महाभारत किंवा रामायण प्रत्यक्ष घडले आहे का किंवा त्याचे पुरावे काय हे दोन्ही प्रश्न समस्त भारतवर्षांमध्ये आजवर सर्वाधिक चर्चा झालेले आणि अनेकांना स्वारस्य असलेले प्रश्न आहेत. मात्र या स्वारस्यामागे अनेकांचे हितसंबंधही त्यात गुंतलेले आहेत. कुणाला हे सारे आपले वैभव म्हणून डांगोरा पिटायचा असतो तर कुणाला किती हा मागास समाज असे त्यातून दाखवून द्यायचे असते. कुणाला त्यातून त्या काळीही आमच्याकडे दूरसंवेदन यंत्रणा अस्तित्वात होती हे संजयाच्या माध्यमातून सांगायचे असते तर कुणाला अगदी तेव्हापासून स्त्रियांवर होणारा अत्याचार ठासून सांगायचाच असतो. मात्र खरे तर या साऱ्याकडे आपापले भगवे, हिरवे, निळे आदी चष्मे बाजूला ठेवून केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनातून व पुराव्यांच्या आधारे पाहण्याची गरज आहे. असाच एक प्रयत्न अलीकडेच पुरातत्त्व विज्ञानाच्या क्षेत्रातील काही तज्ज्ञांनी केला. यापूर्वीही महाभारताच्या कालनिश्चितीचे प्रयत्न झाले. कुणी खगोलीय बाबींच्या आधारे त्याचा कालखंड निश्चित करण्याचा प्रयत्न केला तर कुणी इतर कोणत्या तरी कालगणनेच्या आधारे प्रयत्न केला. मात्र त्यात कोणत्याही कालनिश्चितीबाबत इतर कोणताही ठोस पुरावा उपलब्ध होऊ  शकला नाही. त्याचप्रमाणे कालगणनेच्या इतर कोणत्याही पद्धतीशी त्यांचा निष्कर्ष जुळला नाही. मात्र अगदी अलीकडे काही पुराविदांनी असा प्रयत्न केला आणि महत्त्वाचे म्हणजे पुरातत्त्वीय उपलब्ध पुराव्यांच्याच आधारे नव्हे तर भाषाशास्त्रीय पुराव्याच्या आधारे केलेल्या या प्रयत्नांना आता दखल घेण्याएवढे यश लाभले आहे. या साऱ्याचा आढावा वैज्ञानिक पद्धतीने घेतला जावा आणि त्यावर चर्चा व्हावी, हाच या विषय निवडीमागचा ‘लोकप्रभा’चा विचार आहे. ‘लोकप्रभा’च्या वर्धापन दिन विशेषांकाची ही कव्हरस्टोरी पुरातत्त्व विज्ञानाच्या क्षेत्रातील दोन दिग्गज तज्ज्ञ डॉ. मधुकर केशव ढवळीकर आणि डॉ. अरविंद जामखेडकर यांनी लिहिली आहे. गरज आहे ती, आपापले चष्मे बाजूला ठेवून या संशोधनाकडे पाहण्याची.

