11 December 2019

News Flash

‘मोदी होई ना!’

गेल्या खेपेस देशभरात मोदी लाट असतानादेखील लोकसभेच्या ४२ पैकी केवळ दोनच जागा भाजपालाजिंकता आल्या होत्या.

ममता बॅनर्जीनी

विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

मोदीबाबू, आम्हा बंगालींना काही बोलण्याच्या आधी तुम्ही गृहपाठ व्यवस्थित करायला हवा होता.. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री रणरागिणी ममता बॅनर्जी जाहीर सभेत बोलत असतात. त्यानंतर सुरू होणारे हावभाव आणि नकला या मराठी माणसाला थेट बाळासाहेब ठाकरे यांच्या जाहीर सभांची आठवण करून देणाऱ्या असतात. ममता बॅनर्जीना बंगाल ममतादी किंवा ममतादीदी या नावाने ओळखतो. खरे तर त्याच बंगाली जनतेला नेमक्या ओळखून आहेत. बंगाली जनतेची नस त्यांनी नेमकी पकडली आहे म्हणून तर वर्षांनुवर्षे पश्चिम बंगालमध्ये सत्तेला चिकटून राहिलेल्या डाव्या पक्षांना त्या सत्तेतून खाली खेचू शकल्या. ममता बॅनर्जी या गोपीनाथ मुंडेंसारख्या खऱ्या लोकनेत्या आहेत. तळागाळातील कार्यकर्त्यांशी आणि समाजाची थेट संपर्क हे त्यांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. अखेरच्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकांमध्ये आकर्षणिबदू पश्चिम बंगालकडे सरकला आहे. या निवडणुकीमध्ये बेछूट वक्तव्यांचा भडिमार झाला. विरोधकांवर टीका करताना सत्ताधाऱ्यांचे भान सुटले, अगदी पंतप्रधानांचेही. ज्या प्रकारची टीका झाली त्या टीकेला त्याच पातळीवर जाऊन उत्तर देण्याचे धाष्टर्य़ या निवडणुकीत फक्त ममता बॅनर्जी यांनी दाखवले. ज्या भाषेत टीका त्याच भाषेत उत्तर, ज्या स्वरात टीका त्याच स्वरात उत्तर.. तेही तेवढय़ाच जाहीररीत्या, त्याच पद्धतीने.

जाहीर सभेत प्रश्न विचारून समोरच्या जनसमुदायाकडून उत्तरे घेण्याची मोदींची पद्धती त्यांचीच शैली उचलत ममता बॅनर्जीनी त्यांना उत्तर दिले. पश्चिम बंगालमध्ये तर आता दुर्गा पूजा करणेही मुश्कील झाले आहे, कारण हे ममता सरकार आता मुस्लिमांच्या लांगूलचालनात अडकले आहे, अशी टीका पंतप्रधानांनी जाहीर भाषणात बंगालमध्ये केली होती. त्याला ममता बॅनर्जीनी त्याच पद्धतीने उत्तर दिले. त्या म्हणाल्या, आमच्याकडच्या शाळेत ‘दीदी’मॉनी (शिक्षिका) (पश्चिम बंगालमध्ये ममतांना दीदी म्हणतात) ओरडतील म्हणून मुले गृहपाठ व्यवस्थित करतात. तुम्ही तर गृहपाठ न करताच आलात आणि बंगालींना काय सांगितलेत तर इथे म्हणे दुर्गापूजा होत नाही. आता मला सांगा माझ्या बंधू आणि भगिनींनो.. असे म्हणून त्या जनता जनार्दनाला साद घालतात.

सांगा दुर्गापूजा होते की नाही?

जनता म्हणते – हो, होते.

तुम्हाला दुर्गापूजेपासून कुणी रोखते का?

जनता- नाही.

लक्ष्मीपूजा होते ना इथे?

जनता- हो.

सरस्वतीपूजा?

जनता- हो.

बोरो दीन (नाताळ)?

जनता- हो.

रमझान आणि छठपूजा?

जनता- हो.

मग त्या म्हणतात, फक्त एकच गोष्ट इथे होत नाही.. (बंगालीमध्ये) मोदी होई ना.

मोदी होणार नाही इथे!

बीजेपी होई ना !

मिथ्या होई ना!

कुत्शा होई ना!

