मुंबईकरांच्या चिंतेत भर टाकणारी समोर आली आहे कारण मुंबईत करोनाग्रस्तांची संख्या ही २ हजारांच्या जवळ जाऊन पोहचली आहे. मुंबईत करोनाचे १८३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे करोनाग्रस्तांची संख्या १९३६ झाली आहे. यापैकी १८१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत मुंबईत ११३ जणांचा करोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात करोनाची लागण झाल्याने दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांचा विचार केला तर मुंबईत सर्वाधिक रुग्ण आहेत. मुंबईतही अनेक ठिकाणी करोना प्रतिबंधित विभाग तयार करण्यात आले आहेत. धारावीसाठी वेगळा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. करोनाचे रुग्ण मुंबईसह महाराष्ट्रात वाढत आहेत कारण चाचण्यांचं प्रमाण वाढतं आहे त्यामुळे घाबरुन जाऊ नका असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान मुंबईत विविध उपाय योजना या आरोग्य खातं, पोलीस यांच्यातर्फे करण्यात येत आहेत. करोनाशी लढा देण्यासाठी आरोग्य अधिकारी आणि कर्मचारीही दिवसरात्र झटत आहेत.

देशभरात लॉकडाउन ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. लॉकडाउनच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करण्यात यावं असेही निर्देश देण्यात आले आहेत. तसंच कुणीही घाबरुन जाऊ नका या संकटावर मात करुन आपण विजयी होऊ असा विश्वासही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी व्यक्त केला.