शिक्षेची ३० वर्षे पूर्ण केलेल्या निशान सिंहची न्यायालयात धाव
कैद्याची शिक्षा पूर्ण झाली की त्याला तुरुंगातून सोडले जाते. त्याची वर्तणूक चांगली असेल तर शिक्षेचा कालावधी पूर्ण होण्याआधीही सुटका होण्याची शक्यता असते. वर्तणूक चांगली असणे आणि ‘हरकाम्या’ नव्हे तर प्लम्बिंग, सुतारकाम, कडियाकाम, इलेक्ट्रिक दुरुस्ती अशी विशेष कौशल्ये अंगी असल्याने ‘बहुकाम्या’ असणे हे निशान सिंह जयमाल सिंह सोहेल (४५) याच्या मात्र अंगाशी आले आहे! खलिस्तान चळवळीला अर्थसाह्य़ करण्यासाठी पेट्रोल पंप आणि पोलिसांना लुटल्याप्रकरणी त्याला ठोठावलेली सजा पूर्ण होऊनही ही सर्व कामे तो करीत असल्याने त्याची तुरुंगातून सुटकाच रखडली आहे. त्यामुळे त्याने न्यायालयात धाव घेतली आहे. सुटकेनंतरही मी ही कामे करीन, पण मला सोडा, अशी त्याची आर्त मागणी आहे.
निशान सिंह याला वयाच्या २२व्या वर्षीच जन्मठेप ठोठावली गेली. सुरूवातीला ६० वर्षे कालावधीची असलेली ही शिक्षा उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सरकारने ३० वर्षांपर्यंत कमी केली. शिक्षेची ही ३० वर्षे त्याने गेल्याच वर्षी पूर्ण केली आहेत. निशानच्या चांगल्या वर्तणुकीमुळे सध्या तो कैद्यांच्या अंतर्गत सुरक्षेचा पहारेकरी म्हणूनही जबाबदारी पार पाडत आहे. त्यासोबत अनेक कौशल्याची कामेही तो करतो. ३० वर्षे तुरुंगात घालवल्यानंतर निशानला आता संसार थाटायचा आहे. अ‍ॅड्. एन. एन. गवाणकर यांच्यामार्फत त्याने सुटकेसाठी याचिका केली आहे. शुक्रवारी त्याच्या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयानेही या याचिकेची दखल घेत त्याची सुटका का झाली नाही, याचा अहवाल सादर करण्याचे आदेश सरकारला दिले आहेत.
निशानचा नाशिक येथे ढाबा होता. अन्य पंजाबी तरुणांप्रमाणे तोही खलिस्तानी चळवळीने प्रभावित झाला होता. चळवळीसाठी त्याने मित्र बिट्टू याच्या साथीने पोलीस ठाणे आणि चार पेट्रोल पंप लुटले. याप्रकरणी २ डिसेंबर १९८१ रोजी त्याला अटक झाली. नाशिक येथील विशेष ‘टाडा’ न्यायालयाने त्याला दहशतवादी कारावायांना मदत केल्याप्रकरणी दोषी ठरवून १२ मार्च १९८७ रोजी जन्मठेप ठोठावली. तेव्हापासून तो तुरुंगात आहे. त्याने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयातही आव्हान दिले नाही. त्यामुळे सरकारने त्याची जन्मठेप ६० वर्षांची असेल, असे आदेश काढले. २०११ मध्ये त्याने या कालावधीबाबत उच्च न्यायालयात धाव घेतली तेव्हा ही शिक्षा ३० वर्षांची झाली होती.
निशानने ३१ जानेवारी २०१६पर्यंत ३० वर्षे ३ महिने आणि २४ दिवस शिक्षा भोगली आहे. त्यामुळे ३१ ऑक्टोबर २०१५ रोजीच त्याची सुटका अपेक्षित होती. मात्र चांगली वर्तणूक आणि तो पार पाडत असलेली कामे, हाच अडसर बनला आहे. परंतु पूर्वीप्रमाणे आताही न्यायालय त्याचा हा अडसर दूर करेल, या आशेने त्याने न्यायालयात धाव घेतली आहे.
– अ‍ॅड्. एन. एन. गवाणकर