19 April 2019

News Flash

विद्याधर सूरजप्रसाद नायपॉल (प्रश्नार्जुन)

ज्यांना लेखनाशी देणेघेणे आहे, अशा प्रत्येकाने नायपॉल वाचायलाच हवेत.

विद्याधर सूरजप्रसाद नायपॉल

विनायक परब –  @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
‘‘हे जग असेच आहे. जे कुणीच नाहीत ते कुणीही न होण्यासाठी स्वत:च कारणीभूत असतात, अशांना इथे स्थान नाही.’’

किंवा

‘‘इस्लाम समजून घेण्याच्या नावाखाली खोटा निधर्मीवाद भासवण्यात आला त्याची परिणती म्हणजे बाबरी मशीद पाडणे,’’ अशा अनेक ठाम विधानांनी समाजाचा तळ ढवळून काढणारे साहित्यक्षेत्रातील सर्वोच्च मानला गेलेला नोबेल पुरस्कारप्राप्त लेखक विद्याधर सूरजप्रसाद नायपॉल यांच्या निधनाच्या निमित्ताने त्यांना केवळ श्रद्धांजली वाहण्याचा ढोंगीपणा करण्याऐवजी त्यांनी वेगळ्या नजरेने मांडलेले मुद्दे आपणही तेवढय़ाच तटस्थतेने समजून घेतले पाहिजेत. खासकरून सध्याच्या फेसबुकी जमान्यामध्ये समाजमाध्यमे ही मोठीच व्यासपीठे आहेत. त्यामुळे आता लाखोंच्या संख्येने मंडळी लिहिती झाली आहेत. यात फेसबुकवर छान शब्दांमध्ये लिहिले किंवा एखाद्यावर जोरदार टीका केली किंवा ब्लॉग लिहिला की मंडळींना आपण लेखकराव झाल्यासारखे वाटते. अशा वेळेस नायपॉल समजून घेण्याचा प्रयत्न केला तर लेखक ‘दिसतो कसा आननी’ हे तरी कळण्यास नक्कीच मदत होईल. अन्यथा समाजमाध्यमावर व्यक्त होणाऱ्या प्रत्येकाला आपण लेखकच आहोत असा साक्षात्कार त्यांच्या लेखनावर बदाबदा मिळणाऱ्या लाइक्समुळे झालेला असतो. एकुणातच ज्यांना लेखनाशी देणेघेणे आहे, अशा प्रत्येकाने नायपॉल वाचायलाच हवेत.

सध्या जगभरामध्ये सर्वत्र उभ्या राहात असलेल्या स्थलांतरितांविरोधातील सार्वत्रिक होत चाललेल्या भूमिकांमध्ये नायपॉल अधिक उठून दिसतात. युरोपलाही स्थलांतरित नको, आशियालाही नकोत आणि अमेरिकेलाही नकोत. मात्र यापकी प्रत्येकाची समृद्धी ही स्थलांतरणातूनच आलेली आहे, हे वास्तव आहे. जगभरातील संस्कृतीमध्येही अशीच सरमिसळ आहे. एवढेच कशाला तर संस्कृतीप्रमाणेच धर्मामध्येही सरमिसळ आहे. फक्त ती आपण मान्य करत नाही एवढेच. या पाश्र्वभूमीवर स्वत: स्थलांतरित असल्याचे मनात खोलवर ठेवत, जग अनवाणी भटकणारा किंवा ज्याचे एकच एक ठिकाण नाही, असा ठिकाणरहित जिप्सी असेच नायपॉल यांचे वर्णन करावे लागते. त्यांच्या मनातील स्थलांतरणाच्या संदर्भातील धागेदोरे मात्र त्यांच्या साहित्यात अनेक परींनी उलगडलेले दिसतात. कधी ते स्वत:च्या कुटुंबाच्या स्थलांतरणाच्या संदर्भात येतात तर कधी स्वत:चीच कथा म्हणून येतात. मात्र तिथे ती केवळ एका कुटुंबाची कथा राहात नाही तर त्यांच्या नि:पक्ष अशा त्रयस्थ तीव्र निरीक्षणशक्तीमुळे त्याला एक वेगळेच जागतिक परिमाण लाभते. त्यामुळे प्रसंगी ती कादंबरी अथवा ते लेखन मग कधी ते प्रवासलेखन असते ते केवळ लेखन न राहता वसाहतवाद, धर्म आणि राजकारण या विषयांवर केलेले टीकात्मक भाष्य ठरते.

