गावातील जीवन हे पूर्वी तुलनेने संथ होते आणि शहरातील जीवन मात्र प्रचंड धावपळीचे, पैशांमागे धावणारे. या शहरी धावपळीच्या जीवनात आपल्याच आयुष्याकडे दुर्लक्ष होते आणि विकारांची गाडी मागे लागते. ते टाळायचे तर गावाकडे जा, असे पूर्वी सांगितले जायचे. पण आताशा गाव असो अथवा शहर दोन्हीकडे धावपळ वाढलेलीच आहे. आयुष्यातील ताणतणावही वाढले आहेत. शहरातील प्रदूषणाने श्वास कोंडल्यासारखी अवस्था झाली आहे. हे प्रदूषणच अनेक विकारांसाठी कारण ठरते आहे. अशा वेळेस डॉक्टर रुग्णांना सल्ला देतात, हवापालट करून या. आताशा धावपळीत फक्त शहरवासीयच नव्हे तर गावकरी मंडळीही हवापालटाच्या शोधात असतात. माथेरान-महाबळेश्वर झालेले असते आणि कुलू-मनालीदेखील, मग जायचे कुठे हे कळत नाही. म्हणूनच या खेपेस ‘पर्यटन विशेष’मध्ये ‘लोकप्रभा’ने देशातील थंड हवेची हिमालयाच्या कुशीतील, ईशान्य भारतातील आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील वेगळी ठिकाणेही दिली आहेत.

अलीकडे सर्वानाच काही तरी वेगळे करून पाहायचे असते, पण अनेकदा वेगळे हे खूप खर्चीकदेखील असते. पण काही वेगळे हे अनोखे आणि तेवढेच स्वस्तही असू शकते हे ठसविण्यासाठी रिक्षातून सपत्नीक कोकण भ्रमंती करणाऱ्या मोहम्मद बँकवाला यांना आम्ही लिहिते केले आहे. ही भ्रमंती वाचकांना खास आवडावी आणि त्यासोबत येणारी त्यांची बारीक निरीक्षणे उपयुक्त ठरावीत.

विश्वभ्रमंतीचे उद्दिष्ट ठेवलेल्या वाचकांसाठी आम्ही या खेपेस अमेरिका- ईस्ट टू वेस्ट कोस्ट हा खास लेखांक दिला आहे. पुढील अंकांमध्येही तो क्रमश: प्रकाशित होईल. त्याचप्रमाणे वेगळ्या विदेशी सफरीसाठी बर्फ आणि ज्वालामुखी दोन्ही असलेली आइसलँडची भ्रमंती वेगळी ठरावी. वय अधिक असणं ही अडचण नसते हेही या लेखातून लक्षात येईल. पण मग तरुणांनी काय करायचे? तर त्यांच्यासाठी बॅकपॅकिंगचा पर्याय आहेच. कसे कराल हे बॅकपॅकिंग, ते करताना नेमकी काय काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन आणि भ्रमंतीची गंमत युरोपच्या लेखातून अनुभवता येईल.

भारत म्हणजे मंदिरांचा देश. विदेशी पर्यटकांनाही याचे कोण आकर्षण! पण मग आपणच आपली मंदिरे केव्हा पाहणार? स्थापत्यरचनेसाठी पाहायलाच हवीत अशी पाच मंदिरे ‘लोकप्रभा’ने निवडली असून त्यावरील आशुतोष बापट यांच्या लेखात मंदिरे कशी पाहावीत, याचेही मार्गदर्शन लाभेल. शिवाय सॅण्डल घातलेली स्त्री, काखेत पर्स लटकवलेली महिला कोणार्कच्या मंदिरावर काही शतकांपूर्वीच शिल्पित झाली आहे हे वाचून आश्चर्यमिश्रित धक्काही बसेल!

ठरावीक काळाने भ्रमंतीसाठी बाहेर पडल्याने किंवा हवापालट केल्याने मानसिक थकवा जातो, ताण हलका होतो, दु:खाचा विसर पडतो, रोगप्रतिकारकशक्ती वाढते, शारीरिक व मानसिक उभारी येते, स्मरणशक्ती वाढते, चांगली झोप लागते (खूप महत्त्वाचे कारण अलीकडचे सरकारी आरोग्य सर्वेक्षण सांगते की, भारतीयांची झोप उडण्याचे प्रमाण वाढते आहे) हे आता जगभरातील सर्व संशोधकांनी मान्य केले आहे. तर मग वाट कसली पाहायची. हवापालट करा!

हवा येऊ द्या!

विनायक परब –  @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com