पोस्ट कोविड आजाराचा धोका टाळा

औरंगाबाद : दुसऱ्या लाटेत बालकांमध्ये करोना संसर्गाची लागण झपाटय़ाने होत असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या तीन दिवसात करोना बाधित ९४ बालके आढळून आली आहेत. शून्य ते पाच वयोगटातील १ हजार ३३७ आणि पाच ते आठरा वयोगटातील ७ हजार ५७९ बालके करोना बाधित आहेत. करोना पश्चातही या मुलांची अधिक काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे पालकांनी मुलांच्या आजाराकडे अजिबात दुर्लक्ष करू नये, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडाळकर यांनी केले आहे.

करोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना धोका वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली असून  प्रशासनाने तिसरी लाट रोखण्यासाठी तयारी सुरू केली आहे. बालकांना साधा ताप, सर्दी, खोकला झाला असलातरी तातडीने डॉक्टरांकडून उपचार करुन घ्यावेत, तसेच बालकांना करोना संसर्ग झाल्याचे आढळून आले तर घाबरून न जाता  उपचार करावेत असे आवाहन करण्यात आले आहेत.  बालकांना आजाराबद्दल फारसे सांगता येत नाही, अशा वेळी डॉक्टरांच्या सल्लय़ाने त्याचा आजार समजून घेतला तर करोना पश्चातील धोके टाळता येतील असेही आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.