टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरूवात

राज्यात तीव्र पाणी टंचाईमुळे दुष्काळग्रस्त परिस्थीती निर्माण झाल्याने एसटी महामंडळाने काही गावांना दत्तक घेऊन पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. ९ जिल्ह्यतील १९ गावे दत्तक घेण्यात आली असून त्यांना दोन दिवसांपासून टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे. दुष्काळग्रस्त गावांमध्ये पाणी समस्या संपेपर्यंत टॅंकरने पाणी पुरवठा सुरू राहणार असल्याचे एसटी महामंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

राज्यात पडलेल्या दुष्काळामुळे अनेक गावांमध्ये पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे शेतकरीही अडचणीत सापडला आहे. ही परिस्थीती पाहता एक सामाजिक बांधिलकी म्हणून एसटी महामंडळ १९ गावे दत्तक घेण्याचा विचार करत होती. त्याला नुकतीच मंजुरी देण्यात आल्यानंतर १९ मे पासून या गावांना पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे. औरंगाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, नाशिक, सातारा, अहमदनगर, बुलढाणा जिल्ह्यतील गावांचा समावेश आहे.

यात एसटी स्थानकातील विहीरींचाही वापर पाणी पुरवठय़ासाठी केला जात आहे. औरंगाबाद जिल्ह्यतील वैजापूर तालुक्यातील एसटीच्या शिरुर बस स्थानकातील विहीरीतून, उस्मानाबाद जिल्ह्यतील गावांना तुळजापूर आगाराच्या विहीरीतून अहमदनगर जिल्ह्यतील गावांना शेगावच्या आगारातील विहीरीतून टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. तर ऊर्वरित जिल्ह्यंतील गावांना तहसिलदारांनी प्रमाणित केलेल्या पाण्याच्या अन्य स्त्रोतातून टॅकरने पाणीपुरवठा केला.