अपंग, वयोवृद्ध, निराधारांनाही पालिकेचा आधार

नवी मुंबई</strong> : भारतरत्न मदर टेरेसा यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या ‘मिशनरी ऑफ चॅरिटी’च्या ऐरोली येथील प्रेमदान आश्रमात शंभरपेक्षा जास्त करोनाबाधितांवर गेला महिनाभर उपचार करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे येथील सर्व रुग्ण हे अपंग, वयोवृद्ध, निराधार आणि विविध व्याधीग्रस्त आहेत.

देशाच्या विविध कानाकोपऱ्यांतून येणाऱ्या निराधार, दिव्यांग, वयोवृद्ध, व्याधीग्रस्त १४४ आश्रितांची सेवा या ठिकाणी गेली तीस वर्षे केली जात आहे. सुमारे अर्धा एकरच्या या आश्रमात या व्याधीग्रस्तांची सर्व काळजी घेण्यासाठी सात परिचारिका आणि १५ आरोग्यसेविका कार्यरत आहेत. मागील महिन्यात या आश्रमातील दोन महिलांना करोना साथरोगाची लक्षणे आढळून आल्याने त्यांची आश्रमात येऊन चाचणी करण्यात आली. अगोदरच दिव्यांग आणि त्यात करोना रुग्ण असल्याने या रुग्णांना इतरत्र चाचणीसाठी नेण्यापेक्षा आश्रमात जाऊनच त्यांची चाचणी करण्यात यावी असे आदेश पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षां तळेगावकर आणि डॉ. सचिन नेमाणे यांनी सर्वच महिलांची व कर्मचाऱ्यांची प्रतिजन चाचणी केली. त्यात १४४ पैकी १२२ आश्रम महिला या करोनाबाधित आढळून आल्याने पालिकेच्या कोविड विभागासमोर एक मोठे आव्हान उभे होते. संस्थेशी विचारविनिमय करून याच आश्रमात कोविड काळजी केंद्र तयार करण्यात आले. बहुतांशी साठपेक्षा जास्त वय असलेल्या महिला या आश्रमात आहेत. त्यांच्यात सहव्याधीदेखील मोठय़ा प्रमाणात असल्याचे आढळून आले. महिला आश्रम असल्याने पालिकेने या ठिकाणी स्थापन केलेल्या काळजी केंद्रात चार महिला डॉक्टर व पंधरा परिचारिकांची २४ तास नेमणूक केली. आश्रमाच्या तीन भागांपैकी एका भागात कोविड काळजी केंद्र तर दुसऱ्या भागात अलगीकरण कक्ष तयार करण्यात आला. या रुग्णांची सेवा करताना कोविड रुग्णापेक्षा मानवता दृष्टिकोन महत्त्वाचा होता. पालिकेने नेमलेल्या डॉक्टर आणि पारिचरिका यांनी हा दृष्टिकोन मनापासून सांभाळला अनेक महिला या गतिमंद असल्याने त्यांच्या औषधाच्या वेळा काळजीपूर्वक सांभाळल्या गेल्या. आरोग्य तपासणी यंत्रणादेखील याच ठिकाणी उभारण्यात आली. अत्यवस्थ होणाऱ्या महिलांची नेरुळमधील डी. वाय. पाटील रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली होती.

९० वर्षांच्या आजीही करोनामुक्त

कोणताही गवगावा न करता करण्यात आलेल्या या सेवेमुळे १२२ व्याधीग्रस्त, अपंग महिलांपैकी ११६ महिला या सुखरूप बऱ्या झालेल्या आहेत. यात ९० वर्षांच्या आजीदेखील आहेत. चार रुग्णांवर अजूनही उपचार सुरू आहेत. सहव्याधीमुळे दोन रुग्णांना पालिकेचे हे प्रयत्न वाचवू शकले नाहीत, मात्र पालिकेच्या कोविड विभागाने मदर टेरेसा यांच्या पावलावर पाऊल ठेवून केलेली ही सेवा नवी मुंबईत कौतुकाची ठरली आहे.