नायपॉल यांचा जन्म १७ ऑगस्ट १९३२ रोजी त्रिनिदाद येथे भारतीय िहदू कुटुंबात झाला. ऑक्सफर्ड विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली आणि ते इंग्लंडमध्ये दाखल झाले. विद्यापीठीय जीवनातच त्यांनी पहिली कादंबरी लिहिली. मात्र ती कांदबरी प्रकाशित व्हायला वेळ लागला. उत्तर भारतातून १८९४ साली थेट वेस्ट इंडिजमध्ये आलेले दुबे कुटुंबीय त्रिनिदादला स्थायिक झाले.  पं. रघुनाथ दुबे यांचे पुत्र कपिलदेव यांनी ‘दुबे’ आडनावाचा त्याग करून आपलेच नाव अपत्यांना दिले. यापकी एक होत्या द्रौपदी, या विद्याधर नायपॉल यांच्या आई. मजूर म्हणून आलेल्या कुटुंबाने नंतर मात्र चांगली संपत्ती राखली आणि ते कुटुंब मालक झाले. त्यांचे दुमजली घर उभे राहिले नायपॉल यांच्या आजोळी. याच घरावर नायपॉल यांची ‘अ हाऊस फॉर मिस्टर बिश्वास’ ही कादंबरी बेतलेली आहे. नायपॉल यांच्यावर पत्रकार असलेल्या वडिलांचा खूप मोठा प्रभाव होता. किंबहुना म्हणूनच लहानपणापासून आपण लेखक व्हावे हे सतत त्यांच्या मनात होते. लेखकाचा प्रवास कसा होतो आणि सामान्य गोष्टींनाही तो किती वेगळ्या पातळीवर नेऊन ठेवण्याची क्षमता राखतो याचा अदमास घ्यायचा असेल तर नायपॉल यांचे आयुष्य आणि त्यांच्या हातून झालेले नव्हे तर त्यांनी स्वत: घडवलेले लेखन पाहावे, म्हणजे त्याचा अंदाज येतो. वडील आणि मुलगा यांच्यामध्ये संवाद साधणारी पत्रे ही त्या काळी तशी नेहमीचीच होती. पण त्यावर ‘लेटर्स बिट्विन अ फादर अ‍ॅण्ड सन’ आकारास आले.  ‘मिस्टीक मॅस्यूर’चे लेखन विशेष गाजले आणि टीकाकारांच्या लक्षात आले. यामध्ये स्थलांतरितांकडे आणि त्यांच्या संस्कृतीकडे पाहणारी वेगळी नजर होती.

पण नायपॉल हे काही आपल्याला फक्त वेस्ट इंडिजमधील खासकरून त्रिनिदाद- टोबॅगोसारख्या वसाहतींमधील स्थलांतरितांचे जीवन दाखवून थांबत नाहीत तर त्यांची भारताकडे पाहण्याची दृष्टीही इतरांपेक्षा वेगळी आहे, हे आपल्याला लक्षात येते ते ‘अ‍ॅन एरिया ऑफ डार्कनेस’, ‘इंडिया अवूण्डेड सिव्हिलायझेशन’ आणि ‘इंडिया : अ मिलियन म्यूटिनीज नाऊ’ या पुस्तकांतून. इथे ते भाष्यकार आहेत, याची आपल्याला ओळख पटते. भाष्यकाराला स्वत:ची वेगळी नजर आणि दूरदृष्टी दोन्ही असावी लागते, ती नायपॉल यांची पुंजी होती. कदाचित मनात खोलवर असलेल्या त्या स्थलांतरितामुळेच ती त्यांना प्राप्त झालेली असावी, असेही म्हणण्यास वाव आहे. ते फक्त इथवरच थांबले नाहीत तर त्यांनी ‘द मिडल पॅसेज’ या पुस्तकात ब्रिटिश, फ्रेंच, डच, वेस्ट इंडियन आणि दक्षिण अमेरिकी अशा पाचही संस्कृतींवर भाष्य केले. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात त्यांच्या लेखनातील कुत्सितपणावर टीकाही झाली. त्यांनीही अनेकांवर नामोहरम करणारी टीका केली. त्यातून चार्ल्स डिकन्स आणि टोनी ब्लेअरही सुटले नाहीत. पण तरीही नायपॉल वेगळे ठरतात.

