गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील करोना संसर्ग वाढीचा दर पुन्हा घसरू लागला असून रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीत वाढ होऊ लागली आहे. गेल्या २४ तासांत ७५८ रुग्ण आढळले, तर १८ जणांचा मृत्यू झाला.

आतापर्यंत दोन लाख ८५ हजार २६० मुंबईकरांना करोनाची बाधा झाली. विविध रुग्णालयांत उपचार घेणारे ४०२ रुग्ण शनिवारी करोनामुक्त झाले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या दोन लाख ५९ हजार ५३९ इतकी झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाण ९१ टक्क्य़ांवर स्थिरावले असून करोना वाढीचा दर ०.२७ टक्क्य़ांवर पोहोचला आहे. तर रुग्ण दुपटीचा काळ सरासरी २५७ दिवसांवर पोहोचला आहे. करोनाबाधितांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत १९ लाख ७१ हजार ७३६ चाचण्या करण्यात आल्या आहेत. करोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे आजही मुंबईतील सुमारे ५,३६९ इमारती टाळेबंद करण्यात आल्या आहेत.

ठाणे जिल्ह्य़ात ६११ नवे रुग्ण

ठाणे जिल्ह्य़ात शनिवारी ६११ करोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या २ लाख ३२ हजार ४०१ वर पोहोचली आहे. दिवसभरात ७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने करोनाबळींची संख्या ५ हजार ७३३ इतकी झाली आहे.