११ वीच्या ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे. यामध्ये शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विज्ञान शाखेसाठी ५ टक्के तर कला आणि वाणिज्य शाखेसाठी ८ टक्के जागा वाढल्या आहे. मुंबई, पुणे आणि नागपूर येथील कनिष्ठ महाविद्यालयात जागा वाढवून देण्याचा निर्णय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी घेतला आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान हा निर्णय घेण्यात आला आहे.विद्यार्थ्यांना दिलासा देणारा हा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.  विज्ञान शाखेसाठी ५ टक्के तर कला आणि वाणिज्य शाखेसाठी ८ टक्के जागा वाढवल्या आहेत अशी घोषणा शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे.

विनोद तावडे यांच्याकडे असलेले शिक्षण खाते  आशिष शेलार यांना रविवारीच देण्यात आले. रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात आशिष शेलार यांना स्थान देण्यात आले आहे. त्यानंतर त्यांनी पहिलाच निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने घेतला आहे. अकरावी प्रवेशाच्या वेळी जागा कमी पडल्याची तक्रार कायमच महाविद्यालयांकडून केली जाते. त्यावर तोडगा काढण्यासाठी आता आशिष शेलार यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

सर्वांना समान न्याय व प्रवेशासाठी संधी या तत्त्वावर मुंबई, पुणे, नागपूर येथील निवडक महाविद्यालयांच्या प्राचार्यांशी चर्चा करून, विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या अधिकच्या संधी उपलब्ध होतील, या हेतूने मुंबई, पुणे व नागपूर या शहरातील ऑनलाईन प्रवेशांसाठी निश्चित केलेल्या क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांचा कल असलेल्या महाविद्यालयांमध्ये जागा वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई क्षेत्रातील निवडक महाविद्यालयांमध्ये जागा वाढवण्यासंदर्भातला निर्णय घेण्यात आला आहे.

अकरावीच्या प्रवेशाचा तिढा ही दरवर्षीचीच बाब होऊन बसली आहे. तो तिढा सोडवण्यासाठी नामांकित महाविद्यालयांची प्रवेश क्षमता वाढवता येईल का? याची चाचपणी शिक्षण विभागाकडून करण्यात आली होती. अकरावीच्या प्रवेशाबाबत कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही याची काळजी सरकारकडून घेतली जाईल असेही सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसारच हा निर्णय घेतला गेला आहे.अकरावी प्रवेशापासून राज्यातील एकही विद्यार्थी, विद्यार्थिनी वंचित राहणार नाही, असेही आशिष शेलार यांनी  यावेळी सांगितले.