26 February 2021

News Flash

९. ईश सर्वा गुणांचा

आता सर्व गुण म्हणजे किती? तर सत्, रज आणि तम हे तीन गुण आहेत, असं सनातन तत्त्वज्ञान सांगतं.

हा ‘गणाधीश’ सद्गुरू कसा आहे? तो ‘ईश सर्वा गुणांचा’ही आहे. आता सर्व गुण म्हणजे किती? तर सत्, रज आणि तम हे तीन गुण आहेत, असं सनातन तत्त्वज्ञान सांगतं. ‘दासबोधा’च्या दुसऱ्या दशकात रजोगुण, तमोगुण आणि सत्त्वगुण या तिन्ही गुणांचा तपशीलवार आढावा समर्थानी घेतला आहे. ही समस्त सृष्टी त्रिगुणांची बनली आहे, असा सिद्धांत प्रथम कपिलाचार्यानी मांडला, असं पू. बाबा बेलसरे यांनी नमूद केलं आहे. जर हे समस्त विश्व त्रिगुणांचं बनलं आहे, तर माणूसही या त्रिगुणांत बद्ध असलाच पाहिजे. समर्थही म्हणतात, ‘‘मुळीं देह त्रिगुणाचा। सत्वरजतमाचा।।’’ आता हा देह त्रिगुणाचा आहे, म्हणजे काय, हे आपण पाहूच, पण त्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हा देह ज्या मनाच्या तालावर नाचतो ते अहंप्रेरितच आहे. त्यामुळे गुण कोणताही असो अहंकाराची जपणूक आणि पूर्ती हाच माणसाच्या प्रत्येक कृतीचा हेतू असतो. या प्रत्येक गुणाचा मानवी जीवनावर काय प्रभाव पडतो, या गुणांमुळे काय होतं, हेदेखील समर्थानी सांगितलं आहे. ते म्हणतात, ‘‘रजोगुणे पुनरावृत्ती।’’ रजोगुण हा माणसाला सक्रीय करतो, अनंत कृतींच्या आवर्तनात अडकवतो आणि त्यातून अहंकार जोपासायला वाव देतो. या कर्मसाखळीतूनच जन्म-मरणाचीही पुनरावृत्ती होत असते. तमोगुणानं काय होतं? समर्थ सांगतात, ‘‘तमोगुणे अधोगती। पावति प्राणी।।’’ म्हणजे तमोगुणानं अधोगती प्राप्त होते. मोह, आळस, सुस्ती, क्रोध वाढविणारा तमोगुण हा जणू निष्क्रीय राहून अहंकार जोपासू पाहातो. येनकेनप्रकारेण स्वार्थपूर्तीसाठी धडपडत असतो. सत्त्वगुणाबद्दल समर्थ सांगतात की, ‘‘सत्त्वगुणें भगवद्भक्ती।’’ रजोगुण हा सक्रीयतेतून तर तमोगुण हा निष्क्रियतेतून अहंकार जोपासत असतो तर सत्त्वगुण हा अकर्तेपणाची जाणीव करून देत अहंकाराला भगवंताच्या पायी समर्पित करण्याची प्रेरणा देतो. या सत्त्वगुणाला समर्थानी ‘उत्तम गुण’ म्हणून गौरविलं आहे.  पण हा सत्त्वगुण कसा वाढवावा, हे साधकाला उमगत नाही आणि तो वाढत गेला तरी अहंकार काही कमी होत नाही, उलट सात्त्विक अहंकार हा जास्त आत्मघातकी असतो, हेदेखील साधकाला जाणवू लागतं. हे चित्र कसं पालटावं, हे काही केल्या कळत नाही. त्यासाठीही या त्रिगुणांच्या खेळात गुंतलेल्या मनाकडेच थोडं बारकाईनं लक्ष द्यायला हवं! आता हा देह त्रिगुणाचा घडला आहे, असं समर्थ म्हणतात, पण थोडा खोलवर विचार केला की लक्षात येतं की देह तर पंचमहाभूतांचा घडला आहे! पण हा देह ज्या मनाच्या ओढीनुरूप वावरत असतो ते मन या त्रिगुणांच्या प्रभावात आबद्ध आहे! त्यातही मानवी मनाचा गुंता असा की प्रत्येकात या तिन्ही गुणांचं मिश्रण आहे आणि त्यात जो गुण प्रधान असतो त्यानुसारचा तो माणूस मानला जात असला तरी अन्य दोन्ही गुणही अधेमधे उफाळून या मनाला नाचवत असतात. म्हणजेच एखाद्यात रजोगुण प्रधान असला तरी तमोगुण आणि सत्वगुणही त्याच्यात असतात. एखादा तमोगुणप्रधान असला तरी त्याच्यात सत्वगुण आणि रजोगुणही असतात. अगदी त्याचप्रमाणे एखादा सत्वगुणप्रधान असला तरी त्याच्यात रजोगुण आणि तमोगुणही असतात! कोणताही गुण प्रधान असला तरी अहंकार हाच सर्वात प्रधान असतो आणि त्यामुळे सत्त्वगुणी साधकालाही अहंकाराचा बीमोड कसा करावा, हा पेच पडत असतोच. या तिन्ही गुणांत अडकलेल्या मनाला साधनेत स्थिर कसं करावं, हे साधकाला उमगत नाही. त्यासाठी जो या तिन्ही गुणांच्या प्रभावापलीकडे आहे, नव्हे ज्याच्या ताब्यात हे तिन्ही गुण आहेत, अशा सद्गुरूचीच गरज लागते. त्यामुळेच हा सद्गुरू ‘ईश सर्वा गुणांचा’ आहे! अशा त्रिगुणातीत सद्गुरूला नमन असो!

चैतन्य प्रेम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2016 6:03 am

Web Title: three qualities in dasbodh granth
Next Stories
1 ८. गणाधीश : २
2 ७. गणाधीश : १
3 ६. विचार संस्कार
Just Now!
X