मुंबई : महापालिकेच्या विविध विभागांतील तब्बल २६८६  कर्मचारी करोनाबाधित झाले असून आतापर्यंत तब्बल १०८ कर्मचाऱ्यांचा करोनाने बळी घेतला आहे. आतापर्यंत कर्मचाऱ्यांबरोबरच एक उपायुक्त आणि एका सहाय्यक आयुक्तांचाही करोनामुळे मृत्यू झाला आहे.

करोनाचा कहर झाल्यापासून पालिकेच्या आरोग्य विभागासह विविध विभागातील कर्मचारी बाधित झाले आहेत. सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांना करोनाशी संबंधित काम देण्यात आले आहे. डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार यांच्या बरोबरच अधिकारी, अभियंते, विविध विभागातील कर्मचारी, शिपाई हेही या युद्धात उतरले आहेत. धारावीमध्ये अन्नवाटप करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती. त्यानंतर गेल्या तीन महिन्यांत १०८ कर्मचाऱ्यांचा बळी गेल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मृतामध्ये दोन खाते प्रमुख, कर व संकलन विभागाचे २, सफाई विभाग ३१, आरोग्य विभाग २७, अग्निशमन विभाग ८, सुरक्षा विभाग ७, परिमंडळ १ मध्ये ५, परिमंडळ २ मध्ये ५ तर इतर विभागातील २१ कर्मचारी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.