मुंबई : दोन्ही डोळ्यांमध्ये मोतीिबदू असल्यामुळे बीड जिल्ह्य़ातील आडस गावातील साठीच्या रखमाबाईंना गेली अनेक वर्षे दिसत नव्हते. गेल्याच आठवडय़ात त्यांच्यावर मोतीबिंदुची शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्यांना पुन्हा एकदा दृष्टी प्राप्त झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मोतीबिंदुमुक्त महाराष्ट्र’चा संकल्प सोडल्यापासून गेल्या सात महिन्यात महाराष्ट्रात तब्बल चार लाख ५० हजार शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून त्यापैकी दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू असल्यामुळे दृष्टिहीन झालेल्या तब्बल ६१ हजार लोकांना पुन्हा एकदा नवी दृष्टी मिळाली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही योजना जाहीर केल्यानंतर डॉ. लहाने यांच्यासह आरोग्य विभागाचे शंभर नेत्रशल्यविशारद आणि ७६ शस्त्रक्रियागृह, वैद्यकीय शिक्षण विभागाचे १५५ नेत्रशल्यविशारद व २५ शस्त्रक्रियागृहे, आणि स्वयंसेवी संस्थांच्या अधिपत्याखालील १०८ शस्त्रक्रियागृहे व ३५५ डॉक्टरांच्या मदतीने दररोज सुमारे चार हजार मोतीबिंदुच्या शस्त्रक्रिया गेल्या सात महिन्यांपासून सातत्याने करीत आहेत. मुलांच्या सुट्टय़ांमुळे एप्रिल आणि मे महिन्यात लोक बाहेरगावी जात असल्यामुळे शस्त्रक्रियांचे प्रमाण थोडे  कमी झाले असून सरासरी महिन्याला ८० हजार एवढय़ा शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे या प्रकल्पाचे मुख्य समन्वयक डॉ. लहाने यांनी सांगितले. या नेत्रयज्ञात सर्वाधिक शस्त्रक्रिया शासनाच्या जे.जे. रुग्णालयात करण्यात आल्या असून तेथे सरासरी दरमहा पंधराशे शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून त्यापाठोपाठ अमरावती येथे सर्वाधिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांनी मोतीबिंदुमुक्त महाराष्ट्रासाठी दाखवलेल्या दूरदृष्टीमुळे आज तब्बल ६० दृष्टीहिनांना दृष्टी प्राप्त झाली असून या योजनेसाठी शासनाबरोबरच अनेक स्वयंसेवी संस्थांनीही सढळ हस्ते मदत केली आहे. या उपक्रमासाठी सुमारे ४२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. आजपर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी एकत्रितपणे मुख्यमंत्री मदत निधीमधून जेवढी मदत रुग्णांना केली नसेल त्यापेक्षा कितीतरी अधिक मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या चार वर्षांत केली असून या फायदा हजारो कॅन्सर, हृद्रुग्ण, मूत्रपिंड विकार तसेच मेंदुच्या शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या रुग्णांना झाला आहे. तसाच फायदा आज मोतीबिंदुमुळे त्रस्त असलेल्या लाखो रुग्णांना मिळत आहे.

तब्बल १२ वर्षांनंतर..

सुनंदा दोन वर्षांपर्यंत पाहू शकत होती. मात्र लहानपणीच दोन्ही डोळ्यात मोतीबिंदु झाला आणि तिची दृष्टी गेली. परभणी जिल्’ातील शेलू गावी शेतमजूर असलेल्या आईवडिलांनी काही डॉक्टरांना तिचे डोळे दाखवले, परंतु एवढय़ा लहान मुलीवर शस्त्रक्रिया करण्यास कोणी तयार झाले नाही. तेव्हापासून गेली बारा वर्षे ती मोतीबिंदुमळे दिसू शकत नव्हते. मुख्यमंत्र्यांच्या ‘मोतीबिंदुमुक्त महाराष्ट्र’अंतर्गत सर्वेक्षणात सुनंदाच्या दोन्ही डोळ्यांची तपासणी करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी आपल्या आजोबांबरोबर तिला मुंबईतील जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉ. तात्याराव लहाने यांनी सुनंदाची मोतीबिंदु शस्त्रक्रिया केली. १२ वर्षांनंतर सुनंदाला आपल्या आजोबांना पाहाता आहे. आजुबाजूचे जग आता उघडय़ा डोळ्यांनी ती पाहू शकते. मुख्यमंत्री साहेबांच्या एका दृष्टीदायी योजनेमुळे माझी नात मला पाहू शकते हे तिच्या आजोबांचे उद्गार मन हेलावणारे होते.

‘पंधरा जानेवारीपर्यंत केलेल्या सर्वक्षणात पिकलेल्या मोतीबिंदुचे सात लाख २० हजार रुग्ण सापडले असून त्यापैकी दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदुमुळे अंधत्व आलेल्यांची संख्या तब्बल ५० हजार एवढी होती. तथापि त्यानंतर सातत्याने शस्त्रक्रिया करत गेल्यानंतर जूनपर्यंत दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदुमुळे अंधत्व आलेल्या तब्बल ६० हजार रुग्णांची शस्त्रक्रिया होऊन त्यांना दृष्टी मिळाल्याचे स्पष्ट झाले.’

– डॉ. तात्याराव लहाने