या संशोधनाचे दुसरे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे आजवर अनेक वर्षे आपण वाद घालत आलो की, आर्य मूळचे कुठले. ते नेमके कुठून भारतात आले. अलीकडच्या काळातील भारतीय इतिहास आपल्यासमोर मांडण्याचे काम केले ते प्रामुख्याने ब्रिटिशांनी आणि युरोपिअन तज्ज्ञांनी. त्यांनी जो इतिहास त्यांच्या आकलनानुसार मांडला तोच आपण स्वीकारला आणि तोच प्रमाण माणून आपण पुढील संशोधनही केले. भारत म्हणजे अप्रगत लोकांचा देश अशीच त्यांची धारणा होती. ती त्यांनी आर्य भारताबाहेरून आले असे सांगून आपल्या माथी मारली. त्यांच्या हाती असलेले मुद्दे पुराव्यादाखल दिले आणि आपल्याला स्वीकारायलाही लावले. मात्र अलीकडचे हे संशोधन आर्य भारताबाहेरून आले या मूळ ऐतिहासिक गृहीतकालाच छेद देणारे आहे. आर्य व सिंधू संस्कृतीतील लोक हे वेगळे नव्हते तर ते एकच होते, असे आपल्याला हे नवे संशोधन पुरातत्त्वीय आणि भाषाशास्त्रीय पुराव्यांच्या आधारे सांगते. या संदर्भात सापडलेला सर्वात महत्त्वाचा पुरावा हा आपल्याकडील नाही तर तो टर्कीमधील आहे. यावर इंद्र, वरुण आदी वैदिक देवतांची नावे कोरलेली सापडली आहेत. हा इसवी सन पूर्व १३०० मधील कोरलेला लेख आहे. आर्य बाहेरून म्हणजेच पर्शियाआदी भागातून भारतात आलेले असतील तर या भागातून पुढे भारताच्या दिशेने आल्यानंतर भारतात आर्यांशी संबंधित बाबी सापडायला हव्यात. पण भारतातील आर्याचे अस्तित्व हे त्यापूर्वीचे आहे. मग तुर्कस्थानमध्ये त्यानंतरचा पुरावा सापडतो याचा अर्थ काय मानायचा. असा प्रश्न गेले शतकभर संशोधकांना पडला होता. कारण हा मातीच्या पाटीवरील कोरलेला लेख १९०७ साली केलेल्या उत्खननात सापडला होता. त्या प्रश्नाला आता साधार उत्तर भारतीय संशोधकांनी दिले आहे.

Bombay high court, verdict, Compensation, acid attack victims
अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

इसवी सनपूर्व काळात सुमारे २३००च्या आसपास आलेल्या महापुरानंतर सिंधू संस्कृतीची मंडळी (आता आपण आर्य आणि सिंधू संस्कृती हा भेद मिटवून सिंधू संस्कृती असाच उल्लेख करणे इष्ट ठरावे) अन्नाच्या शोधार्थ भटकत पसरत गेली. त्यामुळे ती एका बाजूस बिहार, उत्तर प्रदेश, माळवा आणि महाराष्ट्रापर्यंत आली, त्या त्या ठिकाणी हडप्पाकालीन मृदभांडय़ांचे अवशेष उत्खननात सापडले आहेत. ज्या हस्तिनापूरचा उल्लेख महाभारतात येतो, त्या हस्तिनापुरात आलेल्या पुरानंतर राजधानी कौशम्बीला हलविल्याचा उल्लेखही येतो. त्या पुराच्या गाळात अडकलेल्या मृदभांडय़ांचे अवशेष संशोधकांना सापडले असून त्याची केलेली कालनिश्चिती ही या संशोधनातून समोर आलेल्या कालखंडाशी नेमकी जुळणारी आहे.  हा पूर केवळ भारतातच नव्हे तर जगभरातही इतरत्र आला होता. त्याच्या कथा, दंतकथा आपल्याला मनूची कथा किंवा बायबलमध्येही येणाऱ्या पुराच्या कथेच्या निमित्ताने ऐकायला, वाचायला मिळतात. शिवाय एका विख्यात वनस्पतिशास्त्रीय जीवाश्मांचा शोध घेणाऱ्या बेल्जिअन तज्ज्ञाच्या संशोधनातही हे पुराचे नेमके वर्ष सिद्ध झाले असून त्याच्याशी ही कालगणना नेमकी जुळणारी आहे.  हा पूर आला होता, त्या वर्षी झाडाच्या खोडाच्या आतमध्ये सापडणाऱ्या वर्तुळात एक वर्तुळ सापडत नाही. ते न सापडणारे वर्तुळ त्या पुराच्या किंवा भूकंपसदृश जागतिक घडामोडीच्या घटनेचे निदर्शक असल्याचे त्या तज्ज्ञाने सिद्ध केले आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजवर आपल्याकडील कथा, दंतकथा यांच्याकडे आपण भाकडकथा म्हणून दुर्लक्ष केले होते. मात्र पुरातत्त्व विज्ञानातील नवीन शाखा पोस्ट प्रोसेस्युअल आर्किऑलॉजी याचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून त्यातील भाकड भाग गाळून मूळ गाभा स्वीकारून त्याचा संशोधनासाठी वापर करते. महाभारताशी संबंधित उपलब्ध असलेल्या अशा अनेक कथा-दंतकथांचा वैज्ञानिक पद्धतीने केलेला अभ्यास त्यातून हाती आलेली माहिती हीदेखील या कालगणनेशी नेमकी जुळणारी आहे, हे विशेष. यात उदयन राजा व घोषितारामाच्या कथेचाही समावेश आहे. हस्तिनापूरचा उदयन राजा हा गौतम बुद्धांच्या समकालीन होता. त्याचा अर्थमंत्री असलेल्या घोषितारामने बुद्धांसाठी विहार बांधला होता, त्याच्या नोंदी सापडतात. या नोंदी व महाभारताची कालगणना ही गणिताने नेमकी जुळणारी असून त्यांचा वापर गणितातील ताळ्याप्रमाणे संशोधकांनी पुराव्याच्या सिद्धतेसाठी केला आहे. या साऱ्यावर डॉ. ढवळीकर यांनी प्रकाश टाकला आहे.

