मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर चालणाऱ्या लोकल्स या मुंबईच्या जीवनवाहिनीच समजल्या जातात. मात्र मागच्या तीन दिवसात याच दोन मार्गांवर लोकलमधून पडून एकूण १७ जणांचा मृत्यू झाला आहे. २६ जून ते २८ जून या तीन दिवसांच्या कालावधीत हे सगळे मृत्यू झाले आहेत. फेसबुक या सोशल नेटवर्किंग वेबसाईटवर Mumbai Train updates नावाचे एक फेसबुक पेज आहे. या फेसबुक पेजचे अॅडमिन मंदार अभ्यंकर यांनी ही माहिती पोस्ट केली आहे.

२६ जून रोजी ३ जण ठार झाले आहेत तर ११ जण जखमी झाले आहेत. पालघर स्थानकात १, वसई रोड स्थानकात १ तर वडाळा स्थानकात १ मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या दिवशी एकूण ११ जण जखमी झाले आहेत. २७ जूनला एकूण ६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर ४ जण जखमी झाले आहेत. तर २७ जूनला ८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे आणि ५ जण जखमी झाले आहेत.

मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरून धावणाऱ्या लोकल या मुंबईच्या लाईफलाईन मानल्या जातात. मात्र याच लाईफलाईन मुंबईकरांसाठी जीवघेण्या ठरत आहेत. गर्दी, ट्रेनमध्ये लटकून जाण्याचे प्रमाण, वारंवार होणारा खोळंबा या समस्या नित्याच्याच होऊन बसल्या आहेत. मध्य रेल्वेवर हा ताण सर्वाधिक आहे. त्यामुळे मुंबईकर रोज जीव मुठीत घेऊनच प्रवास करतात असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.