मोदी स्टाइलमध्ये मोदींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे.

ज्या टेलिप्रॉम्प्टरकडे पाहून तुम्ही भाषण करता. त्या टेलिप्रॉम्प्टरमध्ये हे फीड करून ठेवा की, पश्चिम बंगालमध्ये जाण्याआधी गृहपाठ करायला हवा, म्हणजे चुका होणार नाहीत.. ममता कडाडतात. मग त्या काहीच शिल्लक ठेवत नाहीत. मोदींना सरस्वतीमंत्र तरी येतो का, अशी विचारणा करतात आणि मग स्वतच संस्कृतमधून सरस्वतीमंत्र म्हणून दाखवतात. मग मोदी सरकारने खाण्यापिण्यावर घातलेल्या बंधनांवर घसरतात, आम्ही गुजरातमध्ये ढोकळा खातो, केरळमध्ये उपमा, बिहारमध्ये लिट्टी चोखा. पण तुम्ही तर इथे लोकांना सांगता मांस, मासे, अंडी खाऊ नका. गरोदर बायकांनी मग पोषणासाठी काय खायचं? आणि बायकांनी काय खावं हे सांगणारे तुम्ही कोण मोदीबाबू? मला तर वाटत होते की, ते संघाचे नि:स्वार्थ कार्यकर्ते आहेत, पण आजकाल त्यांचे प्रचारक पूर्ण विजार घालून शॉिपग मॉलमधून ब्रीफकेस घेऊन पैसे गोळा करताना दिसतात. ममता बॅनर्जीच्या टीकेनेही आता कडवट पातळी गाठली आहे. जेवढी जहरी टीका तेवढेच जहरी उत्तर. यापुढे काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी किंवा प्रियंकाच्या सर्व सभा अगदीच फिक्या पडतात. मोदी-शहांनाही इथे पश्चिम बंगालमध्ये बॅनर्जी यांच्याच विरोधाला सामोरे जावे लागणार आहे. मात्र भाजपाची सारी भिस्त ही महाराष्ट्रानंतर याच राज्यावर अवलंबून असल्याने भाजपा आणि शहा-मोदींनीही इथे सारे लक्ष केंद्रित केलेले दिसते.

पश्चिम बंगालमधील परिस्थिती आता खूप बदलली आहे. गेल्या खेपेस म्हणजे २०१४ च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळेस ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे झेंडे तुलनेने अधिक फडकत होते. आता मात्र या खेपेस भारतीय जनता पार्टीचे झेंडे त्या झेंडय़ांशी स्पर्धा करताना दिसताहेत. हा दृश्यबदलही तेवढा महत्त्वाचा आणि वेगळा संदेश देणारा आहे. कारण गेल्या खेपेस देशभरात मोदी लाट असतानादेखील लोकसभेच्या ४२ पैकी केवळ दोनच जागा भाजपालाजिंकता आल्या होत्या. तृणमूलला ३४, काँग्रेसला चार, तर सीपीआयएमला दोन जागा मिळाल्या होत्या. या खेपेस भाजपाने लावलेला जोर पाहता त्यांच्या जागा निश्चितच वाढणार हे तर तृणमूलचे कार्यकर्तेही खासगीत मान्य करतात. मात्र नेमक्या किती जागा मिळणार याचा अंदाज नेमका कुणालाच नाही. उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या मायावतींच्या बसपा आणि समाजवादी पार्टीच्या गठबंधनामुळे भाजपाच्या तेथील जागा अध्र्यावर येणे अपेक्षित आहे. तिथे बसणारा फटका भरून काढण्यासाठीच भाजपाने शिवसेनेच्या सर्व मागण्या मान्य करीत महाराष्ट्रामध्ये त्यांच्यासमोर लोटांगण घातले. कारण महाराष्ट्र हे उत्तर प्रदेशनंतर लोकसभेच्या सर्वाधिक जागा असलेले राज्य आहे. या ठिकाणी सध्या भाजपा-सेना सत्तेत असल्याने त्यांना सर्वाधिक जागा मिळण्याची खात्री आहे. पश्चिम बंगाल हे महाराष्ट्रानंतर सर्वाधिक खासदार निवडून देणारे राज्य असल्याने तिथेही भाजपाला अधिक अपेक्षा आहेत. शिवाय गेल्या पाच वर्षांमध्ये भाजपाने इथे जोरदार प्रयत्न सुरू केले असून मध्यंतरी झालेल्या काही स्थानिक नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये बाजीही मारली आहे. त्यामुळे त्या आक्रमकतेचा फायदा लोकसभा निवडणुकांमध्येही होणे भाजपाला अपेक्षित आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी इथे किमान २३ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला आहे. पश्चिम बंगालमधून निवडून येणाऱ्या सर्वच जागा त्यामुळे भाजपासाठी अतिमहत्त्वाच्या या वर्गात मोडणाऱ्या असणार आहेत. सत्तेच्या गणितामध्ये उत्तर प्रदेश अध्र्यावर आल्याचे दिसत असल्याने भाजपाचा भरोसा हा महाराष्ट्र आणि बंगालवर असणार आहे.

