विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
भारताचे चांद्रयान-एक हे यान २२ ऑक्टोबर २००८ रोजी चंद्राच्या दिशेने झेपावले. याच यानावर असलेल्या यंत्रणांच्या माध्यमातून नंतर चंद्रावर पाणी असल्याचा या शतकातील महत्त्वाचा ठरावा, असा शोधही लागला. गेली कैक वष्रे माणूस जे शोधत होता ते त्याला गवसले. यात भारताचे योगदान खूप मोठे होते. चांद्रयान एक ही फक्त भारतासाठीच नव्हे तर जागतिक पटलावरीलही महत्त्वाची घटना होती. अनंत अडचणींना सामोरे जात चांद्रयान झेपावले होते. भारतासारख्या देशात एखादा निर्णय झाला तरी तो प्रत्यक्षात यायला दीर्घकाळ वाट पाहावी लागते. नोकरशाहीचा अडथळा सर्वात मोठा असतो. या सर्वावर चांद्रयानाने मात केली होती.

अगदी अखेरच्या क्षणापर्यंत अडचणींशी झुंज सुरूच होती. २२ ऑक्टोबरला सकाळी ६.२२ वाजता उड्डाण होणार होते आणि आदल्या रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. समोर काही फुटांवरचेही दिसत नाही अशी अडचण होती, त्यामुळे प्रक्षेपकही दिसत नव्हता. त्यामुळे काऊंटडाऊनमध्ये मोठाच अडथळा आला होता. काऊंटडाऊनचे तीन तास वाया गेले, पण ‘इस्रो’चे तत्कालीन प्रमुख माधवन नायर यांनी मध्यरात्री नियंत्रण कक्ष गाठला. ‘इस्रो’मधील संशोधकांशी संवाद साधला. संशोधक म्हणाले की, पावसाचा वेग जरासा कमी झाला तरी सगळेजण वाया गेलेले तास अवघ्या दीड तासात भरून काढतील आणि झालेही तसेच; पहाटे अडीच वाजता पावसाचा वेग कमी झाला. त्यानंतरच्या अवघ्या दीड तासात आधीचे वाया गेलेले तीन तास भरून काढून चांद्रयान वेळेत झेपावले. काऊंटडाऊनमध्ये सर्व यंत्रणा व्यवस्थित काम करताहेत ना, याची चाचणी केली जाते म्हणून ते महत्त्वाचे होते. काही तासांचा अवधी असताना दीड तासात तीन तासांचा वाया गेलेला कालावधी भरून काढण्याची ही जगातील अशी एकमेवाद्वितीय घटना होती. मात्र ती जनतेसमोर आलीच नाही, कारण दुसऱ्या दिवशीचे वर्तमानपत्रांतील रकाने राज ठाकरे यांनी परराज्यातून आलेल्यांविरोधात पुकारलेल्या आंदोलनाची छायाचित्रे आणि बातम्यांनी भरून गेलेले होते.

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था असलेल्या ‘नासा’चे तत्कालीन प्रमुख या उड्डाणाच्या वेळी जातीने हजर होते. त्यांनी उल्लेख केला होता की, ‘नासा’च्या एका मोहिमेचे बजेट म्हणजे ‘इस्रो’च्या वर्षभराच्या खर्चाएवढे असते. असे असतानाही भारतीय संशोधक यशस्वी मोहिमा राबवतात ही केवळ वाखाणण्यासारखी नव्हे तर अमेरिकन संशोधकांनी शिकण्यासारखी गोष्ट आहे. महत्त्वाचे म्हणजे ‘नासा’ आणि ‘युरोपिअन स्पेस एजन्सी’ने आपल्या काही यंत्रणा भारतीय चांद्रयानातून पाठविलेल्या होत्या. त्यातील एका यंत्रणेनेच चंद्रावरील पाण्याचा शोध घेतला, हे महत्त्वाचे. नामवंत अंतराळ संशोधन संस्थांनी भारतीय यानातून आपल्या यंत्रणा पाठविण्याचा निर्णय घेणे याला अनन्यसाधारण महत्त्व होते, तो भारतीय संशोधकांवर व्यक्त केलेला जाहीर विश्वास होता. भारताचे चांद्रयान चंद्रावर पोहोचणारच हा त्यामागचा विश्वास होता.

त्यापूर्वी अनेक राष्ट्रांनी चांद्रयान मोहिमा होती घेतल्या होत्या. पहिल्याच फटक्यात कोणाचेच चांद्रयान चंद्राच्या कक्षेत पोहोचलेले नव्हते, अगदी अमेरिका आणि रशियाचेदेखील. कारण चंद्राच्या कक्षेजवळ गेल्यानंतर योग्य अंशात वळण घेऊन चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणे महत्त्वाचे असते. बहुतांश मोहिमांना याच टप्प्यावर अपयश आले होते. भारत हा पहिल्याच फटक्यात चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश करणारा जगातील पहिलाच देश ठरला. असे अनेक मानाचे तुरे आपल्या शिरपेचात आहेत. मात्र त्याचे कौतुकच झाले नाही. आता त्या यशाला दशकपूर्ती झाली तरीही सर्जकिल स्ट्राइकच्या वर्षपूर्तीत गुंतलेल्या सरकारला चांद्रयानाची आठवणही नाही. चंद्रावर पाणी शोधणाऱ्यांचे विस्मरण सरकार आणि नागरिक दोघांनाही झाले आहे, याला काय म्हणावे?