‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण’ने (एमएमआरडीए) बांधलेल्या घरांपैकी ५० टक्के घरे गिरणी कामगारांना देण्याच्या संदर्भात १८ फेब्रुवारीला आदेश काढण्यात येणार आहेत. तसेच, १२ गिरण्यांच्या सरकारच्या ताब्यात आलेल्या जमिनीवरही लवकरच घरे बांधण्याचे काम हाती घेण्यात येईल. यामुळे, १ लाख ४८ हजार गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न लवकरच सुटेल, असे आश्वासन गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी बुधवारी गिरणी कामगारांना दिले.
या मागण्यांसाठी गिरणी कामगारांनी बुधवारी आझाद मैदानात हजारोंच्या संख्येने जमून आंदोलनाचा हिसका दाखवला. एमएमआरडीच्या घरांसंदर्भात चार महिन्यांत आदेश काढू, हे आश्वासन पाळण्यात सरकारला अपयश आल्याने कामगारांनी आंदोलनाचे हे अस्त्र उपसले होते. त्यामुळे, सरकारला गिरणी कामगार नेत्यांची भेट घेणे भाग पडले. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून अहिर यांनी कामगारांच्या प्रतिनिधींची सहय़ाद्री येथे भेट घेतली. त्या वेळी अहिर यांनी सरकारच्या वतीने ही आश्वासने गिरणी कामगारांना दिली.
‘म्हाडा’ने गिरणी कामगारांना वाटप केलेल्या घरांच्या इमारतींना २० मजल्यांच्या पुढे पालिकेची मान्यता नव्हती. त्यामुळे, अनेक कामगारांना पैसे भरूनही घरांचा ताबा मिळत नव्हता. मात्र, या मजल्यांना परवानगी मिळाली असून या कामगारांना लवकरच घरांचा ताबा मिळेल, अशी माहिती अहिर यांनी दिली.  गिरणी कामगारांचे नेते दत्ता इस्वलकर, नंदू पारकर, गोविंद मोहिते, जयप्रकाश भिलोरे, जयश्री खाडिलकर यांनी कामगारांच्या वतीने अहिर यांची भेट घेतली. सेंच्युरी गिरणीच्या जमिनीवर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ात गिरणी कामगारांच्या घरांच्या बांधकामाला सुरुवात करीत आहोत, अशी माहितीही अहिर यांनी शिष्टमंडळाला पुरविली. ‘या दोन निर्णयांची अंमलबजावणी सरकारने कोणत्याही विलंबाविना केली तर घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वच्या सर्व तब्बल १ लाख ४८ गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न निकाली निघेल,’ अशी शक्यता इस्वलकर यांनी व्यक्त केली.

..तर प्रश्न सुटेल
घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या कामगारांपैकी ६९२५ कामगारांना ‘म्हाडा’ने घरांचे वाटप केले आहे. एमएमआरडीएने बांधलेली ५० टक्के घरे कामगारांना उपलब्ध करून दिल्यास तब्बल ३५ हजार कामगारांचा घरांचा प्रश्न सुटेल. गिरण्यांच्या जमिनीवर चार हजार घरे उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. तसेच, भविष्यात एमएमआरडीए तब्बल पाच लाख घरे बांधणार आहे. त्यामुळे, उर्वरित कामगारांच्या घरांचा प्रश्नही टप्प्याटप्प्याने निकाली निघेल.