त्यामुळेच बंगालच्या सर्व सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचंड आक्रमक झालेले दिसतात. भाजपाध्यक्ष शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या प्रचारकांनीही मोदींच्याच आक्रमकतेची री ओढलेली दिसते. बंगालच्या प्रचारसभांमधून ममता बॅनर्जी या मुस्लिमांचे लांगूलचालन करणाऱ्या आहेत, असे सांगून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. त्यामुळे बजरंगबली विरुद्ध अली किंवा मग मुस्लीम म्हणजे देशाला लागलेली वाळवी, देशद्रोही असे आक्रमक शब्दप्रयोग वापरण्यात आले. त्या सर्वाचाच समाचार तेवढय़ाच आक्रमकतेने ममता बॅनर्जी यांनी घेतलेला दिसतो. संपूर्ण देशभरामध्ये मोदी-शहा यांचा प्रचाराचा भर काँग्रेसविरोधावर होता. मात्र बंगालमध्ये केवळ आणि केवळ ममता बॅनर्जी हेच टीकेचे लक्ष्य राहिले आहे. एकापाठोपाठ एक झालेल्या सर्व सभांमध्ये बॅनर्जी यांनीही तेवढय़ाच ताकदीने मोदींच्या भाषणांचा त्यांच्याच शैलीत समाचार घेतलेला दिसतो. चौकीदार चोर ही खरे तर काँग्रेसची घोषणा आहे. मात्र ममता बॅनर्जी त्यांच्या प्रचारसभांमध्ये ती बेमालूमपणे वापरताना दिसतात. एवढय़ा बेमालूमपणे की, ती तृणमूलचीच चपखल घोषणा वाटावी. मोदींचा प्रचारसभेतील भर प्रश्नोत्तरांवर असतो. तशीच प्रश्नोत्तरे बॅनर्जीच्या सभेत पाहायला मिळतात. हल्ली काही भाषणांमध्ये पंतप्रधान आवाजाचे चढउतार करतात त्या चढउतारांना तसेच उत्तर ममतादी देताना दिसतात. त्यामुळे निवडणुकांची अखेरच्या टप्प्यातील रंगत सध्या पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळते आहे. राहुल आणि प्रियंकांचेही आव्हान थिटे वाटावे, अशी स्थिती बंगालमध्ये पाहायला मिळते.

अर्थात सद्य:स्थितीत असे दिसते आहे की, यंदा तृणमूलच्या जागा कमी होतील आणि भाजपाच्या वाढतील. पण भाजपा त्यांना अपेक्षित असलेला २३ चा आकडा गाठणार का, हे पाहणे रोचक ठरावे. तो आकडा त्यांनी गाठला तर भविष्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये तृणमूलच्या नाकात दम येईल, याचे ते संकेत असतील. भाजपाला तो आकडा गाठता आला नाही  आणि केंद्रात सत्ता भाजपाची आली तरी राष्ट्रीय राजकारणातील ममता बॅनर्जी यांचे वजन निश्चितच वाढलेले असेल. २३ मे रोजी कळेल की, ममता बॅनर्जी म्हणतात त्याचप्रमाणे ‘मोदी होई ना’ असा कौल असेल की, त्यांच्याच नेतृत्वाला कडवे आव्हान मिळालेले असेल!

First Published on May 10, 2019 1:06 am

Web Title: narendra modi mamata banerjee west bengal
Just Now!
X