मोसमी पाऊस लांबल्याने शेतकरी तसेच सामान्य नागरिक हैराण झाले असतानाच राज्यातील जलाशयांमध्ये एकूण क्षमतेच्या १० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.

मराठवाडय़ातील जलाशयांनी तळ गाठला आहे. पेरणीसाठी शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला असून, जूनचा पंधरवडा संपत आला तरी पावसाचा पत्ता नाही. पाऊस लांबला असताना जलाशयांमधील साठा आटू लागला आहे. राज्यातील जलाशयांमध्ये एकूण क्षमतेच्या दहा टक्क्यांपेक्षा थोडा कमीच साठा शिल्लक आहे. दुष्काळाच्या तीव्र झळा बसलेल्या मराठवाडय़ात तर एक टक्क्यापेक्षा कमी पाण्याचा साठा शिल्लक आहे.

विभागनिहाय पाण्याचा

साठा पुढीलप्रमाणे – कोकण (३० टक्के), नागपूर (१८ टक्के), अमरावती (११ टक्के), नाशिक (नऊ टक्के) तर पुण्यात सात टक्केच साठा शिल्लक आहे. दोन आठवडे चांगला पाऊस झाल्याशिवाय धरणांमधील पाण्याच्या पातळीत वाढ होणार नाही. जुलैच्या पहिल्या आठवडय़ात तरी पाण्याचा साठा वाढणे अपेक्षित आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणात ३० टक्के साठा आहे. कोयना धरणात आठ टक्केच साठा उरला आहे. ठाणे जिल्ह्य़ाला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवीमध्ये १३ टक्के साठा आहे.

हवामानावर आधारित पीक पद्धतीवर काम

बदलते हवामान लक्षात घेता हवामानावर आधारित पीक पद्धतीवर सध्या काम करण्यात येत असून, त्यासाठी संधोधन संस्थांची मदत घेतली जात आहे, अशी माहिती राज्याचे कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी दिली. देशमुख म्हणाले, की निसर्ग आपल्या हातात नाही. त्यामुळे पाऊस लांबला, तर कोणती पिके घ्यावीत व नियोजन कसे करावे, याबाबत पीक पद्धतीवर हैदराबाद येथील ‘क्रीडा’ व पुण्यातील आयसीआर संशोधन संस्थेच्या माध्यमातून काम करण्यात येत आहे.

महाराष्ट्रात दक्षिण भागात १७ किंवा १८ जूनला मान्सूनची शक्यता असल्याचे हवामानशास्त्रज्ञ सांगत आहेत. परंतु हा अंदाज केवळ सोमवारच्या वातावरणीय स्थितीवरून वर्तवण्यात आला असून त्यात बदलही होऊ शकतो. ‘आयएमडी’ने सोमवारी संध्याकाळी वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्य व उत्तर बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग, ईशान्येकडील राज्ये, उपहिमालयीन पश्चिम बंगाल व सिक्कीममध्ये पुढच्या ४८ तासांत मोसमी पावसाची प्रगती होण्याची चिन्हे आहेत.