूल दैवही पालटतं!’’ (स्वमेव कर्म दैवाख्यं विद्धि देहान्तरार्जितम्॥ तस्मात् पौरुषमेवेह श्रेष्ठमाहुर्मनीषिण:॥ २।। प्रतिकूलं तथा दैवं पौरुषेण विहन्यते॥ मंगलाचारयुक्तानां नित्यम् उत्थान शालिनाम्॥ ३॥’’). याचा अर्थ आध्यात्मिक साधनेसाठी दैवाची साथ नसल्याची भावना झाली तरी साधकानं निराश न होता आणि प्रापंचिक कर्तव्यकर्मे न सोडता सत्कर्म म्हणजे साधनाभ्यास नेटानं सुरूच ठेवला पाहिजे, हाच साधकासाठीचा अर्थ आहे. तेव्हा साधकासाठी अनेक पुराणांत शुद्ध बोधाचे असे अगणित किरण सामावले आहेत. तर पुराणकथेतलंही सार उमजून त्यातून प्रेरणा घेणं हे त्या पुराणाचं खरं वाचन आहे. बरं वाचून त्यात लीन व्हायचं आहे म्हणजेच त्यातून प्रेरणा घेत जीवन घडवायचं आहे. तरच खरं वाचन साधलं असं म्हणता येईल.

आता ‘सर्व’ अर्थात ‘शर्वात्मक’ असा जो, त्याची कथा ऐकता तल्लीन होणं म्हणजे काय? तर जो सर्वव्यापी आहे असा परमात्मा ज्याच्या जीवनात पूर्णपणे व्याप्त आहे आणि म्हणून ज्याचं वागणं-बोलणं, प्रत्येक कृती ही जणू परमात्म प्रेरितच आहे त्याच्या जीवनाशी एकरूप होणं. हे काही लगेच साधत नाही. त्यांच्या जीवनातील प्रसंग ऐकण्यात प्रथम मर्यादित गोडी निर्माण होते. मात्र तीही फार काळ टिकत नाही. आपल्या जगण्यातील अडीअडचणींचं स्मरण काही फार काळ सुटत नाही! ते स्मरण होताच त्या अवीट गोडीच्या प्रसंगांमध्येही मन रमत नाही. पण हा आंतरिक संघर्ष सुरू असतानाच हे वाचन म्हणजेच श्रवण नेटानं चालू राहिलं तर एखादा प्रसंग तरी मनात प्रवेश करतोच. मनात शिरकाव केलेला हा प्रसंग मग अलगद आपलं कार्य सुरू करतो. आयुष्यातल्या एखाद्या अटीतटीच्या प्रसंगी असा एखादा प्रसंग, एखादं बोधवचन मनाच्या तळातून उसळी मारून वर येतं आणि अंतर्मुख होण्याची प्रक्रिया सुरू करून देतं.

  – चैतन्य प्रेम

First Published on September 4, 2017 7:30 am

Web Title: shravan and eclipse
टॅग Eclipse,Shravan