इस्लाम हा आधुनिक जगाचा धर्म होऊच शकत नाही, असे थेट म्हणणाऱ्यांमध्येही तेच होते आणि भारतात बाबरी मशीद पडल्यानंतर ‘‘इस्लाम समजून घेण्याच्या नावाखाली खोटा निधर्मीवाद भासवण्यात आला त्याची परिणती म्हणजे  बाबरी मशीद पाडणे,’’  अशी थेट टीका करणारेही तेच होते. कारण कोणत्याही गोष्टींकडे पाहताना स्वत:ला त्रयस्थ ठेवून केवळ लेखकाचे मत नोंदविण्याची धारणा त्यांच्याकडे होती. लेखकाकडे स्वत:ची अशी एक धारणा असावी लागते आणि ती सर्व परिस्थितींमध्ये कायम राखावीही लागते. अन्यथा एखाद्या गोष्टीच्या प्रेमात पडून त्याच्या मागे वाहात जात शब्दफुलांचे फुलोरे फुलविणारे लेखक तर पशास पासरी आहेत. पण त्यांना ना कुणी फारसे लक्षात ठेवत ना ते कधी नोबेलच्या आजूबाजूलाही फिरकू शकत! नायपॉल त्यांच्या या धारणेसाठी आणि लेखनासाठी दीर्घकाळ लक्षात राहतील.

आपल्याकडे भारतात एक वाईट खोड आहे. तसे पाहायला गेले तर ही अलीकडच्या राजकीयदृष्टय़ा टोकाच्या वातावरणात ही खोड जागतिक पातळीवर सार्वत्रिक ठरते आहे, ती लेबले लावण्याची. म्हणजे एखाद्या लेखकाने विशिष्ट बाजू विशद केली तो अमुकच आहे, असे लेबल लावून आपण मोकळे होतो. त्यामुळे बाबरीच्या वेळेस काँग्रेसने त्यांच्यावर जोरदार टीका केली. मात्र त्यामुळे िहदुत्ववाद्यांची बेटकुळी फुगण्याचे काहीच कारण नव्हते! कारण नायपॉलच ते, त्यामुळेच अलीकडच्या भाजप सरकारला इतिहासात रमणे सोडा अन्यथा गतस्मृतींच्या ओझ्याखाली पाच हजार वष्रे मागेच जाल, असे थेट सुनावणारेही नायपॉलच होते.

नायपॉल यांचे वेगळेपण असे की, लोक काय म्हणतील किंवा वाचक काय म्हणतील याचा विचार करून त्यांनी कधीच लेखन केले नाही. जे वाटत होते ते थेट भिडेल अशा पद्धतीने लिहीत राहिले. शिवाय प्रवासवर्णन असो किंवा मग कादंबरीलेखन तेही त्यांनी कोणतेही पूर्वग्रह न ठेवता लिहिले आणि महत्त्वाचे म्हणजे ते प्रश्न विचारत राहिले. कधी व्यक्तींना, कधी व्यवस्थेला. हे प्रश्न हेच त्यांचे खरे सामथ्र्य होते. कारण समोर आलेली उत्तरे त्या प्रश्नांमुळे उघड तरी झाली होती किंवा समोर तरी आली होती. इसवी सनाच्या पहिल्या शतकात नागार्जुन नावाचा एक बौद्ध तत्त्ववेत्ता होऊन गेला ज्याने विचारलेल्या प्रश्नांवर नंतर ज्ञानशास्त्राची पायाभरणी झाली.  त्यांच्याशी तुलना करायची तर नायपॉल हे आधुनिक प्रश्नार्जुनच होते! आजचे समाजकारण, राजकारण, धर्मकारण समजून घ्यायचे तर हे प्रश्न समजून घेतले तरी पुरेसे ठरेल आणि हेच नायपॉल यांच्या यशाचे गमक होते!

अशा या जगावेगळ्या लेखकास आदरांजली!

First Published on August 17, 2018 1:04 am

Web Title: vidiadhar surajprasad naipaul