या संशोधनाचा दुसरा महत्त्वाचा विशेष म्हणजे भाषाशास्त्राचा करण्यात आलेला वापर. तत्कालीन नावांचा शोध, त्यांची उत्पत्ती, तत्कालीन भाषांचे अस्तित्व आणि त्यांचा भारतीय- आर्य (इंडो- आर्यन) समजल्या जाणाऱ्या भाषांशी असलेला संबंध, अवेस्ता आणि संस्कृतचा संबंध या सर्व बाबींवर या संशोधनात नव्याने प्रकाश पडला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे भाषाशास्त्रीयदृष्टय़ाही ही कालगणना नेमकी चपखल बसणारी आहे. त्यावर पुरातत्त्व आणि भाषाशास्त्र या दोन्हींतील तज्ज्ञ  डॉ. अरविंद जामखेडकर यांनी प्रकाश टाकला आहे. या संशोधनामुळे आता भाषाशास्त्रामध्येही एक नवा विचार आपल्याला करावा लागणार आहे. आजवर संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे, असे आपण म्हणत होतो. संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश आणि मग महाराष्ट्री किंवा मऱ्हाटी अशी उतरंड सांगितली जात होती. मात्र नव्या संशोधनामध्ये संस्कृतपूर्वीही प्राकृत भाषा व अपभ्रंश किंवा प्राकृतचीही प्राकृत असलेली अशी मूळ भाषा अस्तित्वात असावी, असे लक्षात आले असून तसे पुरावेही संशोधकांना सापडले आहेत. नवे भाषाशास्त्रीय प्रश्न संशोधकांनी उपस्थित केले आहेत. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या भाषाशास्त्रीय उतरंडीलाही धक्का बसणार आहे. भाषा हीदेखील पुरातत्त्वीय संशोधनात तेवढीच महत्त्वाची असते, हेच यामुळे सिद्ध झाले आहे. त्याच वेळेस या पुढील सर्व संशोधनाचे काम हे आंतरशाखीय (इंटर डिसिप्लिनरी) पद्धतीने केल्यास ते अधिक प्रगल्भ आणि नेमके असेल, हेही सिद्ध झाले आहे. संशोधनाचा हा नवा प्रवाह ‘लोकप्रभा’च्या विचारी वाचकांना अवगत करून द्यावा, यासाठीच हा सारा खटाटोप. त्यासाठी फक्त आपापल्या विविध विचारांचे खांद्यावरील झेंडे उतरवून ठेवणे अनिवार्य असेल, हे विसरू नये.

गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या या नव्या वर्षांत वैज्ञानिक विचारांना अधिक पक्के करत मार्गक्रमण करण्यासाठी ‘लोकप्रभा’चे वाचक, हितचिंतक, जाहिरातदार सर्वांनाच मन:पूर्वक शुभेच्छा!
vinayak-signature
विनायक परब
vinayak.parab@expressindia.com, Twitter – @vinayakparab