मुंबई-अहमदाबाद मार्गावरील फळझाडांसह निलगिरी, कडुनिंबांच्या झाडांचा समावेश

मुंबई ते अहमदाबाद मार्गावर वेगवान प्रवासासाठी प्रवास बुलेट ट्रेन चालविण्यात येणार आहे. मात्र, प्रकल्प पूर्ण करताना मुंबई ते अहमदाबाद मार्गात येणाऱ्या ८० हजार झाडांवर कुऱ्हाड चालविण्यात येण्याची शक्यता आहे. फळझाडांसह निलगिरी, कडुनिंब आदी झाडांचा यात मोठय़ा प्रमाणात समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. सध्या प्रकल्पात सामाजिक-आर्थिक  आणि पर्यावरणाचे पुन्हा सर्वेक्षण सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर तोडण्यात येणाऱ्या झाडांची संख्या ठरणार असल्याचे राष्ट्रीय जलदगती रेल निगम लिमिटेडने स्पष्ट केले.

बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांना जून महिन्यापासून सुरुवात होत आहे. एक लाख आठ हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प १५ ऑगस्ट २०२२ रोजी प्रवाशांच्या सेवेत आणण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, प्रकल्पाचे काम करताना अनेक अडथळे रेल्वेसमोर आहेत. यात सर्वात मोठी अडचण आहे ती पर्यावरणाचे संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या झाडांची. रेल्वेकडून प्रकल्पाचा शक्यता अभ्यास अहवाल तयार करण्यात आला आहे. यात ८० हजारपेक्षा जास्त झाडे प्रकल्पाच्या कामांत येत असल्याचे नमूद आहे. यामध्ये २७ हजार फळांची झाडे असून त्यात चिंच, जांभूळ, चिकू, नारळ, आंबा आणि अन्य फळझाडांचा समावेश आहे. आंब्याची सर्वाधिक १४ हजार झाडे असून, त्यानंतर चिकूच्या झाडांची संख्या आहे.

बुलेट ट्रेन प्रकल्पात काही बदल करण्यात आले आहेत. आधी हा प्रकल्प उन्नत नव्हता. मात्र आता मुंबई-अहमदाबाद मार्गाच्या ५०८ किलोमीटरपैकी ४६० किलोमीटरचा मार्ग उन्नत असणार आहे. त्यामुळे प्रकल्पासाठी जागा कमी लागणार असून तोडण्यात येणाऱ्या झाडांचीही संख्या कमी होईल. परंतु, सध्या सामाजिक-आर्थिक आणि पर्यावरणाचे सर्वेक्षण सुरू आहे आणि यातूनच किती झाडे प्रकल्पाच्या कामात येत आहेत, ते स्पष्ट होईल. जितकी झाडे तोडण्यात येतील तितकीच ती लावण्यात येणार आहे.

-आचल खरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय जलदगती रेल कॉपरेरेशन लिमिटेड