मुंबईकरांची काळजी वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. कारण गेल्या चोवीस तासांमध्ये मुंबईतल्या करोनाग्रस्तांची संख्या ही ४९० वरुन थेट ५९० झाली आहे. तर मागील चोवीस तासांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आत्तापर्यंत करोनाची लागण होऊन मृत्यू झालेल्यांची संख्या चाळीसवर पोहचली आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

आजच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सगळ्यांना पुन्हा एकदा सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन केलं आहे. ट्विटर व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेशी संवाद साधला आहे. सगळ्या उपाय योजना करण्यात येत आहेत. मात्र नागरिकांनी घराबाहेर न पडून आम्हाला पूर्ण सहकार्य करावे असंही त्यांनी म्हटलं आहे. असं असलं तरीही मुंबईची चिंता वाढवणारी बातमीच समोर आली आहे. कारण गेल्या चोवीस तासांमध्ये १०० रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे.

देशातल्या रुग्णांची संख्याही वाढली

देशभरात करोनाचे ५०८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. गेल्या २४ तासात समोर आलेली ही संख्या आहे. गेल्या २४ तासांमध्ये १३ मृत्यू झाले आहेत. तर करोनाग्रस्तांची संख्या ही आता ४७८९ वर पोहचली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. आत्तापर्यंत करोनाची लागण झाल्याने मृत्यू झालेल्यांची संख्या १२४ झाली आहे.